राममंदिर प्राणप्रतिष्ठेतील मुख्य पुजारींचे निधन

राममंदिर प्राणप्रतिष्ठेतील मुख्य पुजारींचे निधन

लक्ष्मीकांत दीक्षित यांच्यावर मणिकर्णिका घाटावर अंत्यसंस्कार
वृत्तसंस्था/ वाराणसी
अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातील प्रमुख आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. 86 वषीय आचार्य गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराने त्रस्त होते. प्राणप्रतिष्ठा आयोजित करणाऱ्या पुरोहितांच्या संघात लक्ष्मीकांत दीक्षित यांचा समावेश होता. त्यांच्यावर मणिकर्णिका घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अयोध्येतील राम मंदिराचे पावित्र्य साधणारे मुख्य आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी शोक व्यक्त केला आहे.
दीक्षितजी हे काशीच्या विद्वान परंपरेतील एक प्रसिद्ध व्यक्ती होते. वाराणसी येथे शनिवारी सकाळी 6.45 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशाचे महान विद्वान आणि सांगवेद विद्यालयाचे यजुर्वेद शिक्षक अशी त्यांची ओळख होती. लक्ष्मीकांत दीक्षित हे मूळचे महाराष्ट्रातील सोलापूर जिह्यातील असले तरी त्यांचे कुटुंब अनेक पिढ्यांपासून काशी येथे वास्तव्यास आहे. त्यांच्या पूर्वजांनी नागपूर व नाशिक या संस्थानांतही धार्मिक विधी केले. ते उपासनेच्या पद्धतीचे तज्ञ होते आणि मीरघाट, वाराणसी येथे असलेल्या सांगवेद महाविद्यालयाचे वरिष्ठ आचार्य होते. संस्कृत भाषा आणि भारतीय संस्कृतीसाठी त्यांनी बहुमूल्य सेवा बजावली आहे