‘आप’च्या मंत्र्याची 5 तास ईडी चौकशी

‘आप’च्या मंत्र्याची 5 तास ईडी चौकशी

मद्य घोटाळा प्रकरणात तपासचक्र सुरूच
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीतील आणखी एक मंत्री तपास यंत्रणांच्या रडारवर आला आहे. समन्स मिळाल्यानंतर परिवहन मंत्री कैलाश गेहलोत शनिवारी ईडी कार्यालयात पोहोचले. मद्य घोटाळ्याबाबत ईडीच्या पथकाने त्यांची तब्बल पाच तास चौकशी केली. सखोल चौकशीनंतर ते ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले. गेहलोत यांचा मद्य धोरण ठरविण्यात मोठा सहभाग असल्याचा संशय लक्षात घेत त्यांची चौकशी करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
ईडीने यापूर्वी पाठविलेल्या नोटिशीनुसार त्यांना शनिवारी सकाळी चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. आता या प्रकरणातील तपासाचा धागा कैलाश गेहलोत यांच्यापर्यंत पोहोचल्याचे मानले जात आहे. मद्य घोटाळा प्रकरणी आतापर्यंत ‘आप’च्या तीन मोठ्या नेत्यांना अटक करण्यात आली असून त्यात संजय सिंह, मनीष सिसोदिया आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा समावेश आहे. गेल्या आठवड्यातच ईडीने मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात त्याविरोधात याचिका दाखल केली होती, परंतु न्यायालयाने ती फेटाळली होती.