MPSC/UPSC उमेदवारांच्या स्वप्नांचा बाजार…सोशल स्टेटस, ग्लॅमर !

जीव तोडून अभ्यास केला तर आपणही एक दिवस सरकारी अधिकारी होऊ. त्यानंतर आपली पण गुलाल उधळून मिरवणूक काढली जाऊ शकते. हा दुर्दम्य आत्मविश्वास मनाशी ठेवून उमेदवार अहोरात्र अभ्यास करतात. पण ही गोष्ट अगदी थोड्या जणांच्या बाबतीत खरी होते इतर उमेदवारांचं पुढे काय होतं? त्यांच्या पदरी मात्र निराशा पडते.

“दरवर्षी लाखो मुले आणि मुली स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. त्यापैकी 99.99 टक्के उमेदवारांना यश मिळत नाही. मग परीक्षा पास न झालेला एवढा मोठा वर्ग शेवटी करतो काय? आजकाल फ्रेशर मुलांनाच खासगी क्षेत्रात जॉब मिळणं कठीण झालंय. मग 4-5 वर्षं गॅप पडलेल्या मुलांना कोण नोकरी देणार?”

पुण्यातील सदाशिव पेठेत जीवन आघाव या तरुणाशी चर्चा करताना त्याने सांगितलेली ही बाब स्पर्धा परीक्षा दुनियेबद्दल अनेक गोष्टी सांगून जाते.

ग्रॅज्यूएशन झालं की अनेक तरुण आणि तरुणी स्पर्क्षा परीक्षेकडे वळतात. IAS, IPS, DySP, DC अशा पोस्टची त्यांना स्वप्नं पडू लागतात.

पालकांनासुद्धा आपली मुलगी कलेक्टर होईल, आपला मुलगा पोलीस अधिकारी होईल, असं वाटतं.

जीवन आघावने चार वर्षं स्पर्धा परीक्षांची तयारी केल्यानंतर शेवटी त्याचा अभ्यास थांबवला.

जीवन आघावने चार वर्षं स्पर्धा परीक्षांची तयारी केल्यानंतर शेवटी त्याचा अभ्यास थांबवला.

सुरुवातीची 1 ते 2 वर्षं ही परीक्षा काय आहे? त्याचा नेमका अभ्यास कसा करावा? यातच जातात.

मग तिसऱ्या आणि चौथ्या वर्षी उमेदवार खडबडून जागे होतात. पुढच्या वर्षी आपण ही परीक्षा कोणत्याही परिस्थितीत पास करायची, अशी खूणगाठ बांधतात. पण काही मोजके उमेदवार सोडले तर अनेकजणांसाठी वास्तव अंधारमय ठरतं.

असं असतानाही अपयशाचं सुतक सोडून पुन्हा तयारीला लागतात. यामध्ये हजारो तरुण आणि तरुणींच्या आयुष्यातील 4 ते 5 वर्षं कशी जातात, हेच कळत नाही.

आधी केवळ IAS किंवा DySP हेच पद मिळवणार अशी डोक्यातली हवा निघून जाते. आता फक्त नोकरी कशी मिळवायची याची ओढ लागते. मग सरकारी पातळीवर निघणाऱ्या सर्व जाहीरातींना फॉर्म भरणं सुरू होतं. BSc Agriculture, MA, MSc, Engineering, Medical ची डिग्री असूनही तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक अशा पदांसाठी फॉर्म भरणं सुरू होतं.

या स्टेजनंतर अनेक उमेदवार बेरोजगारी आणि नैराश्य अशा दोन्हींच्या जाळ्यात अडकत जातात. यातून त्यांना बाहेर पडणं अनेकदा कठीण जातं.

‘स्पर्धा परीक्षा – बेरोजगारी – नैराश्य’ या कालचक्रात महाराष्ट्रातील प्रज्ञावान तरुणपिढी कशी अडकतेय, हेच आपण या लेखातून जाणून घेऊयात.

त्याआधी MPSC परीक्षेत यशस्वी होण्याचं प्रमाण पाहुयात.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग वार्षिक अहवाल

महाराष्ट्र लोकसेवा आयोग वार्षिक अहवाल

लाखो मुली आणि मुले स्पर्धा परीक्षेकडे का वळतात?

पुण्यातील सदाशिव पेठ हा परिसर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या महाराष्ट्रातल्या मुला-मुलींसाठी स्पर्धा परीक्षेची पंढरी बनला आहे.

विशेषत: महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मुलं अधिकारी होण्याचं स्वप्न घेऊन सदाशिव पेठेत राहतात.

दरवर्षी देशातून UPSC ची परीक्षा देणाऱ्यांची संख्या 13 ते 14 लाख असते. तर MPSC देणाऱ्यांची संख्या जवळजवळ तीन ते चार लाख असते.

