रविवारीही पावसाचा जोर : जनजीवन विस्कळीत
शहरातील सखल भागात पाणी : बळ्ळारी नाला, मार्कंडेय नदीला पूर
बेळगाव : मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नदी नाले आणि जलाशयांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. विशेषत: मार्कंडेय नदीचे पाणीही पात्राबाहेर पडले आहे. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील सखल भागात पाणी साचत असल्याने अडचणी येऊ लागल्या आहेत. जून महिन्यात म्हणावा तसा पाऊस झाला नव्हता. मात्र, जुलैच्या पंधरवड्यात दमदार पाऊस झाल्याने जूनचा बॅकलॉक भरून निघाला आहे. हवामान खात्याने यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार सद्यस्थितीत पावसाचा जोर राहिला आहे. दरम्यान आणखी दोन-चार दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास पुराचा धोका गंभीर बनणार आहे.
मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम राहिला आहे. त्यामुळे वातावरणातही गारठा निर्माण होऊन थंडीचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे शहरातील विविध मार्गावर पाणी साचण्याबरोबर गटारी आणि ड्रेनेजच्या पाण्याचा प्रश्नही ऐरणीवर येऊ लागला आहे. त्याबरोबर बाजारपेठेवरही मोठा परिणाम झाला असून वर्दळ थंडावलेली पाहावयास मिळत आहे. शहरातील येडियुराप्पा मार्ग, जुने गांधीनगर, झेंडा चौक आदी ठिकाणी पाणी साचून रहात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ लागला आहे. त्याबरोबर पावसाची बॅटींग कायम सुरू असल्याने बळ्ळारी नाल्याचे पाणीही शेकडो परिसरात पसरले आहे. त्यामुळे शेती पिकांनाही फटका बसणार आहे. मार्कंडेय नदीचेही पाणी शिवारात शिरल्याने पिकांचे नुकसान होणार आहे.
बळ्ळारी, मार्कंडेयला पूर
संततधार पावसामुळे बळ्ळारी नाला आणि मार्कंडेय नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परिसरातील शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे भात आणि ऊस पिकाचे नुकसान होणार आहे. विशेषत: काठावरील भात पिकात पाणी साचून राहिल्याने पीक कुजणार आहे. तर काही शेतकऱ्यांवर दुबार लागवडीचे संकट ओढवणार आहे.
ओल्या दुष्काळाची शक्यता
गतवर्षी पावसाअभावी जिल्ह्यात सुका दुष्काळ निर्माण झाला होता. मात्र यंदा सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ओल्या दुष्काळाची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यातील सर्व नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. अनेक बंधाऱ्यांवर पाणी आले आहे. हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंताही वाढली आहे.
बेळगाव-खानापुरात शाळांना दोन दिवस सुटी : खानापूर तालुक्यात पीयु कॉलेजही बंद
संततधार पावसामुळे बेळगाव व खानापूर तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना दोन दिवस सुटी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी रविवारी सायंकाळी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. केवळ खानापूर तालुक्यात पीयु कॉलेजनाही सुटी असणार आहे. बेळगाव व खानापूर दोन्ही तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून संततधार सुरू आहे. चार दिवसात पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळांना सोमवार दि. 22 व मंगळवार दि. 23 जुलै रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे. केवळ खानापूर तालुक्यात पीयु कॉलेजनाही दोन दिवस सुटी जाहीर करण्यात आली असून सर्व सरकारी, अनुदानित व विनाअनुदानित शाळा दोन दिवस बंद राहणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे. शिक्षण खाते, पदवीपूर्व शिक्षण खाते, महिला व बाल कल्याण खात्याने या आदेशाचे काटेकोर पालन करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.
Home महत्वाची बातमी रविवारीही पावसाचा जोर : जनजीवन विस्कळीत
रविवारीही पावसाचा जोर : जनजीवन विस्कळीत
शहरातील सखल भागात पाणी : बळ्ळारी नाला, मार्कंडेय नदीला पूर बेळगाव : मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नदी नाले आणि जलाशयांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. विशेषत: मार्कंडेय नदीचे पाणीही पात्राबाहेर पडले आहे. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील सखल भागात पाणी साचत असल्याने अडचणी येऊ लागल्या आहेत. जून महिन्यात म्हणावा तसा पाऊस झाला नव्हता. मात्र, जुलैच्या पंधरवड्यात दमदार पाऊस […]