जिल्हाधिकाऱ्यांकडून कुसमळी पुलाची पाहणी

अवजड वाहतुकीसह परिवहन मंडळाच्या बसेसना देखील बंदी घालण्याचे आदेश : पर्यायी मार्गासंबंधी सूचना वार्ताहर /जांबोटी बेळगाव-चोर्ला राज्य महामार्गावरील कुसमळी नजीकच्या मलप्रभा नदीवरील वाहतुकीला धोकादायक बनलेल्या ब्रिटिशकालीन पुलाची पाहणी बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी रविवारी करून या पुलावरून होणारी अवजड वाहतूक तसेच परिवहन मंडळाच्या बसेसना देखील या पुलावरून वाहतूक करण्यास बंदी घालण्याचा आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिला. बेळगाव-चोर्ला व्हाया पणजी राज्य महामार्गावरील कुसमळी नजीकच्या मलप्रभा नदीवरील 125 वर्षे […]

जिल्हाधिकाऱ्यांकडून कुसमळी पुलाची पाहणी

अवजड वाहतुकीसह परिवहन मंडळाच्या बसेसना देखील बंदी घालण्याचे आदेश : पर्यायी मार्गासंबंधी सूचना
वार्ताहर /जांबोटी
बेळगाव-चोर्ला राज्य महामार्गावरील कुसमळी नजीकच्या मलप्रभा नदीवरील वाहतुकीला धोकादायक बनलेल्या ब्रिटिशकालीन पुलाची पाहणी बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी रविवारी करून या पुलावरून होणारी अवजड वाहतूक तसेच परिवहन मंडळाच्या बसेसना देखील या पुलावरून वाहतूक करण्यास बंदी घालण्याचा आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिला. बेळगाव-चोर्ला व्हाया पणजी राज्य महामार्गावरील कुसमळी नजीकच्या मलप्रभा नदीवरील 125 वर्षे जुना असलेल्या ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीला धोकादायक बनला आहे.
या पुलावरील सर्व प्रकारच्या अवजड वाहतुकीवर त्वरित बंदी घालावी, अशा मागणीचे निवेदन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कर्नाटक प्रांताध्यक्ष किरण गावडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आठ दिवसापूर्वी जिल्हाधिकारी मोहमद रोशन यांना दिले होते. सदर निवेदनाची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या दोन-तीन दिवसापूर्वी या पुलावरून सर्व प्रकाराच्या अवजड वाहनांना वाहतुकीला बंदी घालण्याचा आदेश दिला होता. त्याची दखल घेऊन पोलीस प्रशासनाने शनिवारपासून त्याची अंमलबजावणी करण्यास प्रारंभ केला होता. मात्र जांबोटी-कणकुंबी विभागात सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे मलप्रभा नदीला पूर आला आहे. त्यामुळे पुलावरून होणाऱ्या संभाव्य धोक्याची दखल घेऊन,
जिल्हाधिकारी मोहमद रोशन यांनी रविवारी दुपारी कुसमळी नजीकच्या ब्रिटिशकालीन पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत बेळगाव जिल्हा पोलीसप्रमुख भीमाशंकर गुळेद, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे आदी वरिष्ठ अधिकारी वर्ग उपस्थित होते. पुलाच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर या पुलावरून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी परिवहन मंडळाच्या बसेससह सर्वच अवजड वाहनांना बंदी घालण्याचा आदेश त्यांनी दिला.
जिल्हाधिकारी मोहमद रोशन यांनी कुसमळी नजीकच्या ब्रिटिशकालीन धोकादायक पुलावरून सर्व अवजड वाहनांना वाहतुकीला बंदीचा निर्णय घेतल्यानंतर प्रवासी वाहतुकीची समस्या तसेच या भागातील शालेय विद्यार्थ्यांचे संभाव्य शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी परिवहन मंडळाच्या बसेस व हलक्या स्वरूपाच्या वाहनासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिली. यानुसार पिरनवाडी-खानापूर-जांबोटी तसेच हब्बनहट्टी-बैलूर किणये आदी मार्गावरून वाहतूक सुरू करण्याचा पर्याय वर देखील विचारविनिमय करण्यात आला. तसेच हा पूल नव्याने बांधण्यासाठी आराखडा तयार करण्यात यावा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. यावेळी अधिकारीवर्ग उपस्थित होता.