पण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दरवर्षी सगळ्या परीक्षा मिळून केवळ दोन ते अडीच हजार जागांची जाहीरात काढली जाते. तरीही स्पर्धा परीक्षा करणाऱ्या इथल्या मुलांची संख्या कमी होत नाही.

या विश्वाचं ग्लॅमर, सोशल स्टेटस, पालकांच्या अपेक्षा आणि कोचिंग क्लासवाल्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी या कारणांमुळे इथे गर्दी वाढत असल्याचं सांगितलं जातं.

या सर्व कारणांमुळे सदाशिव पेठेत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या हजारो मुलांच्या स्वप्नांचा बाजार भरतोय, असं जीवन आघाव याने बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

मुळचा हिंगोली जिल्ह्यातील जीवन 2014साली पुण्यात आला आणि त्याने MPSCचा अभ्यास सुरू केला.

इंजिनिअरींग केल्यानंतर जॉब मिळाला नाही. म्हणून तो स्पर्धा परीक्षेकडे वळाला. त्याने पुढे चार वर्षं MPSC परीक्षेचा अभ्यास केला. पण हाती यश मिळालं नाही.

शेवटी त्याने MPSC चा अभ्यास थांबवला आणि यूट्यूबर म्हणून काम सुरू केलं.

याविषयी आमच्या प्रतिनिधी ने स्पर्धा परीक्षांसाठी अनेक वर्षांपासून मार्गदर्शन करणाऱ्या पुण्यातील प्रवीण चव्हाण यांच्याशी चर्चा केली.

ते सांगतात, “कोचिंग क्लासच्या मालकांनी स्पर्धा परीक्षा विश्वाचा मोठा फुगा केला आहे. अवाजवी आश्वासनांच्या जाहीराती केल्या जातात. त्यामुळे कॉलेजमधील विद्यार्थी या मार्केटच्या प्रलोभनाच्या जाळ्यात येतात.

“MPSC आणि UPSC परीक्षा पास झाल्यानंतर कोचिंग क्लासकडून यशस्वी उमेदवारांच्या भाषणांचे समारंभ घेतले जातात. त्याठिकाणी नुकतंच यश मिळवलेले काही उमेदवार स्वत:च्या गोष्टी रंगवून भाषण करतात.

पुण्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी समृद्धी निकमच्या मतेही सोशल मीडियावरील यशस्वी उमेदवारांच्या मुलाखती विद्यार्थ्यांवर मोठा प्रभाव टाकतात.

“स्पर्धा परीक्षा हे सतत ट्रेंडमध्ये राहिलेलं क्षेत्र आहे. सोशल मीडियामुळे अधिकाऱ्यांच्या मुलाखती पाहून विद्यार्थी अति उत्साहित होतात. काही ठराविक उमेदवार सोडले तर अनेकजण आपण किती कष्ट घेतले, घरची परिस्थिती चांगली असतानाही हलाखीचं जीवन जगल्याचं सांगतात. त्यामुळे त्याचा प्रभाव कॉलेजमधील विद्यार्थ्यांवर पडतो. मग आपणही अधिकारी व्हायला पाहिजे, असं त्यांना वाटतं.”

ती पुढं सांगते, “पालकांनाही वाटतं की आपली मुलगी/मुलगा अधिकारी व्हावा. आपली आर्थिक स्थिती तर अमुक यशस्वी उमेदवरापेक्षाही चांगली आहे. आपल्या मुलाला या परीक्षेची तयारी करताना काहीच अडचण येणार नाही, असा विचार त्यांच्या मनात घर करतो. त्यामुळे नकळत पालकांचे मुलांवर प्रेशर वाढतं.”

दुसरं कारण म्हणजे, सरकारी नोकरीमागे दडलेलं ‘सोशल स्टेटस’. केंद्र सरकारने अधिकाऱ्यांच्या वाहनांचा लाल दिवा काढून घेतला आहे. पण लाल दिव्याचं आकर्षण अजूनही कायम आपल्या समाजात राहिलं आहे.

शेवटी ते सरकारी दरबारात नोकरी करत असले तरीही समाजात त्यांना वेगळी प्रतिष्ठा दिली जाते.

तहसिलदार, जिल्हाधिकारी, पोलीस निरीक्षक, पोलीस अधीक्षक यांना समाजात एक वेगळं स्थान देण्यात आलं आहे. सोबत त्यांच्याकडे असणारे अधिकार आणि सरकारी लवाजमा याचा सामान्य लोकांच्या मनावर मोठा प्रभाव पडतो.

UPSC फाईल फोटो

UPSC फाईल फोटो

ज्या घरात एखादी व्यक्ती अधिकारी असते, तेव्हा त्यांच्या घरातील आणि नातेवाईकातील मुलांवर अधिकारी होण्याचं प्रेशर आणखी वाढल्याचं दिसतंय, असं प्रवीण चव्हाण यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपण स्पर्धा परीक्षेकडे का आलो? याचं नेमक कारण न शोधताच अनेकजण या दुनियेत येतात.

