मुंबईच्या चाहत्यांनी उडवली हार्दिक पांड्याची हुर्यो, पुढे काय झालं?
मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या सामन्यात वानखेडे स्टेडियमवर मुंबईचा कर्णधार म्हणून मैदानात आलेल्या हार्दिक पंड्याला चाहत्यांच्या नाराजीचा सामना करावा लागला. रोहित शर्माला मुंबईच्या कर्णधारपदावरून हटवल्यामुळे यंदा मुंबईचे चाहते नाराज दिसतायत. त्यामुळे संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या जाईल तिथे ट्रोल होतोय.
पहिल्या दोन सामन्यात अहमदाबाद आणि हैदराबादमध्येही पंड्याला चाहत्यांच्या नाराजीचा सामना करावा लागला. त्यात मुंबईच्या संघाला पराभव पत्करावा लागल्यामुळे सोशल मीडियावरही हार्दिक पंड्यावर टीका केली जातेय.1 एप्रिलला पहिल्यांदाच मुंबईचा संघ घरच्या मैदानावर उतरला होता. तिथेही चाहत्यांनी रोहित शर्माच्या नावाचा जयघोष करून हार्दिक पंड्याच्या विरोधात शेरेबाजी केली.
भारत आणि भारताचं क्रिकेटप्रेम
भारतात क्रिकेटसोबत कोट्यवधी लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत. क्रिकेटवेड्यांचा देश म्हणून जगभर ख्याती मिळवलेल्या या देशात आयपीएल सुरु झालं आणि आजवर एकाच संघाचं समर्थन करणारे भारतीय क्रिकेट चाहते आता आपापल्या आवडीच्या आयपीएल संघाचं समर्थन करू लागले.
आयपीएल सुरु झाल्यापासून मुंबई, चेन्नई, कोलकाता, गुजरात, बंगळुरू अशा संघांनी देशभर चाहते कमावले आहेत. मुंबई आणि चेन्नईच्या संघाने तर पाचवेळा आयपीएल जिंकून या स्पर्धेत वर्चस्व राखलं आहे.मागच्या दीड दशकांमध्ये आयपीएल खेळणाऱ्या प्रत्येक संघाने आपापला चाहतावर्ग तयार केलाय. आयपीएलमुळे अनेक खेळाडूंचे कोट्यवधी चाहते तयार झालेत. मुंबई इंडियन्सचा संघही त्याला अपवाद नाही.
कर्णधार बदलल्यामुळे यंदा मुंबईचे असंख्य चाहते नाराज
2024चा आयपीएल स्पर्धा सुरु होण्यापूर्वी गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सने त्यांच्या संघात घेतलं.
हार्दिकला मुंबईचा कर्णधार बनवलं गेलं पण यामुळे मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माचे चाहते नाराज झाले.
कधीकाळी रोहितच्या नेतृत्वात खेळलेल्या हार्दिकला संघाची कमान देणं अनेकांना आवडलं नाही.
दोन वर्षांपूर्वी हार्दिक मुंबई इंडियन्सचाच एक महत्त्वाचा खेळाडू होता याचाही या चाहत्यांना विसर पडला आणि त्यांनी कर्णधार म्हणून मैदानात उतरलेल्या हार्दिकची हुर्यो उडवायला सुरुवात केली.
मुंबई इंडियन्सने पहिले दोन सामने अहमदाबाद आणि हैदराबादच्या मैदानावर खेळले.
पहिल्याच सामन्यात हार्दिक रोहित शर्माला ‘डीप लॉन्ग-ऑन’ला फिल्डिंगसाठी पाठवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर हार्दिकवर टीका होऊ लागली.
आर आश्विन आणि संजय मांजरेकर यांनी चाहत्यांना सुनावलं
हार्दिक पंड्यावर होत असलेली टीका बघून राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या फिरकीपटू आर अश्विनने नाराजी व्यक्त केली.
अश्विनने चाहत्यांना हार्दिक पंड्यावर टीका न करण्याची विनंती तर केलीच पण चाहत्यांनी एक भारतीय खेळाडू म्हणून त्याचा सन्मान केला पाहिजे असंही तो म्हणाला.
सोमवारी (1 एप्रिलला) नाणेफेकीसाठी मैदानात आलेल्या हार्दिकला पाहून चाहत्यांनी पुन्हा एकदा त्याची हुर्यो उडवली. सामना बघायला आलेल्या अनेकांनी ‘रोहित शर्मा’च्या नावाचा उद्घोष केला पण हे बघून समालोचन करणाऱ्या संजय मांजरेकर यांनी मात्र चाहत्यांना ‘शिस्त पाळण्याचा’ सल्ला दिला.
या घटनेनंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सला फारशी समाधानकारक कामगिरी करता आली नाही.माजी कर्णधार रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेव्हिस आणि नमन धीर या आघाडीच्या फलंदाजांना तर भोपळाही फोडता आला नाही. कर्णधार हार्दिक पंड्याने सहा चौकार खेचत 21 चेंडूत 34 धावांची खेळी केली पण मुंबईचा संघ फारशी मोठी धावसंख्या उभारू शकला नाही.
Published By- Priya Dixit