बोगस डॉक्टरांवर सीईओंची करडी नजर! बोगस डॉक्टर समित्यांना दरमहा बैठक घेण्याचे आदेश

वेळोवेळी माहिती सादर करण्याचे निर्देश; आरोग्य यंत्रणेला दिल्या सूचना; जिह्याच्या दुर्गम भागात बोगस डॉक्टरांचे जाळे कायम कृष्णात चौगले कोल्हापूर जिह्याच्या दुर्गम भागात आजही बोगस डॉक्टरांचे जाळे कायम आहे. अनेक ठिकाणी त्यांनी दवाखाने थाटले असून गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या प्रकरणांमध्ये ते आघाडीवर असल्याचे अनेक घटनांतून स्पष्ट झाले आहे. या बोगस डॉक्टरांना आळा घालण्यासाठी, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी […]

बोगस डॉक्टरांवर सीईओंची करडी नजर! बोगस डॉक्टर समित्यांना दरमहा बैठक घेण्याचे आदेश

वेळोवेळी माहिती सादर करण्याचे निर्देश; आरोग्य यंत्रणेला दिल्या सूचना; जिह्याच्या दुर्गम भागात बोगस डॉक्टरांचे जाळे कायम

कृष्णात चौगले कोल्हापूर

जिह्याच्या दुर्गम भागात आजही बोगस डॉक्टरांचे जाळे कायम आहे. अनेक ठिकाणी त्यांनी दवाखाने थाटले असून गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या प्रकरणांमध्ये ते आघाडीवर असल्याचे अनेक घटनांतून स्पष्ट झाले आहे. या बोगस डॉक्टरांना आळा घालण्यासाठी, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदस्तरीय बोगस डॉक्टर चौकशी समित्या गठीत केल्या आहेत. पण या समित्यांना आपल्या कामाचा काहीअंशी विसर पडल्यामुळे आजही बोगस डॉक्टरांचा ‘कारभार’ सुरुच आहे. पण आता जिल्हा परिषदेचे सीईओ कार्तिकेयन एस यांनी बोगस डॉक्टरांवर करडी नजर ठेवली असून त्यांनी सर्व स्तरावरील समित्यांना अॅक्टीव्ह करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड यांना दिले आहेत.
जिह्यातील सर्व डॉक्टरांची सर्वसमावेशक एक यादी तयार करून त्या यादीतील डॉक्टर्सनी दिलेली कागदपत्रे अधिकृत आहेत का नाहीत, हे पाहण्यासाठी त्याबाबतची तपासणी मोहीम राबविणे आवश्यक आहे. त्याप्रमाणेच यादी व्यतिरिक्त असलेल्या डॉक्टरकडे अधिकृत कागदपत्रे नसतील तर त्यांच्यावर इंडियन पिनल कोड, मेडिकल प्रोहीबशन एक्ट, नर्सिंग अॅक्टनुसार कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित आहे. यासाठी सर्व तालुका आरोग्य आ†धकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात अत्यंत सजगपणे बोगस डॉक्टर शोध मोहीम राबवून त्यांची कागदपत्रे तपासणी करून अनधिकृतपणे प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हे दाखल करणे अत्यावश्यक आहे. तसेच बोगस डॉक्टरकडे काम करणारे कर्मचारी तसेच त्यांच्या प्रिक्रिप्शनवर औषधे देणाऱ्या औषध दुकानदारासह आरोपी करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच निर्णय घेतला आहे. पण प्रशासनाच्या या सुचनांनुसार संबंधित समित्यांकडून आवश्यक कार्यवाही होत नसल्याचे दिसते. त्यामुळे सीईओ कार्तिकेयन एस यांनी तालुकास्तरीय बोगस डॉक्टर समितीने दरमहा आढावा बैठक घेऊन त्याबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्याचे निर्देश जि.प.आरोग्य विभागास दिले आहेत. त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गायकवाड यांनी सर्व तालुका अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकऱ्यांना मंगळवारी त्याबाबतचे पत्र पाठवले आहे.