मित्र अधिकारी झाला किंवा आईवडिलांची इच्छा आहे किंवा इतर ठिकाणी नोकरी मिळाली नाही अशा कारणांमुळे विद्यार्थी या क्षेत्रात वळाल्याचंही सांगितलं जातं.

स्पर्धा परीक्षांचं कालचक्र

ग्रॅज्युएशन संपलं की मुलं-मुली या क्षेत्राकडे वळतात. आयुष्यातल्या विशीतला तो काळ असतो. लाथ मारेल तिथून पाणी काढण्याची धमक असते.

आयुष्याचा तो सोनेरी काळ म्हणून ओळखला जातो. पण ‘पूर्व परीक्षा – मुख्य परीक्षा – मुलाखत आणि पुन्हा पूर्व परीक्षा’ या कालचक्रात हजारो मुलामुलींच्या उमेदीची वर्षं धुळीस जातात, असं जीवन जड अंतकरणाने सांगतो.

तर समृद्धीच्या मते, काही उमेदवार हे 1-2 मार्कांनी आपली पोस्ट निघाली नाही. त्यामुळे आपण आणखी एकदा प्रयत्न करू, असं करण्यात उमेदवारांची 2-3 वर्षं या चक्रात वाढतात.

दुसरीकडे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सोडला तर करायचं काय? हा यक्षप्रश्न या उमेदवारांसमोर असतो.

याविषयी बोलताना जीवन सांगतो की,”मला इंजिनिअरिंग नंतर प्लेसमेंट मिळाली नाही. त्यामुळे मी स्पर्धा परीक्षेकडे वळलो. म्हणजे फ्रेशर मुलांनाच मार्केटमध्ये नोकरी नाही. तर मग 5-6 वर्षं गॅप पडलेल्या मुली-मुलांना कोण नोकरी देणार?”

स्पर्धा परीक्षेच्या चक्रात अडकून राहण्याचं मूळ कारण हे आपल्या शिक्षण व्यवस्थेत असल्याचं प्रवीण चव्हाण यांना वाटतं. कारण विकसित देशांप्रमाणे आपल्याकडे शालेय जीवनापासून मुलांच्या कौशल्य विकासाकडे लक्ष दिलं जात नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षा क्षेत्र सोडलं तर पुढे काय करायचं याचं उत्तर मुलांना मिळत नाही.

धाडस, पैसा आणि कौशल्य नसल्याने मुले इतर व्यवसाय करू शकत नाहीत. तसंच कामाचा अनुभव नसल्याने खासगी क्षेत्रात नोकरी मिळत नाही.

ते पुढं सांगतात की, मधल्या काळात महाराष्ट्र सरकारकडून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांसाठी मासिक भत्ता सुरू केला आहे.

bharat live news media

अनेक वर्षं तयारी केल्याने नैराश्य?

कॉलेज संपल्यानंतर अनेक वर्षं या परीक्षेची तयारी केल्याने आणि हाती काहीच यश न मिळाल्याने उमेदवार मोठ्या संख्येने नैराश्याच्या छायेत असल्याचं समोर येत आहे.

मीडियातील बातम्यांनुसार, काही उमेदवारांनी ही परीक्षा पास होऊ न शकल्याने खचून आयुष्य संपवल्याचंही दिसून आलं आहे.

“माणसाला कोणत्याही क्षेत्रात असलं तरी नैराश्य येऊ शकतं. पण या क्षेत्रात नैराश्याकडे वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलीने किंवा मुलाने घरी जाऊन सांगितलं की मला नैराश्य येत आहे. तर घरचे मला वेड्यात काढू शकतात, याची मुलांना जास्त भीती वाटते. त्यामुळे नैराश्याची धोक्याची घंटा वाजत असतानाही अनेकजण गुपचूप राहतात,” असं जीवन आघाव आपल्या मित्रांच्या अनुभवातून सांगतो.

स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांच्या नैराश्याच्या केसेस हाताळणाऱ्या पुण्यातल्या काऊन्सिलर श्रुतकिर्ती फडणवीस सांगतात, “अनेक वर्षं अभ्यास करणाऱ्या मुलांवर सामाजिक दबाव वाढलेला असतो. आपण ही परीक्षा पास होऊ शकत नाही, म्हणजे आपली काहीच किंमत नाही. आपण अधिकारी झालो नाही तर आयुष्यात काहीच उरलं नाही, अशी भावना वाढत जाते. हळूहळू आपलं आयुष्य व्यर्थ वाटू लागतं. चिडचिडेपणा वाढतो. कशातही मन लागत नाही.”

Add Comment