ऑलिम्पिकसाठी पुरुष हॉकी संघाची घोषणा
हरमनप्रीत सिंग कर्णधार, हार्दिक सिंग उपकर्णधारपदी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पुढील महिन्यात होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी 16 सदस्यीय भारतीय पुरुष हॉकी संघाची घोषणा करण्यात आली असून हरमनप्रीत सिंगकडे या संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे तर हार्दिक सिंग उपकर्णधार असेल. या संघात मागील ऑलिम्पिकमध्ये खेळलेल्या काही खेळाडूंचा समावेश आहे तर पाच खेळाडू ऑलिम्पिकमध्ये प्रथमच खेळणार आहेत.
2020 मध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने कांस्यपदक मिळविले होते. यावेळी त्यांचा ब गटात समावेश करण्यात आला असून याच गटात विद्यमान चॅम्पियन बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, अर्जेन्टिना, न्यूझीलंड व आयर्लंड यांचाही समावेश आहे. गट अ मध्ये नेदरलँड्स, जर्मनी, ग्रेट ब्रिटन, स्पेन, दक्षिण आफ्रिका, यजमान फ्रान्स यांचा समावेश आहे. गुणतक्त्यात आघाडीवरील चार संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. भारतीय खेळाडू सध्या बेंगळूरमधील साई केंद्रात सुरू असलेल्या शिबिरात ऑलिम्पिकची तयारी करीत आहेत.
अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेश व मिडफिल्डर मनप्रीत सिंग चौथ्यांदा ऑलिम्पिकमध्ये खेळणार आहेत तर कर्णधार हरमनप्रीतची ही तिसरी ऑलिम्पिक स्पर्धा असेल. जर्मनप्रीत सिंग, संजय, राज कुमार पाल, अभिषेक व सुखजीत सिंग हे पाच खेळाडू ऑलिम्पिकपदार्पण करतील. टोकियो ऑलिम्पिकमध्ये चांगले प्रदर्शन करीत भारताने 41 वर्षानंतर ऑलिम्पिक पदक मिळविले होते. आता डिफेंडर रुपिंदर पाल सिंग, बिरेन्दा लाक्रा निवृत्त झाले आहेत तर सुरेंदर कुमार संघाबाहेर आहे. निलकांता शर्मा टोकियोमध्ये संघाचा सदस्य होता, पण यावेळी त्याला पर्यायी खेळाडू म्हणून ठेवण्यात आले आहे. पण दिलप्रीत सिंगची संधी हुकली आहे. गोलरक्षक कृशन पाठक पर्यायी गोलरक्षक म्हणून कायम असून त्याची ही सलग दुसरी ऑलिम्पिक स्पर्धा आहे.
ऑलिम्पिकमध्ये भारताची सलामीची लढत 27 जुलै रोजी न्यूझीलंडविरुद्ध होईल. त्यानंतर 29 जुलै रोजी अर्जेन्टिना, 30 जुलै रोजी आयर्लंड, 1 ऑगस्ट रोजी बेल्जियम, 2 ऑगस्ट रोजी ऑस्ट्रेलिया या संघांविरुद्ध सामने होतील. भारताने आजवर एकूण 12 ऑलिम्पिकपदके मिळविली असून त्यात 8 सुवर्ण, 1 रौप्य व 3 कांस्यपदकांचा समावेश आहे.
ऑलिम्पिकसाठी निवडलेला भारतीय हॉकी संघ : गोलरक्षक-पीआर श्रीजेश, बचावपटू-जर्मनप्रीत सिंग, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंग, सुमित, संजय. मध्यफळी-राजकुमार पाल, शमशेर सिंग, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद. आघाडी फळी-अभिषेक, सुखजीत सिंग, ललित कुमार उपाध्याय, मनदीप सिंग, गुर्जंत सिंग. पर्यायी खेळाडू-निलकांता शर्मा, जुगराज सिंग, केएस पाठक.
Home महत्वाची बातमी ऑलिम्पिकसाठी पुरुष हॉकी संघाची घोषणा
ऑलिम्पिकसाठी पुरुष हॉकी संघाची घोषणा
हरमनप्रीत सिंग कर्णधार, हार्दिक सिंग उपकर्णधारपदी वृत्तसंस्था/ नवी दिल्ली पुढील महिन्यात होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी 16 सदस्यीय भारतीय पुरुष हॉकी संघाची घोषणा करण्यात आली असून हरमनप्रीत सिंगकडे या संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे तर हार्दिक सिंग उपकर्णधार असेल. या संघात मागील ऑलिम्पिकमध्ये खेळलेल्या काही खेळाडूंचा समावेश आहे तर पाच खेळाडू ऑलिम्पिकमध्ये प्रथमच खेळणार आहेत. 2020 मध्ये […]