नागरिक, जनावरांना नियोजनबद्ध पाणी पुरवा

जिल्हाधिकाऱ्यांची सूचना : संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्याची तयारी बेळगाव : पुढील दोन महिन्यांच्या काळात नागरिक व जनावरांसाठी पिण्याचे पाणी व चाऱ्याची समस्या होऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी. खासकरून ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी सतत बैठका घेऊन कोणत्याही समस्या उद्भवल्यास त्या दूर करण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना केली […]

नागरिक, जनावरांना नियोजनबद्ध पाणी पुरवा

जिल्हाधिकाऱ्यांची सूचना : संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्याची तयारी
बेळगाव : पुढील दोन महिन्यांच्या काळात नागरिक व जनावरांसाठी पिण्याचे पाणी व चाऱ्याची समस्या होऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी. खासकरून ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी सतत बैठका घेऊन कोणत्याही समस्या उद्भवल्यास त्या दूर करण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. शुक्रवार दि. 29 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाची बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षपदावरून बोलताना जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, दुष्काळी स्थिती हाताळण्यासाठी अनुदानाची कमतरता नाही. दुष्काळी भागात जनावरांसाठी पाणी, चाऱ्याची टंचाई भासू नये, याची काळजी घेण्याची सूचना त्यांनी केली. जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. जवळच्या धरणातील पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन गरजेनुसार धरणातून पाणी सोडावे. हिप्परगी धरणातून ककमरी, झुंजरवाड गावांना पिण्याचे पाणी सोडण्याची गरज असून यासाठी 100 क्युसेक पाणी सोडण्यासाठी प्रादेशिक आयुक्तांना पत्र पाठविण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना केली.
जिल्ह्यातील धरणातील पाणीपातळी घटत आहे. त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी नदीकाठावरील विद्युत मोटारींचे वीजकनेक्शन तोडावे. जेथे पिण्याच्या पाण्याची गरज आहे, तेथे त्वरित पाणी सोडण्यासाठी पावले उचलावीत. अथणी, कागवाड भागातील परिस्थितीचा आढावा घेऊन धरणातून पाणी सोडण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात येतील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. सरकारच्या मार्गसूचीनुसार सिंगल फेज वीज द्यावी. घरगुती वीजपुरवठा खंडित होऊ नये. पिण्याच्या पाण्यासाठी रोज एक तास थ्री फेज वीज द्यावी, अशी सूचना जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी केली. या बैठकीत जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, मनपा आयुक्त लोकेश, जि. पं. चे मुख्य योजना संचालक गंगाधर दिवटर, कृषी खात्याचे सहसंचालक शिवनगौडा पाटील, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. महेश कोनी, पशुसंगोपन खात्याचे उपसंचालक डॉ. राजीव कुलेर यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.