समित्यांच्या कामकाजाचे स्वरूप
प्रा.आ.केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व तालुकास्तरीय समितीने आपल्या कार्यक्षेत्रातील परिसरामध्ये या महिन्यात सुरू झालेल्या खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांची संख्या, एकूण वैद्यकीय व्यवसायिकांची संख्या, दरमहा किमान 10 टक्के याप्रमाणे पडताळणी करावयाची खाजगी वैद्यकीय व्यवसायांची संख्या, त्यामध्ये आढळून आलेल्या बोगस डॉक्टरांची संख्या, बोगस डॉक्टरांवर केलेली कारवाई आदी महितीचे एकत्रिकरण करून ते वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवणे बंधनकारक केले आहे. प्रा.आ.केंद्र स्तरावरून दरमहा 3 तारखेपर्यंत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाकडे माहिती देणे अपेक्षित आहे. आणि तालुका स्तरावरून महिन्याच्या 5 तारखेपर्यंत जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाकडे माहिती पाठवणे बंधनकारक आहे.
बोगस डॉक्टरांची माहिती उपलब्ध, तरीही लपवाछपवी
जिह्याच्या दूर्गभ भागात एम.बी.बी.एस., बी.ए.एम.एस अथवा अधिकृत वैद्यकीय पदवी असलेल्या डॉक्टरांची संख्या कमी आहे. शहर अथवा शहराजवळील गावांमध्ये तसेच ज्या गावांमध्ये पुरेशा दळणवळणाच्या सुविधा आहेत त्याच ठिकाणी पदवीधर डॉक्टरांकडून दवाखाने थाटले आहेत. परिणामी दूर्गम भागात पदवीधर डॉक्टरांची वाणवा आहे. त्यामुळेच अशा ठिकाणी दहावी व बारावी उत्तीर्ण असलेल्या बोगस डॉक्टरांचे पेव फुटले आहे. या डॉक्टरांची सर्व माहिती त्या-त्या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेवकांकडे उपलब्ध आहे. पण बोगस डॉक्टर आणि प्रा.आ.केंद्रातील संबंधित वैद्यकीय यंत्रणेमध्ये साटेलोटे असल्यामुळे त्यांच्याकडून सर्व बोगस डॉक्टरांची माहिती जि.प.च्या आरोग्य यंत्रणेकडे कळवली जात नाही.
दोन वर्षात 8 बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल
जिह्याच्या ग्रामीण भागात एकूण 2396 नोंदणीकृत खाजगी वैद्यकिय व्यवसायिक आहेत. गेल्या दोन वर्षात 8 बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल केले आहेत. बोगस डॉक्टरांविरोधात तालुका आरोग्य आरोग्य अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवता येते.
दुर्गम भागात शेकडो बोगस डॉक्टर कार्यरत
वैद्यकीय व्यवसाय केल्या जाणाऱ्या इमारतीवर दवाखान्याचा फलक न लावता गुपित पद्धतीने वैद्यकीय व्यवसाय सुऊ केला आहे. अशा डॉक्टरांची प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या संबंधित यंत्रणेकडे माहिती आहे. पण त्यांच्याकडून कोणतीही कारवाई केलेली नाही. ‘गावला तर चोर, नाही तर साव’ या म्हणीप्रमाणे जिह्यातील शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, भुदरगड, चंदगड या दूर्गभ भागासह सिमाभागामध्ये शेकडो बोगस डॉक्टर कार्यरत आहेत. चकचकीत दवाखाने, कमी खर्चामध्ये मिळणारे उपचार यामुळे ग्रामीण भागातील लोक अशा डॉक्टरांकडे आकर्षित होत आहेत. लोकांच्या अडाणीपणाचा फायदा या बोगस डॉक्टरांकडून उचलला जात आहे. शासकीय यंत्रणेकडून त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली जात नसल्याने त्यांचे दवाखाने खुलेआम सुऊ आहेत.