दुरुस्ती सुरू, मात्र प्रतीक्षा रेशनकार्ड वितरणाची

दुरुस्ती सुरू, मात्र प्रतीक्षा रेशनकार्ड वितरणाची

सर्व्हरची समस्या कायम : लाभार्थ्यांची धडपड
बेळगाव : मागील कित्येक दिवसांपासून रखडलेल्या रेशनकार्ड दुरुस्तीच्या कामाला चालना मिळाली आहे. मात्र, या कामात सर्व्हर डाऊनची समस्या कायम असल्याने व्यत्यय निर्माण होऊ लागला आहे. शिवाय नवीन रेशनकार्ड वितरणाची प्रतीक्षा मात्र अद्याप आहेच. मागील दोन दिवसांपासून बेळगाव वन, ग्राम वन कार्यालयात कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठी नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे. सद्यस्थितीत रेशनकार्डची दुरुस्ती सुरू झाली आहे.
यामध्ये नावात बदल, पत्ता बदल, कुटुंबातील सदस्य वाढविणे, कमी करणे आदी कामे केली जात आहेत. यासाठी लाभार्थी गर्दी करू लागले आहेत. मागील काही दिवसांपासून रेशनकार्ड दुरुस्तीचे काम रखडले होते. आता दुरुस्ती सुरू झाल्याने नागरिकांची धडपड सुरू झाली आहे. एपीएल, बीपीएल आणि अंत्योदय रेशनकार्डधारकांची संख्या मोठी आहे. मात्र, बऱ्याच लाभार्थ्यांच्या रेशनकार्डमध्ये दुरुस्ती होत्या. त्यामुळे शासकीय कामकाजात अडचणी येत होत्या. त्यामुळे रेशनकार्ड दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आता रेशनकार्ड दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे.
निवडणूक आचारसंहिता आणि इतर कारणांमुळे मागील दोन वर्षांपासून रेशनकार्ड वितरण आणि दुरुस्तीही विस्कळीत झाली आहे. जिल्ह्यातून 85 हजारहून अधिक लाभार्थ्यांनी बीपीएलसाठी अर्ज केले आहेत. मात्र, वितरणच थांबल्याने लाभार्थ्यांना केवळ प्रतीक्षाच करावी लागली आहे. निवडणुकीनंतर रेशनकार्ड वितरण प्रक्रियेला प्रारंभ केला जाईल, असे आश्वासन अन्न व नागरी पुरवठा मंत्री मुनियप्पा यांनी दिले होते. मात्र, निवडणुकीचा काळ संपून दोन महिने उलटले तरी अद्याप सरकारकडून रेशनकार्डबाबत कोणत्याच हालचाली होताना दिसत नाहीत.