मोदींच्या वक्तव्यानंतर पाकिस्तानचा इशारा

भारताने दुस्साहस केल्यास प्रत्युत्तर देण्यास हयगय करणार नाही वृत्तसंस्था/ इस्लामाबाद पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अलिकडेच विरोधी पक्षांवर निशाणा साधताना पाकिस्तानला ‘बांगड्या भरवू’ असे वक्तव्य केले होते, या वक्तव्यामुळे आता पाकिस्तानची आगपाखड होत आहे. भारताच्या नेत्याने निवडणुकीतील लाभासाठी पाकिस्तानला स्वत:च्या देशांतर्गत राजकारणात ओढण्याचा प्रकार थांबवावा. भारताने कुठल्याही प्रकारचे दुस्साहस केल्यास प्रत्युत्तर देण्यास हयगय करणार नसल्याचा इशारा पाकिस्तानच्या […]

मोदींच्या वक्तव्यानंतर पाकिस्तानचा इशारा

भारताने दुस्साहस केल्यास प्रत्युत्तर देण्यास हयगय करणार नाही
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अलिकडेच विरोधी पक्षांवर निशाणा साधताना पाकिस्तानला ‘बांगड्या भरवू’ असे वक्तव्य केले होते, या वक्तव्यामुळे आता पाकिस्तानची आगपाखड होत आहे. भारताच्या नेत्याने निवडणुकीतील लाभासाठी पाकिस्तानला स्वत:च्या देशांतर्गत राजकारणात ओढण्याचा प्रकार थांबवावा. भारताने कुठल्याही प्रकारचे दुस्साहस केल्यास प्रत्युत्तर देण्यास हयगय करणार नसल्याचा इशारा पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने दिला आहे.
आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायाला भारतीय नेत्यांच्या आक्रमक वक्तव्यांकडे लक्ष देण्याचे आवाहन करतो. भारतातील हा प्रकार क्षेत्रीय शांतता आणि स्थैर्यासाठी गंभीर धोका असल्याचा दावा पाकिस्तानी विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज जहरा बलोच यांनी पंतप्रधान मोदी आणि अन्य कॅबिनेट मंत्र्यांच्या पाकिस्तानसंबंधीच्या टिप्पणींवर केला आहे.
भारतात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भारतीय नेत्यांकडून पाकिस्तानच्या विरोधात वक्तव्यं करण्यात येत आहेत. ही वक्तव्य पाकिस्तानसंबंधीचा द्वेष दर्शवित आहेत. अशाप्रकारच्या वक्तव्यांमधून हे नेते अति-राष्ट्रवादाचा लाभ उचलू पाहत असल्याचे स्पष्ट होते. ही वक्तव्यं देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय टीकेपासून लक्ष विचलित करण्याच्या एका हताश प्रयत्नाचे संकेत देत असल्याचा दावा पाकिस्तानी प्रवक्त्याने केला आहे.
स्वत:च्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याचा पाकिस्तानच्या रणनीतिक क्षमतेचा उद्देश आहे. पाकिस्तानने यापूर्वीही स्वत:चे रक्षण करण्याचा संकल्प दाखवून दिला आहे. जर भारताने कुठल्याही प्रकारचे दुस्साहस केले तर चोख प्रत्युत्तर देऊ असे बलोच म्हणाल्या.
पंतप्रधान मोदींचे वक्तव्य
पाकिस्तानव्याप्त काश्मीवर बळाच्या जोरावर कब्जा करण्याची गरज नाही, तेथील लोक स्वत:च भारतात सामील होतील असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले होते. यावर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी पाकिस्तानने बांगड्या भरलेल्या नाहीत, त्याच्याकडे अणुबॉम्ब असल्याचे वक्तव्य केले होते. काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांना रात्री स्वप्नात पाकिस्तानचा अणुबॉम्ब दिसतो, इंडिया आघाडीचे नेते पाकिस्तानने बांगड्या भरलेल्या नाहीत असे म्हणत आहेत. पाकिस्तानला आटा हवा आहे, तेथे वीज नाही, परंतु त्यांच्याकडे बांगड्या देखील नाहीत याची कल्पना नव्हती, पाकिस्तानला आम्ही बांगड्या भरवू असे टिप्पणी मोदींनी केली होती.