चिराग-सात्विकसाईराजकडून सायनाचा विक्रम मोडीत

वृत्तसंस्था /नवी दिल्ली विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या मानांकन यादीत अग्रस्थानावर सर्वाधिक कालावधी राहण्याचा भारताच्या सायना नेहवालचा विक्रम चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांनी मोडीत काढला आहे. भारताचे पुरूष बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रेनकिरे•ाr यांनी गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांमध्ये आपल्या कामगिरीत सातत्य राखले आहे. चिराग आणि सात्विकसाईराज यांनी पुरूष दुहेरीच्या मानांकन यादीत अग्रस्थान […]

चिराग-सात्विकसाईराजकडून सायनाचा विक्रम मोडीत

वृत्तसंस्था /नवी दिल्ली
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या मानांकन यादीत अग्रस्थानावर सर्वाधिक कालावधी राहण्याचा भारताच्या सायना नेहवालचा विक्रम चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांनी मोडीत काढला आहे.
भारताचे पुरूष बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रेनकिरे•ाr यांनी गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांमध्ये आपल्या कामगिरीत सातत्य राखले आहे. चिराग आणि सात्विकसाईराज यांनी पुरूष दुहेरीच्या मानांकन यादीत अग्रस्थान मिळविले असून या जोडीने 2024 च्या बॅडमिंटन हंगामात आपले वर्चस्व या मानांकन यादीत ठेवले आहे. यापूर्वी भारताची महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालने महिला एकेरीच्या मानांकन यादीत सुमारे 10 आठवडे आपले अग्रस्थान राखण्याचा विक्रम केला होता. 18 ऑगस्ट 2015 साली ते 21 ऑक्टोबर 2015 पर्यंत सायनाने महिला एकेरीच्या मानांकन यादीत पहिले स्थान टिकविले होते. आता सायनाचा हा विक्रम चिराग आणि सात्विकसाईराज यांनी मोडीत काढला आहे.
चिराग आणि सात्विकसाईराज यांनी पुरूष दुहेरीच्या मानांकन यादीत 1, 02, 303 मानांकन गुणासह पहिले स्थान मिळविले आहे. या मानांकन यादीत दक्षिण कोरियाचे हेयुक आणि जेई हे दुसऱ्या स्थानावर आहेत. पण त्यांच्या मानांकन गुणात 5 हजार गुणांचा फरक आहे. चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज या जोडीने आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरूष दुहेरीचे जेतेपद मिळवून मानांकनात अग्रस्थान काबिज केले होते. त्यानंतर या जोडीने चीन खुल्या, मलेशिया खुल्या, इंडिया खुल्या या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली तर अलिकडेच या जोडीने फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद मिळवून आपले अग्रस्थान अधिकच भक्कम केले आहे. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात चिराग आणि सात्विकसाईराज यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत दुहेरीचे जेतेपद मिळवित विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या मानांकनात अग्रस्थान पटकाविले होते. पण त्यांना त्यानंतर हे अग्रस्थान केवळ तीन आठवडे राखता आले होते. आता सात्विकसाईराज आणि चिराग यांनी 12 आठवडे हे अग्रस्थान राखण्याचा नवा विक्रम केला आहे. पुरूष एकेरीच्या मानांकनात भारताच्या किदांबी श्रीकांतने 2018 च्या एप्रिल महिन्यात अग्रस्थान मिळविले होते पण त्याला एक आठवड्यापेक्षा अधिक राखता आले नव्हते. भारताचे विद्यमान बॅडमिंटन प्रशिक्षक प्रकाश पदुकोन यांनी 1980 साली प्रतिष्ठेची अखिल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकल्यानंतर एकेरीच्या मानांकनात अग्रस्थान घेतले होते.