भाजपला रामराम, अजय निषादांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

भाजपला रामराम, अजय निषादांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

भाजपने फसवणूक केल्याचा दावा : छेदी पासवानही काँग्रेसच्या वाटेवर
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारच्या मुजफ्फरपूरचे भाजप खासदार अजय निषाद यांनी मंगळवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. बिहार काँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश प्रताप सिंह यहंच्या उपस्थितीत काँग्रेस नेते पवन खेडा यांनी निषाद यांना पक्षाचे सदस्यत्व प्रदान केले आहे. पक्षाच्या नेतृत्वाने आदेश दिला तर निवडणुकीला सामोरा जाणार असल्याचे निषाद यांनी यावेळी म्हटले आडहे.
उमेदवारी नाकारण्यात आल्याने नाराज निषाद यांनी भाजपला रामराम ठोकला होता. भाजपकडून फसवणूक झाल्याने मी पक्षाच्या सर्व पदांसोबत प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले होते.
दुसरीकडे सासारामचे भाजप खासदार छेदी पासवान देखील काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे समजते. पासवान यांना यावेळी भाजपने उमेदवारी नाकारली आहे. यामुळे ते नाराज झाले आहेत. परंतु काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या मीरा कुमार यांचा छेदी पासवान यांच्या पक्षप्रवेशाला विरोध आहे. पासवान यांना काँग्रेसमध्ये प्रवेश मिळू नये म्हणून मीरा कुमार जोरदार प्रयत्न करत आहेत.
काँग्रेस बिहारमधील 9 जागा लढविणार असून याकरता मजबूत उमेदवारांची निवड करू पाहत आहे. किशनगंजमध्ये मोहम्मद जावेद तर कटिहारमध्ये तारिक अनवर यांना पक्षाकडून उमेदवारी दिली जाणार आहे. भागलपूरमध्ये अजित शर्मा तसेच प्रवीण कुशवाह यांच्यात उमेदवारीवरून चुरस आहे.
पुत्राला उमेदवारीसाठी प्रयत्न
सासाराम मतदारसंघात भाजपने शिवेश राम यांना उमेदवारी दिदली आहे. तर मुजफ्फरपूरमध्ये भाजपने डॉ. राजभूषण चौधरी यांना मैदानात उतरविले आहे. मुजफ्फरपूर येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह हे पुत्र आकाशला उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मुजफ्फरपूरमध्ये उमेदवारी न मिळाल्यास पश्चिम चंपारण्यची उमेदवारी मिळावी असा त्यांचा प्रयत्न आहे.