नितीशकुमार यांचा यादवांवर हल्लाबोल

नितीशकुमार यांचा यादवांवर हल्लाबोल

बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल आणि आमचे संयुक्त सरकार असण्याच्या काळात तेजस्वी यादव यांनी अनेक चुकीची कामे केल्याने त्यांची संगत सोडावी लागली, असा गौप्यस्फोट त्या राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केला आहे. तेजस्वी यादवांच्या कृत्यांमुळे आम्ही त्यांना सत्तेपासून दूर पळविले. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांच्या चुकीच्या कृत्यांची फाईल आम्ही उघडी करणार आहोत, असा इशाराही नितीश कुमार यांनी एका प्रचारसभेत बोलताना दिला.
राष्ट्रीय जनता दलासमवेत आमचे सरकार असताना माझ्या धोरणामुळे लोकांना मोठ्या प्रमाणावर सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या होत्या. तथापि, आता तेजस्वी यादव या धोरणाचे श्रेय हिसकाविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी त्यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या काळात एकही काम योग्यरितीने केले नाही. पण आज ते श्रेय घेण्यासाठी मात्र पुढे सरसावले आहेत, असा आरोप त्यांनी केला. प्रसारमाध्यमेही त्यांना वाजवीपेक्षा जास्त प्रसिद्धी देत आहेत, अशी तक्रारही त्यांनी केली.