इराण आणि पाकिस्तानमध्ये युद्ध भडकलं तर कोण वरचढ ठरेल?

इराणने मंगळवारी (16 जानेवारी) पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील सुन्नी कट्टरतावाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला केला. त्यानंतर एक दिवसाने पाकिस्तानने इराणच्या सेस्तान बलुचिस्तान प्रांतातील पंजगुर भागात तशाच प्रकारे हल्ला केला.

इराण आणि पाकिस्तानमध्ये युद्ध भडकलं तर कोण वरचढ ठरेल?

इराणने मंगळवारी (16 जानेवारी) पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील सुन्नी कट्टरतावाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला केला. त्यानंतर एक दिवसाने पाकिस्तानने इराणच्या सेस्तान बलुचिस्तान प्रांतातील पंजगुर भागात तशाच प्रकारे हल्ला केला.

 

पाकिस्तानने या हल्ल्यानंतर म्हटलं की, “बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट या कट्टरतावादी संघटनांच्या ठिकाणांवर आम्ही हल्ला केला. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या हल्ल्यात किलर ड्रोन, रॉकेट आणि इतर शस्त्रांची मदत घेण्यात आली.”

 

या हल्ल्याच्या काही तासांपूर्वी इराणचे परराष्ट्र मंत्री हुसैन अमीर अब्दोल्लाहियन यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांशी फोनवरून बातचित केली होती.

 

या फोनवर दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी सहकार्य आणि संपर्क कायम ठेवण्यावर भर दिला. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानला मित्र राष्ट्र म्हणून संबोधलं.

 

पाकिस्तानचे शेजारी राष्ट्रांशी कसे संबंध आहेत?

पाकिस्तानचे त्यांच्या पूर्वेकडील भारत आणि पश्चिमेकडील अफगाणिस्तानशी संबंध आधीपासूनच तणावपूर्ण आहेत.

 

तज्ज्ञांचं मत आहे की, पाकिस्तानचं लष्कर आधीपासूनच देशाअंतर्गत काही कट्टरतावादी आणि बंडखोर दहशतवादी संघटनांशी लढतंय. या स्थितीत इराणच्या हल्ल्याने पाकिस्तानच्या संरक्षण यंत्रणेवरील दबाव आणखी वाढवलाय.

 

इस्लामाबादस्थित इन्स्टिट्यूट ऑफ रिजनल स्टडीजमधील परराष्ट्र धोरणावर काम करणाऱ्या थिँक टँकमधील फराज नक्वी यांच्या मते, “इराणशी पाकिस्तानच्या संबंधांची स्थिती ही भारत आणि अफगाणिस्तानशी असलेल्या संबंधांपेक्षा वेगळी आहे. इराण आणि पाकिस्तान दहशतवादाविरोधातील प्रयत्नांमध्ये समन्वय साधून आहेत. त्यामुळे इराणचा हल्ला पाकिस्तानसाठी एखाद्या धक्क्यासारखा ठरला.”

 

 

फराज नक्वी पुढे म्हणतात की, “आताच्या घटनेनं एकमेकांवरील विश्वास कमकुवत झालाय. पाकिस्तानच्या नौदलाचं प्रतिनिधी पथक हुरमुज जलडमरूमध्ये संयुक्त सरावासाठी इराणमध्ये असतानाच हा हल्ला झाला. पाकिस्तानचं व्यापारी प्रतिनिधी मंडळ चाबहारमध्ये होतं आणि इराणचे सुरक्षा सल्लागार पाकिस्तान दौऱ्यावर होते. अशा स्थितीत हा हल्ला पाकिस्तान आणि तिथल्या लोकांसाठी अत्यंत धक्कादायक आणि निराशाजनक ठरला.”

 

फराज म्हणतात, “पाकिस्तानही हल्ल्यातूनच उत्तर देण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही. आता हल्ल्याला उत्तर दिलंच आहे, तर परिस्थिती शांतपणे हाताळली पाहिजे. दोन्ही देशांमधील संबंध हल्ल्यापूर्वीच्या स्थितीत येण्यास आता काही काळ जाईल.”

 

इराणच्या हल्ल्यावर पाकिस्तानची प्रतिक्रिया

परराष्ट्र संबंधांचे जाणकार सलमान जावेद यांनीही पाकिस्तनच्या दृष्टिकोनाचं कौतुक करत म्हटलं की, पाकिस्ताननं संकटाला जबाबदारीने हाताळलं आहे.

