संततधारमुळे किनारपट्टीवरील सखल भागात पाणीच पाणी

संततधारमुळे किनारपट्टीवरील सखल भागात पाणीच पाणी

कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावरसह भटकळ तालुक्यात पावसाचा कहर : एनडीआरएफच्या जवानांकडून बचावकार्य
कारवार : जिल्ह्यातील मुंदगोड व हल्याळ या दोन तालुक्यांचा अपवाद वगळता इतर 10 तालुक्यात जोरदार पाऊस सुरूच आहे. किनारपट्टीवरील कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावर व भटकळ तालुक्यात पावसाने कहर केला आहे. सोमवारी सकाळी भटकळ तालुक्यात 215 मि.मी., होन्नावर 173 मि.मी., कारवार 170 मि.मी., अंकोला 115 मि.मी. आणि कुमठा तालुक्यात 113 मि.मी. पावसाची नोंद झाली. 1 जुलैपासून सोमवारअखेर किनारपट्टीवरील कुमठा तालुक्याचा अपवाद वगळता इतर चार तालुक्यात 600 हून अधिक मि.मी. पाऊस झाला. संततधार पावसामुळे किनारपट्टीवरील सखल भागात पाणीच पाणी झाले आहे.
भटकळ आणि होन्नावर तालुक्यातील अनेक ठिकाणी नाला, नदी कोणती, रस्ता, जमीन कुठली हे समजायला मार्ग नाही. अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी यापूर्वीच एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. या पथकाने होन्नावर तालुक्यातील कडतोक ग्राम पंचायतीच्या व्याप्तीत बचाव कार्याला सुरुवात केली आहे. कारवार तालुक्यातील चंडिया ग्राम पंचायतीच्या व्याप्तीतील इडूर-सखलबाग येथे अनेक घरांना पावसाच्या पाणी शिरले. त्यामुळे येथील अनेक कुटुंबे मित्रांच्या, नातेवाईकांच्या घरी निघून गेली आहेत. किनारपट्टीवासियांसाठी दिलासादायक बाब म्हणजे रविवारी रात्री झोडपून काढलेल्या पावसाने सोमवारी सकाळपासून उसंत घेतली आहे.
60 नागरिकांचे स्थलांतर
होन्नावर तालुक्यातील कडतोक ग्राम पंचायतीच्या व्याप्तीतील गुदनकुट्टू येथे पाण्याचे प्रमाण वाढल्याने 60 नागरिक संकटात सापडले होते. त्यांना एनडीआरएफच्या जवानांनी बोटद्वारे सुरक्षितस्थळी हलविल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीप्रिया यांनी दिली. होन्नावर तालुक्यातील पूर पीडितांसाठी 12 गंजी केंद्रे सुरू केली आहेत. या केंद्रांमध्ये 437 नागरिकांचे स्थलांतर केले आहे. काळी नदीवरील कद्रा जलाशयातून 31,600 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. दरम्यान, सोमवारी कारवार-अंकोलाचे आमदार सतीश सैल यांनी कद्रा धरणाला भेट देऊन पाहणी केली आणि जलाशयात भागन अर्पण केले.
 कुमठा-होन्नावर तालुक्यातील शाळांना आज सुटी
जिल्ह्यातील कुमठा आणि होन्नावर तालुक्यात पावसाच जोर सुरूच असल्याने मंगळवार दि. 9 रोजी येथील शाळा आणि महाविद्यालयांना सुटी देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.