नेपाळी धर्मगुरु बाल लैंगिक शोषणाप्रकरणी दोषी

नेपाळी धर्मगुरु बाल लैंगिक शोषणाप्रकरणी दोषी

12 वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता : मारहाणीचाही आरोप
वृत्तसंस्था/ काठमांडू
नेपाळी धर्मगुरु रामबहादुर बोमजन 15 वर्षीय साध्वीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरला आहे. बुद्ध बॉय या नावाने ओळखल्या जाणाऱ्या 33 वर्षीय राम बहादुरला जानेवारी महिन्यात लैंगिक शोषणासोबत 4 जणांच्या अपहरणाप्रकरणी अटक करण्यात आली होती.
सरलाही न्यायालयाने लैंगिक शोषणाप्रकरणी राम  बहादुरला दोषी ठरविले असून आता 1 जुलै रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे. राम बहादुरला किमान 12 वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे. रामबहादुरने 2016 मध्ये 15 वर्षीय साध्वीचे लैंगिक शोषण केले होते.
जानेवारी महिन्यात रामबहादुरच्या घरात झडती घेण्यात आली असता 30 दशलक्ष नेपाळी रुपये (सुमारे 2 कोटी रुपये) हस्तगत झाले होते. याचबरोबर 16 देशांचे चलन सापडले होते. रामबहादुर हा पाणी, अन्न आणि झोपेशिवाय साधना करायचा, याचमुळे त्याला ‘बुद्ध बॉय’ या नावाने ओळखले जात होते.
बोमजनवर भाविक आणि साध्वींचे शारीरिक तसेच लैंगिक शोषण करण्याचा आरोप आहे. भाविक आणि साध्वींना तो मारहाण करायचा असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. भाविक आणि साध्वी तपस्येदरम्यान मला त्रास द्यायचे, याचमुळे मी त्यांना मारहाण करत होतो असा दावा बोमजनने केला आहे.
2010 मध्ये बोमजनच्या विरोधात मारहाणीच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. तर काही लोक बेपत्ता होण्यामागे त्याचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. बोमजन हा दीर्घकाळापासून फरार होता. अनेक वर्षांच्या तपासानंतर त्याला अटक झाली होती.
2018 मध्ये एका 18 वर्षीय साध्वीने बोमजनवर बलात्काराचे आरोप केले हेत. यानंतर 2019 मध्ये बोमजनचे 4 अनुयायी बेपत्ता झाले होते. या अनुयायांच्या परिवारांनी बोमजन विरोधात तक्रार नोंदविली होती.