दक्षिण आफ्रिकेपुढे आज बांगलादेशचे आव्हान

दक्षिण आफ्रिकेपुढे आज बांगलादेशचे आव्हान

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
दक्षिण आफ्रिकेला आज सोमवारी येथे टी-20 विश्वचषक स्पर्धेतील ‘ड’ गटातील सामन्यात बांगलादेशचा सामना करताना फलंदाजीत चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. कामगिरीची नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममधील अंदाज वर्तविणे कठीण असलेल्या खेळपट्टीवर त्यांना खेळावे लागणार आहे. त्यामुळे दोन्ही संघासमोर आव्हान उभे राहणार आहे.
दक्षिण आफ्रिका येथे त्यांचे मागील दोन सामने खेळलेली असल्याने त्यांचे पारडे थोडे जड राहू शकते. बांगलादेशलाही या ठिकाणी त्यांचा भारताविरुद्धचा सराव सामना झालेला असल्याने परिस्थितीची थोडीशी माहिती आहे. दक्षिण आफ्रिकेला शनिवारी नेदरलँड्सविऊद्ध विजयासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली आणि श्रीलंकेविऊद्धच्या विजयातही त्यांचे फलंदाज आरामात खेळताना दिसले नाहीत. दोन्ही सामन्यांत त्यांनी अनुक्रमे 103 आणि 77 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केला.
त्यांच्या केशव महाराजने फिरकीची जबाबदारी सांभाळलेली असून एन्रिक नॉर्टजे, कागिसो रबाडा, मार्को जॅनसेन आणि ओटनील बार्टमेन यांचा समावेश असलेल्या वेगवान माऱ्याने स्पर्धेत चांगली कामगिरी केलेली असल्याने त्यात बदल होण्याची शक्यता नाही. फलंदाजांना मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. नेदरलँड्सविऊद्ध दक्षिण आफ्रिकेला 10 षटकांत केवळ 33 धावा करता आल्या. चौथ्या क्रमांकावर आलेला ट्रिस्टन स्टब्स आणि सहाव्या क्रमांकावर येऊन नाबाद अर्धशतक झळकावणारा डेव्हिड मिलर नसता, तर त्यांना विश्वचषकातील डचकडून पराभवाची हॅट्ट्रिक नोंदवावी लागली असती.
आज विजय मिळविल्यास दक्षिण आफ्रिकेला सुपर एटमध्ये स्थान मिळवता येईल. इतिहास देखील दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने आहे. कारण ते ‘टी-20’मध्ये कधीही बांगलादेशकडून हरलेले नाहीत आणि वर्ल्ड कपच्या मागील दोन स्पर्धांतील सामन्यांतही त्यांनी बांगलादेशला पराभूत केलेले आहे. बांगलादेशने श्रीलंकेवर विजय मिळवून आपल्या मोहिमेची सुऊवात केलेली असल्यामुळे त्यांचे मनोबलही वाढलेले असेल. पण दक्षिण आफ्रिकेप्रमाणे बांगलादेशच्या फलंदाजांनाही चांगली कामगिरी करावी लागेल. भारताविऊद्धच्या सराव सामन्यात आणि श्रीलंकेविऊद्धही त्यांना संघर्ष करावा लागला होता.
बांगलादेशच्या वरच्या फळीला कोसळण्याची सवय आहे आणि लिटन दासने चांगली कामगिरी केलेली असली, तरी इतरांना अधिक जबाबदारीने फलंदाजी करावी लागेल. अष्टपैलू शाकिब अल हसन गोलंदाजी किंवा फलंदाजीतही चमकलेला नसून हा बांगलादेशसाठी चिंतेचा विषय आहे. बांगलादेशच्या वेगवान माऱ्यात प्रतिस्पर्ध्यांच्या वरच्या फळीला सतावू शकणारा अस्सल वेगवान गोलंदाज् नाही. त्यामुळे अनेक पॉवर हिटर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या मजबूत फलंदाजीविरुद्ध त्यांच्यावर संघर्ष करण्याचा प्रसंग येऊ शकतो.
सामन्याची वेळ : रात्री 8 वा. (भारतीय वेळेनुसार)