 

ते म्हणतात की, “पाकिस्तानने उघडपणे उत्तर दिलं नाही. अगदी मोजून-मापून प्रतिक्रिया दिली. 32 तासांनी अत्यंत विचारपूर्वक उत्तरादाखल हल्ला करण्यात आला. यात मित्र देशांसह सर्व बाजूंना विश्वासात घेतलं गेलं. इराणलाही सांगण्यात आलं की, पाकिस्तान आपल्या हवाई क्षेत्राच्या विनाकारण उल्लंघनावर प्रतिक्रिया देण्याचा अधिकार सुरक्षित ठेवतो आहे.”

 

सलमान जावेद पुढे म्हणतात की, “पाकिस्तानने स्वरक्षणासाठी अधिकारांचा वापर करून दुसऱ्या देशातील कट्टरतावादी संघटनेवर हल्ला केलाय.

 

“ही आंतरराष्ट्रीय परंपरा आहे. पण आता इतर आंतरराष्ट्रीय शक्तीही त्यात सामील झाल्या आहेत. चीन, सौदी अरेबिया, तुर्की आणि अमेरिका या मित्र देशांनी तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. समजूतदारपणा दाखवला जाईल अशी आशा आहे.”

 

चीनने यापूर्वीच इराण आणि पाकिस्तानला तणाव वाढेल अशी कोणतीही कारवाई टाळण्याचा सल्ला दिला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने इराणने पाकिस्तानात केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचा निषेध केला आहे, तर तुर्कीने शांतता राखण्याचे आवाहन केलं आहे. तुर्कीचे परराष्ट्र मंत्री दोन्ही बाजूंशी बोलत आहेत.

 

मात्र, पाकिस्तान-इराण संबंधांमध्ये अलीकडच्या घडामोडींमुळे पाकिस्तान अधिक असुरक्षित झाला आहे का?

 

या प्रश्नाचं उत्तर देताना, राजकीय विश्लेषक मुशर्रफ झैदी हे या स्थितीला अतिशय ‘धोकादायक’ म्हणत परिस्थितीकडे लक्ष वेधतात.

 

इराण आणि भारताची जवळीक

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर लिहिलेल्या एक पोस्टमध्ये मुशर्रफ झैदी म्हणतात की, ‘इराणने वर्षानुवर्ष पाकिस्तानला निशाणा बनवणाऱ्या कट्टरतावाद्यांना तयार केलंय. सर्वांत चुकीची गोष्ट ही आहे की, पाकिस्ताच्या सुरक्षेला कमकुवत करण्यासाठी इराण भारतासोबत मिळून काम करतो. त्यामुळे पाकिस्तानकडून अशा गटांना निशाणा बनवणं बचावात्मक दृष्टीने योग्य पाऊल आहे.’

 

ते पुढे म्हणतात, “इराणला जिथे कुठे लढायला मिळतं, तिथं ते लढू इच्छितात. कारण एक क्रांतिकारी सरकार लढण्याविना तगून राहू शकतात. याच माध्यमातून ते लोकांना युद्धासाठी तयार असण्यासाठी सतत संघटित करत असतात.”

 

झैदी यांच्या मते, आता पाकिस्ताननं उत्तरादाखल कारवाई केल्यानं इराणचं शत्रुत्व ओढवून घेतलं आहे.

 

पाकिस्तानमधील काही विश्लेषकांचं म्हणणं आहे की, “पंजगुरमधील हल्ले इराणी रिव्हॉल्युशनरी गार्ड्स कोर (आयआरजीसी) चं फळ आहे. मध्य-पूर्वेतही ते अशांतता पसरवण्यात सामिल आहे.”

 

अल-जजिराच्या वृत्तानुसार, ‘आयआरजीसी कमांडर ब्रिगेडियर जनरल कादर रहीमजादेहने पाकिस्तानच्या जवळ इराणच्या अग्नेय सीमेवर मोठ्या प्रमाणात लष्करी सरावाची घोषणा केली आहे.’

