आता क्युआर कोडच्या साहाय्याने पोहोचा मतदान केंद्रात

आता क्युआर कोडच्या साहाय्याने पोहोचा मतदान केंद्रात

निवडणूक आयोगाचा दहा शहरांमध्ये प्रायोगिक उपक्रम
प्रतिनिधी/ बेळगाव
मतदान केंद्र शोधणे आता अधिक सोपे झाले आहे. निवडणूक आयोगाने तंत्रज्ञानाचा वापर करून गुगल मॅपच्या साहाय्याने मतदान केंद्रे शोधणे सोयीचे करून दिले आहे. मतदाराला देण्यात येणाऱ्या ओळख चिठ्ठीत क्युआर कोडचा समावेश करण्यात येणार आहे. क्युआर कोड स्कॅन करताच मतदान केंद्राची माहिती मोबाईलवर उपलब्ध होणार आहे.
निवडणूक आयोगाने बेळगावसह राज्यातील दहा महानगरांमध्ये हा उपक्रम राबविला आहे. देशात प्रथमच असा उपक्रम राबविला जात असून तो यशस्वी ठरला तर संपूर्ण देशभरात लागू केला जाणार आहे. बेळगावसह बेंगळूर, विजापूर, हुबळी-धारवाड, दावणगेरे, शिमोगा, म्हैसूर, तुमकूर, बळ्ळारी, मंगळूर या शहरांमध्ये यावर्षी लोकसभा मतदानावेळी ओळख चिठ्ठीत क्युआर कोडचा समावेश केला जाणार आहे.
निवडणुकीपूर्वी विभागातील शाळेचे शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी, आशा कार्यकर्त्या यांच्याकडून मतदारांना घरोघरी जाऊन ओळख चिठ्ठी दिली जाते. यापूर्वी ओळख चिठ्ठीमध्ये मतदानाचे ठिकाण व क्रमांक देण्यात येत होता. परंतु, बऱ्याचवेळी मोठ्या महानगरांमध्ये मतदान केंद्र शोधणे जिकिरीचे होत होते. आता क्युआर कोडमुळे काही क्षणात मतदाराच्या मोबाईलवर मतदान केंद्राचा फोटो, अंतर याची संपूर्ण माहिती मिळणार आहे.
निवडणूक आयोगाने यासाठी गुगल मॅपचा वापर केला आहे. एकूण 13,847 मतदान केंद्रांवर हा उपक्रम राबविला जाणार आहे. शहरी भागातील मतदारांना याचा उपयोग होणार असून अधिकाधिक नागरिकांनी क्युआर कोडचा वापर करावा, अशी माहिती कर्नाटकच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे.