धनवीरसिंग : ( संपादकीय ) बदलत्या आणि प्रगतिशील भारताची नवीन स्वरूप उदयास येत असून महिला सशक्तीकरण ह्यावर अधिक जातीने लक्ष दिल्या जात आहे. त्यातीलच एक लक्षवेधी योजना जी भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांचे द्वारे गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्या मध्ये विमोचन करण्यात आली होती. जाणून घ्या ह्या योजने बद्दल आजच्या लेखात.
“येणाऱ्या काळात 15 हजार महिला बचत गटांना नमो ‘ड्रोन दीदी’ कार्यक्रमाशी जोडलं जाईल. या बचत गटांना ड्रोन्स दिले जातील. ”
30 नोव्हेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नमो ड्रोन दीदी योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, “या योजनेमुळे ग्रामीण महिलांना कमाईचं अतिरिक्त साधन मिळेल आणि शेतकऱ्यांना कमी किंमतीत ड्रोनसारखं आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होईल.”
‘ड्रोन दीदी’ योजना काय आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यंदा लाल किल्ल्यावरील त्यांच्या भाषणात महिलांना ड्रोन प्रशिक्षण देण्याबाबत घोषणा केली होती.
त्यानंतर पुढे नोव्हेंबर महिन्यात यासंबंधीच्या योजनेची घोषणा करण्यात आली आहे आणि तिला नमो ‘ड्रोन दीदी’ असं नाव देण्यात आलं आहे.
या ड्रोन दीदी योजने अंतर्गत भारत सरकार देशभरातल्या 15 हजार महिला बचत गटांना ड्रोन वितरित करणार आहे.
त्यानंतर या महिला हे ड्रोन शेतकऱ्यांना शेती कामासाठी भाडेतत्त्वावर देऊ शकणार आहेत.
ह्या ड्रोनच्या सहाय्यानं खतं, कीटकनाशकांची फवारणी करण्याचं, तसंच शेतीतल्या वेगवेगळ्या कामांसाठी ड्रोनचा वापर कसा करायचा, याचं या बचत गटातल्या महिलांना 15 दिवसांचं प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे.
‘ड्रोन दीदी’ योजना आर्थिक मदत कशी मिळणार?
ड्रोन दीदी योजनेअंतर्गत, ड्रोन आणि त्यासंबंधित उपकरणांच्या खरेदीसाठी एकूण रकमेच्या 80 % किंवा जास्तीस्त जास्त 8 लाख रुपये एवढी आर्थिक मदत भारतीय केंद्र सरकारकडून दिली जाणार आहे.
ड्रोनचा वापर आर्थिकदृष्ट्या जिथं शक्य असेल त्या भागातल्या महिला बचत गटांची आधी निवड केली जाईल आणि मग त्यांना ड्रोन पुरवले जातील. देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यांमधून एकूण 15 हजार बचत गटांना ड्रोन पुरवले जातील.
वर्ष 2024 ते 2026 या कालावधीत महिलां बचत गटांना ड्रोन पुरवण्याचं भारत सरकारचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी सुमारे 1261 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
महिला बचत गटातील योग्य सदस्य ज्याचं वय 18 वर्षं किंवा त्याहून अधिक असेल, अशा सदस्याची 15 दिवसांच्या ड्रोन प्रशिक्षणासाठी निवडली जाईल.
यात ड्रोन पायलटचं पाच दिवसांचं प्रशिक्षण आणि शेतीच्या कामांसाठी (खत, कीटकनाशके फवारणी इ). 10 दिवसांचं प्रशिक्षण दिलं जाणार असल्याची माहिती आहे.
ड्रोन शेती काळाची गरज?
आधुनिक ड्रोन हे हवेतून उडणारं मानव संचालित तसेच मानव विरहित वाहन आहे. ड्रोन व त्यावरील उपकरणाला जमिनीवरुन रिमोट कन्ट्रोलच्या साह्याने नियंत्रित केलं जाऊ शकतं. आणि एकाच ठिकाणी राहून आपण दिलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे पूर्ण शेतातील महत्वाची कामे तसेच जोखमी कामे देखील ह्या यंत्राच्या साहाय्याने अधिक सहज आणि झटपट करवून घेऊ शकतो.
ड्रोनमध्ये नेव्हिगेशन सिस्टीम, जीपीएस, वेगवेगळे सेन्सर्स, कॅमेरे यांचा समावेश असतो.
“ड्रोनची किंमत साधारणपणे 6 ते 15 लाखांपर्यंत असते. ड्रोनचं आयुष्य 4 ते 5 वर्षांचं असतं. ड्रोन दीड ते दोन किलोमीटर लांब उडू शकतात, तर 400 फुटांपर्यंत उंच उडू शकतात,” असं ड्रोन तंत्रज्ञानाचे अभ्यासक डॉ. अविनाश काकडे सांगतात.
आधुनिक ड्रोन महाग असल्यामुळे प्रत्येक शेतकरी तो खरेदी करू शकणार नाही. त्यामुळे ड्रोन भाडेतत्वावर घेऊन शेतीसाठी वापरणं हा एक पर्याय शेतकऱ्यांसमोर आहे.
शेतीमध्ये ड्रोनचा वापर वाढल्यास शेतकऱ्यांच्या परिश्रमात आणि वेळेत बचत होणार आहे.
ड्रोनद्वारे एक हेक्टर क्षेत्रावरील फवारणी 20 ते 30 मिनिटांत पूर्ण होते. ट्रॅक्टर अथवा माणसानं स्वत: फवारणी करायची म्हटलं तर यापेक्षा अधिक वेळ लागतो.
याशिवाय, विषबाधा होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता असते. ड्रोनच्या वापरामुळे जीवितहानीची शक्यता नाहीशी होईल.
शेत मजूर टंचाईवर उपाय म्हणूनही ड्रोन शेतीकडे आश्वासक नजरेनं पाहिलं जात आहे.
ड्रोनद्वारे केली जाणारी मुख्य शेतीकामे !
शेतीमध्ये वापरण्यात येणारे आधुनिक ड्रोन हे 50 ते 60 फूट उंच आणि 2 किलोमीटर लांब उडू शकतात. या दरम्यान येणाऱ्या प्रत्येक घटकांवर ड्रोनच्या साहाय्यानं नजर ठेवता येते.
ड्रोनच्या सहाय्यानं करण्याची येणारी काही शेती कामे –
- ड्रोनच्या साहाय्याने पेरणीपूर्वी आणि पेरणीनंतर जमिनीचे 3-D नकाशे तयार करता येतात.
- आता खतेही द्रव स्वरुपात उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे ड्रोनच्या साहाय्यानं खतांची फवारणी करता येते.
- ड्रोनच्या साहाय्यानं पिकांवर जिथं प्रादुर्भाव आहे, तिथं कीडनाशकाची फवारणी करता येते.
- ड्रोनवर बसवण्यात आलेल्या सेन्सरद्वारे पिकांचं आरोग्य आणि मातीच्या परिस्थितीचं अचूकपणे विश्लेषण करता येतं.
- ड्रोनवरील कॅमेरा आणि सेन्सर यांच्या मदतीनं जमिनीवरील कोरड्या भागाचा शोध घेतला जातो. त्याच क्षेत्रामध्ये पाण्याचा पुरवठा केला जातो. यामुळे पाण्याचा अपव्यय टाळला जातो.
शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन गरजेचं
शेतीत ड्रोन वापराचे फायदे असले तरी यासमोर काही आव्हानंही असल्याचं तज्ज्ञ सांगतात. ज्यामध्ये,
- ड्रोन चालवण्यासाठी पायलट अत्यंत निष्णात असणं गरजेचं आहे. त्यासाठी तसं प्रशिक्षण मिळायला हवं.
- ड्रोनमध्ये बिघाड झाल्यास त्यासाठी दुरुस्ती केंद्र उपलब्ध असणं गरजेचं आहे.
- ड्रोनची बॅटरी लाईफ 20 ते 40 मिनिटांची असते. त्यामुळे एक शिल्लक बॅटरी सोबत बाळगावी लागते. ती खूप महागडी असते.
- पावसाळ्यात ड्रोनचा वापर करणं अवघड असतं. कारण ड्रोन सेन्सर बेस असल्यामुळे पावसात ते कसं काम करू शकेल, हा प्रश्न कायम आहे.
- ड्रोननं किटकनाशकांची फवारणी करताना योग्य दाब नसल्यास कीटकनाशकं हवेत उडून जाऊ शकतात. अशावेळी काय करायचं याबाबत शेतकऱ्यांकडे पर्याय उपलब्ध हवा.
आपल्याकडे कृषी विद्यापीठांमध्ये ड्रोन वापराच्या प्रशिक्षणाचे सत्र आयोजित केले जात आहेत.
याशिवाय, केंद्रीय कृषी मंत्रालयानं ड्रोन वापराबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
पण, जोवर त्याची प्रात्यक्षिके अधिकाधिक शेतकऱ्यांसमोर घेतली जाणार नाही, तोवर शेतकरी ड्रोन तंत्रज्ञानापासून अनभिज्ञ राहण्याची शक्यता आहे.