 

रहीमजादेहच्या हवाल्यानं या वृत्तात म्हटलंय की, ‘हा सराव इराणच्या सीमेच्या आत अबादान आणि चाबहारच्या मध्ये 400 किलोमीटरच्या भागात होणार आहे. यात डझनभर मानव-संचलित आणि मानव-विरहित विमानं, तसंच मिसाईल्सचा समावेश असेल.’

 

भविष्यात होणाऱ्या कुठल्याही इराणी आक्रमणाला रोखण्यासाठी पाकिस्तानकडे पुरेशी लष्करी ताकद आहे का? फराज नक्वी म्हणतात की, पाकिस्तानकडे चांगल्या क्षमतेची शस्त्र आहेत, मात्र इराणला याचा फायदाही आहे.

 

अण्वस्त्र सज्ज देश आहे पाकिस्तान

फराज नक्वी म्हणतात की, “पाकिस्तान अण्वस्त्र सज्ज देश आहे. विरोध करण्याची ताकद आणि धोरणात्मक पातळीवरही पाकिस्तान अग्रेसर आहे. पाकिस्तानची लष्करी ताकद अधिक प्रगत आहे. मात्र, इराणची प्रॉक्सी ही त्यांची सर्वांत मोठी ताकद आहे.

 

“इराणच्या अनेक प्रॉक्सी मध्य पूर्व आणि अफगाणिस्तानमध्ये पसरलेल्या आहेत. अशा परिस्थितीत ही शस्त्राची शस्त्राशी तुलना होण्यापेक्षा क्षमतेबाबत आहे. जर पाकिस्तान अण्वस्त्र सज्ज असेल तर इराणकडे जगातील सर्वोत्तम प्रॉक्सी आहेत.”

 

पाकिस्तानची इराणला लागून 900 किलोमीटरची सीमारेषा आहे. सलमान जावेद म्हणतात की, पाकिस्तानला दक्षिण-पश्चिमेकडील सीमा अधिक सुरक्षित करावी लागेल.

 

ते पुढे म्हणतात की, “पाकिस्तानची हवाई संरक्षण यंत्रणा नेहमीच भारत केंद्रित राहिलीय. 2011 मध्ये ओसामा बिन लादेनविरुद्ध अमेरिकेच्या कारवाईनंतर पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या पश्चिम सीमेवर हवाई संरक्षण यंत्रणा तैनात केली. दक्षिण-पश्चिम भागात इराणच्या बाबतीत असं अद्याप तरी झालं नाहीय, पण कदाचित हल्ल्यानंतर हे बदलेल.”

 

“इराणचा या प्रदेशातील इतर देशांसोबतचा गुंतागुंतीचा लष्करी सहभाग, अमेरिका आणि इतर अनेक पाश्चात्य देशांशी असलेले प्रतिकूल संबंध असूनही, 1980 च्या इराण-इराक युद्धानंतर इतर कोणत्याही देशाने इराणमध्ये हल्ला केला नाही. पण पाकिस्तानच्या प्रत्युत्तर हल्ल्यांनी ही परिस्थिती बदललीय,” असं सलमान म्हणतात.

 

सलमान पुढे म्हणतात, “मला आशा आहे की दोन्ही देश आता तणाव कमी करतील आणि प्रॉक्सी युद्धाचा अवलंब करणार नाहीत, परंतु असं झाल्यास ते या संपूर्ण भागासाठी घातक ठरेल.”

 

पाकिस्तानने यापूर्वी भारत आणि अफगाणिस्तानविरुद्ध प्रॉक्सीचा वापर केला आहे.

 

परराष्ट्र धोरणावर काम करणारी अमेरिकन थिंक टँक विल्सन सेंटरचे दक्षिण आशिया संचालक मायकेल कुगेलमन यांना आशा वाटतं की, आता दोन्ही बाजू समान पातळीवर आहेत, परिस्थिती आणखी बिघडणार नाही.

 

कुगेलमन यांनी X वर लिहिलंय, “असं दिसतंय की, पाकिस्तानचा बदला इराणच्या हल्ल्याच्या प्रमाणातच होता. विशेष म्हणजे, यानं केवळ दहशतवाद्यांना लक्ष्य केलं होतं, इराणी सुरक्षा दलांना नाही. शांतपणे विचार केल्यास दोन्ही देशांना तणाव कमी करण्याची संधी आहे. पण ही खूप मोठी गोष्ट आहे.”

 

Published By- Priya Dixit 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Go to Source