एका षटकात 43 धावा!

एका षटकात 43 धावा!

कौंटी क्रिकेटच्या इतिहासातील महागडे षटक, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनची तुफानी धुलाई
वृत्तसंस्था/ लंडन
कौंटी क्रिकेटमध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली. कौंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन 2 मध्ये ससेक्स आणि लीसेस्टरशायर यांच्यात सामना खेळला गेला. ज्यामध्ये ससेक्सकडून खेळत असलेल्या ओली रॉबिन्सनने एकाच षटकात 43 धावा दिल्या. लीसेस्टरशायरच्या लुईस किम्बरने त्याच्या षटकात इतक्या धावा केल्या आहेत. या षटकात रॉबिन्सनने 3 नो बॉल आणि तिन्ही नो बॉलवर लुईस किम्बर चौकार मारले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा खर्च करणारा रॉबिन्सन दुसरा गोलंदाज ठरला. विशेष म्हणजे, कौंटी चॅम्पियनशिपच्या 134 वर्षाच्या इतिहासातील हे सर्वात महागडे षटक म्हणून नोंदवले जाणार आहे.
येथील 23 ते 26 जून दरम्यान ससेक्स विरुद्ध लीसेस्टरशायर यांच्यात सामना झाला. या सामन्यात ससेक्सने पहिल्या डावात 442 व दुसऱ्या डावात 296 धावा करत लीसेस्टरशायरला 464 धावांचे लक्ष्य दिले. लीसेस्टरशायरचा पहिला डाव 275 धावांवर आटोपला होता. दरम्यान, दुसऱ्या डावातही लीसेस्टरशायरचा संघ संघर्ष करत होता. त्यांची एकवेळ 7 बाद 175 अशी बिकट स्थिती होती. यावेळी आठव्या स्थानी लुईस किम्बर फलंदाजीला उतरला आणि सामन्याचे चित्रच बदलून गेले. अवघ्या 62 चेंडूत किम्बरने शतक ठोकले. आपल्या खेळीत किम्बरने चौकार व षटकारांची बरसात करताना 21 षटकार व 20 चौकारासह 243 धावांची खेळी साकारली. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. लीसेस्टरशायरचा संपूर्ण संघ 445 धावांवर ऑलआऊट झाला.
प्रथम श्रेणी क्रिकेटमधील दुसरे महागडे षटक
प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देण्याचा नकोशा विक्रम रॉबर्ट व्हॅन्सच्या नावावर आहे, ज्याने 77 धावा दिल्या होत्या. 1990 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हे सर्वात महागडे षटक पाहायला मिळाले होते. न्यूझीलंडचा माजी ऑफ ब्रेक गोलंदाज वर्ट वेन्स याने 1989-90 मध्ये वेलिंग्टन आणि कँटरबरी यांच्यात झालेल्या शेल चषकात 77 धावा खर्च केल्या होत्या. यानंतर ओली रॉबिन्सनने क्रिकेटमधील दुसरे महागडे षटक टाकले आहे. कौंटी क्रिकेटमध्ये नोबॉलवर दोन धावांचा दंड केला जातो.
रॉबिन्सनने टाकलेले षटक
पहिला चेंडू – षटकार
दुसरा चेंडू – नो बॉलवर चौकार
दुसरा चेंडू – चौकार
तिसरा चेंडू – षटकार
चौथा चेंडू – चौकार
पाचवा चेंडू – नो बॉलवर चौकार
पाचवा चेंडू – चौकार
सहावा चेंडू – नो बॉलवर चौकार
सहावा चेंडू – एक धाव