महिला कॉन्स्टेबलच्या समर्थनार्थ शेतकरी संघटनांची रॅली

महिला कॉन्स्टेबलच्या समर्थनार्थ शेतकरी संघटनांची रॅली

निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी
वृत्तसंस्था/ चंदीगड
संयुक्त किसान मोर्चा (बिगर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चा समवेत अनेक शेतकरी संघटनांनी रविवारी सीआयएसएफच्या महिला कॉन्स्टेबलच्या समर्थनार्थ मोहाली येथे रॅली आयोजित केली. महिला कॉन्स्टेबलने अभिनेत्री तसेच भाजप खासदार कंगना रनौतला थप्पड लगावली होती. याप्रकरणी निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.
महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौरसोबत कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये असे त्यांनी म्हटले आहे. मोहालीच्या गुरुद्वारा अंबसाहिबपासून सुरू झालेल्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  खासदाराला विमानतळावर झालेल्या मारहाण प्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हायला हवी. घटनेमागील कारण जाणून घेतले जावे असे शेतकरी नेते सरवन सिंह पंधेर यांनी म्हटले आहे.
शेतकरी नेत्यांनी कथित स्वरुपात भडकावू वक्तव्याप्रकरणी कंगना रनौतवरही निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांच्या निदर्शनांविषयी कंगनाने घेतलेल्या भूमिकेचा उल्लेख करतच कुलविंदर कौरने तिला मारहाण केली होती. तर या प्रकरणी सीआयएसएफने चौकशीचे आदेश दिले आहेत. तर मोहाली पोलिसांनी कौरच्या विरोधात गुन्हे नोंदविले आहेत.
चंदीगड विमानतळावर सुरक्षा तपासणीदरम्यान कॉन्स्टेबलने कंगनाला थप्पड लगावत तिच्यासोबत गैरवर्तन केले होत. हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघात विजय मिळविल्याच्या दोन दिवसांनी कंगनासोबत हा प्रकार घडला होता.