अमर होण्याचा ध्यास…

अमर होण्याचा ध्यास…

कोणालाही मरण आवडत नाही, ही त्रिकालाबाधित वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अनादिकाळापासून मानव ‘अमर’ होण्यासाठी उपायांची शोधशोध करीत आहे. तथापि, आजपर्यंत या संशोधनात अपयशच आले आहे. ‘अमरत्व’ हा केवळ एक कल्पनाविलास असून मानवासह प्रत्येक सजीवाला मृत्यू स्वीकारावाच लागतो, हेच सत्य आहे, असे तत्वज्ञांपासून शास्त्रज्ञांपर्यंत सर्वांनीच स्पष्ट पेले आहे.
तरी, आजही अमरत्व मिळविण्याचा ध्यास सुटलेला नाही. अनेक लोक तशी सिद्धी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जगभरातील प्रयोगशाळांमध्ये अमरत्व नसेल, पण निदानपक्षी माणसाचे आयुष्य सध्याच्या दुप्पट किंवा तिप्पट करता येईल का, यावर अथक संशोधन चाललेले आहे. तरीही आतापर्यंत या सर्व प्रयत्नांना गुंगाराच मिळाला आहे. अशा स्थितीत अमेरिकेतील एक उद्योगपती ब्रायन जॉन्सन हे अमरत्व मिळविण्याच्या मागे लागलेले आहेत. एका अज्ञात बेटावर जाऊन त्यांनी अत्याधुनिक जनुकीय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्यांच्या वयवाढीचा वेग कमी करुन तारुण्य अधिक काळ कसे टिकून राहील, या संबंधी प्रयोग चालविलेले आहेत. काही वर्षांपूर्वी, त्यांनी प्रथम हे प्रयोग करुन पाहण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना जगभरात प्रसिद्धी मिळाली. मात्र, नंतर त्यांचे नाव मागे पडले. आता ते पुन्हा याच प्रयत्नांसाठी प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. आपल्या जनुकीय संरचनेत परिवर्तन करण्यासाठी ते बरीच धडपड करीत आहेत. काही प्रमाणात या प्रयत्नांना यश मिळाल्याचे प्रतिपादन ते करतात. त्यांचे खरे वय 46 वर्षांचे आहे. तथापि, ते त्यांच्या मूळ वयापेक्षा 20 वर्षे कमी वयाचे दिसतात, असे त्यांच्या निकटवर्तीयांचेही म्हणणे आहे. अलिकडेच जॉन्सन यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे.
या व्हिडीओत त्यांनी काही सनसनाटी बाबी स्पष्ट केल्या आहेत. मानव आपले वय कमी करु शकतो आणि त्यायोगे तो प्रदीर्घ काळ वृद्ध होण्यापासून स्वत:ला वाचवू शकतो. वृद्धत्व लांबविल्यास तो मृत्यूलाही बराच काळपर्यंत टाळू शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे. आहार, निद्रा, विहार आदी नियमांचे पालन काटेकोरपणे केल्यास मानव सहजगत्या 120 वर्षांपर्यंत जगू शकतो. त्याने प्रयत्नपूर्वक आपल्या जनुकीय संरचनेत परिवर्तन केल्यास त्याच आयुष्य याहीपेक्षा बरेच अधिक वाढू शकते, असे जॉन्सन म्हणतात. अर्थातच, अनेक तज्ञ त्यांच्या या प्रतिपादनाशी सहमत नाहीत. पण जगाचे लक्ष त्यांनी स्वत:कडे वेधून घेतले आहे हे निश्चित.