हरियाणातील खतरनाक गुन्हेगार…उत्तर कर्नाटकात संचार
हुबळीत सराफी दुकान फोडले, बिदर पोलिसांकडून यापूर्वी अटक, मात्र आता पुन्हा एकदा सक्रिय
बेळगाव : बेळगावसह उत्तर कर्नाटकात आंतरराज्य गुन्हेगारांची टोळी सक्रिय झाली आहे. चोऱ्या, घरफोड्यांसाठी शेजारच्या महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू, आंध्रप्रदेशमधील गुन्हेगार अधूनमधून बेळगावला येत असतात. सध्या सक्रिय असलेले गुन्हेगार मात्र हरियाणातील आहेत. सराफी दुकाने व एटीएम फोडण्यात त्यांचा हातखंडा आहे. यापूर्वी मेवात जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व सध्या नूह जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगारांची टोळी गुन्ह्यासाठी सध्या उत्तर कर्नाटकात फिरते आहे, अशी माहिती मिळाली आहे. हुबळी येथील केशवापूर परिसरातील एका सराफी दुकानात चोरी झाली आहे. 16 जुलै रोजी भुवनेश्वरी ज्वेलर्समध्ये झालेली चोरी हरियाणातील गुन्हेगारांनी केल्याचे उघडकीस आले आहे.
पाच महिन्यांपूर्वी कर्नाटकात प्रथमच बिदर पोलिसांनी मेवातच्या गुन्हेगारांना अटक केली होती. बिदरचे तत्कालिन जिल्हा पोलीसप्रमुख चन्नबसवण्णा एस. एल. यांच्या मार्गदर्शनाखाली शाहिद कमाल खान (वय 45) रा. नावली, जि. मेवात, अलीम ऊर्फ रिहान अकबर खान (वय 26) रा. भंगो, जि. मेवात, इलियास अब्दुलरेहमान (वय 45) रा. मठेपूर, जि. मल्लवल्ल या तिघा जणांना अटक करण्यात आली होती. या टोळीने बेळगावसह महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा या तीन राज्यात एटीएम फोडले होते. बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी, अंकली, यमकनमर्डी येथे झालेल्या एटीएममधील चोरीचीही त्यांनी कबुली दिली होती. मंगळवार दि. 13 फेब्रुवारी 2024 रोजी या त्रिकुटाला अटक करण्यात आली होती. त्यांनी बेळगावसह कर्नाटकात पाच, महाराष्ट्रात तीन, तेलंगणामध्ये एक व बिदर जिल्ह्यात तीन ठिकाणी अशी एकूण 12 एटीएम फोडून कोट्यावधी रुपये पळविले होते.
बेळगाव पोलिसांनीही या टोळीतील गुन्हेगारांना पोलीस कोठडीत घेऊन त्यांची कसून चौकशी केली होती. आता याच परिसरातील गुन्हेगारी टोळ्या पुन्हा उत्तर कर्नाटकातील वेगवेगळ्या जिल्ह्यात सक्रिय असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. बिदर पोलिसांनी तिघा जणांना अटक केली. त्यावेळी त्यांचे आणखी चौघे साथीदार फरारी होते. मेवातमधील गुन्हेगार देशभरात फिरून गुन्हे करतात. देशाची राजधानी नवी दिल्ली, ओडिसा येथेही त्यांनी एटीएम फोडले होते. गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम किंवा सराफी दुकान फोडून रोकड व दागिने पळविण्यात या टोळीतील गुन्हेगारांचा हातखंडा आहे. एखाद्या गावातील एटीएम फोडल्यानंतर पोलीस यंत्रणेला चुकविण्यासाठी हे गुन्हेगार टोलनाक्यावरून जाणे टाळतात. गुगल मॅपच्या साहाय्याने पर्यायी मार्गाने ते प्रवास करतात.
तपास यंत्रणेला चकविण्यासाठी बोगस नंबरप्लेटचा वापर केला जातो. हुबळी येथील सराफी दुकानातील चोरी लक्षात घेता मेवातमधील गुन्हेगारांचे हे कृत्य असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळेच उत्तर कर्नाटकात हे गुन्हेगार सक्रिय असल्याची माहिती मिळाली असून पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. आजवर या गुन्हेगारांची गुन्हे करण्याची कार्यपद्धत लक्षात घेता सहजासहजी ते पोलिसांच्या जाळ्यात अडकत नाहीत. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणामधील एटीएम चोरी प्रकरणी कर्नाटक पोलिसांना हवे असलेले आणखी चौघे जण पाच महिन्यांनंतरही पोलिसांना सापडले नाहीत. तेच गुन्हेगार आता या परिसरात सक्रिय झाले आहेत का? असा संशय बळावत चालला आहे. हुबळी, हासन, दोड्डबळ्ळापूरसह विविध ठिकाणी अलीकडे झालेली चोरी प्रकरणे लक्षात घेता तपास यंत्रणेचा संशय आणखी बळावला आहे.
बिदर पोलिसांनी अटक केलेल्या तिघा जणांच्या जबानीतून या टोळीची कार्यपद्धत उघडकीस आली होती. प्रत्येक गुन्हेगार एकेक जबाबदारी पार पाडत असतो. इलियासवर गुन्हे करताना बाहेर पाळत ठेवण्याची जबाबदारी असायची. तर शाहिद हा एखाद्या आस्थापनात प्रवेश केल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर स्प्रे मारण्याचे काम करायचा. तर अलीम गॅस कटरने एटीएम मशीन किंवा शटर फोडण्याचे काम करायचा. असे टोळीतील प्रत्येक सदस्यावर एकेक जबाबदारी असते. खासकरून ही टोळी मध्यवर्ती किंवा गजबजलेल्या ठिकाणीच चोरी करते. चोरी करताना हे सर्वजण एकत्र असतात. चोरी झाल्यानंतर ते विस्कळीत होतात. कर्नाटकातील विविध जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सध्या या गुन्हेगारांच्या मागावर आहेत. पोलिसांचा संशय खरा ठरला तर उत्तर कर्नाटकातील एटीएम व सराफी दुकानांना निश्चितच धोका आहे. यासंबंधी गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्याशी संपर्क साधला असता हुबळी पोलिसांकडून यासंबंधी माहिती मिळविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
Home महत्वाची बातमी हरियाणातील खतरनाक गुन्हेगार…उत्तर कर्नाटकात संचार
हरियाणातील खतरनाक गुन्हेगार…उत्तर कर्नाटकात संचार
हुबळीत सराफी दुकान फोडले, बिदर पोलिसांकडून यापूर्वी अटक, मात्र आता पुन्हा एकदा सक्रिय बेळगाव : बेळगावसह उत्तर कर्नाटकात आंतरराज्य गुन्हेगारांची टोळी सक्रिय झाली आहे. चोऱ्या, घरफोड्यांसाठी शेजारच्या महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू, आंध्रप्रदेशमधील गुन्हेगार अधूनमधून बेळगावला येत असतात. सध्या सक्रिय असलेले गुन्हेगार मात्र हरियाणातील आहेत. सराफी दुकाने व एटीएम फोडण्यात त्यांचा हातखंडा आहे. यापूर्वी मेवात जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व सध्या नूह जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगारांची टोळी गुन्ह्यासाठी […]