राज्यात अनेक ठिकाणी पावसामुळे सुट्टी; रेड, यलो, ऑरेंज अलर्ट काय असतात?

राज्यात अनेक ठिकाणी पावसामुळे सुट्टी; रेड, यलो, ऑरेंज अलर्ट काय असतात?

राज्यात आजही अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. काही ठिकाणी पावसाचा अलर्ट देण्यात आला असून शाळांनाही सुटी जाहीर करण्यात आली आहे.

 

तुम्हीही पावसाच्या या रेड, यलो, ऑरेंज अलर्टबद्दल ऐकलं असेल. पण पावसाचे हे अलर्ट कसे जाहीर केले जातात, पावसाचं प्रमाण कसं मोजलं जातं, हवामान विभागाकडून इशारा कसा दिला जातो? हे तुम्हाला माहीत आहे का…

 

या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊच, त्याबरोबर राज्यातील पावसाची परिस्थिती पण जाणून घेऊ.

 

मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई या सर्व भागात पावसाचं प्रमाण मोजण्यासाठी किंवा पर्जन्यमानाचं निरीक्षण करण्यासाठी हवामान विभाग म्हणजे IMD च्या नेटवर्कसोबतच महानगरपालिका आणि इतर काही संस्थांची नेटवर्क्स आहेत. याचा उपयोग आपल्याला पावसासंदर्भात आकडेवारी देण्यासाठी, पावसाचा अंदाज वर्तवण्यासाठी होतो.

 

हवामान विभाग दररोज पुढच्या पाच दिवसांसाठीचा अंदाज जाहीर करतं. यामध्ये यलो अलर्ट, रेड अलर्ट सारखे इशारे दिले जातात.

 

त्याचबरोबर पुढील तीन ते चार तासांमधील पावसाचा अंदाज ‘नाऊकास्ट’ म्हणून ओळखला जातो. उपग्रहाकडून मिळणारी ताजी छायाचित्रं आणि रडारच्या मदतीनं हा अंदाज वर्तवला जात असतो. या अंदाजाची अचूकता साधारणपणे 80 ते 85 टक्क्यांपेक्षा जास्त असते.

 

24 ते 48 तासाच्या अंदाजाच्या तुलनेत नाऊ कास्टची अचूकता अधिक असते.

 

पावसाच्या तीव्रतेनुसार, यलो अलर्ट, रेड अलर्ट अशा स्वरुपात हा अंदाज वर्तवला जातो. अनेकदा पुणे, सातारा, कोल्हापूरसारख्या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट दाखवला असला, तरी तो या जिल्ह्यातल्या घाट भागापुरता मर्यादित असतो.

 

ढगफुटी म्हणजे काय?

ढगफुटी म्हणजे कमी कालावधीत अती जास्त पाऊस पडणे.

 

भारतीय हवामान विभागाच्या व्याख्येनुसार एका तासात 100 मिलीमीटर पाऊस पडल्यास त्याला ढगफुटी म्हणतात. पण 200 मिलीमीटर पाऊस 24 तासात पडला तर मात्र त्याला ढगफुटी म्हणत नाहीत.

 

हवामान विभागानं जुलै महिन्यात संपूर्ण देशभरात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

 

हवामान विभाग दररोज पुढील पाच दिवसांचा अंदाज वर्तवत असतं. मात्र दररोज हा अंदाज अपडेट केला जातो. त्यामुळे पावसाचा अंदाज घेण्यासाठी रोजचे अपडेट पाहण्याचा सल्ला हवामान विभागानं दिला आहे. त्याचबरोबर नाऊ कास्टमधील पावसाच्या अंदाजावर लक्ष ठेवण्याचाही सल्ला हवामानतज्ज्ञ देतात.

 

मुंबईसाठी महापालिकेचं अॅप आहे ज्याद्वारे पावसाच्या अंदाजाविषयीची माहिती मिळते.

 

पर्यटकांनी घाटभागात किंवा डोंगराळ भागात जाताना पावसाचा अंदाज घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

 

राज्यातील अनेक जिल्ह्यात सुटी जाहीर

कमी दाबाचं क्षेत्र अजूनही किनारपट्टीच्या भागात दिसून येतं आहे. म्हणूनच हवामान विभागानं कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अती पावसासाठी 8 जुलैला रेड अलर्ट दिला होता. तर 9 जुलैसाठी मुंबई, ठाणे, पालघरमध्ये यलो अलर्ट देण्यात आला होता.

 

पुढील 24 तासात राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज असल्यामुळे अनेक ठिकाणी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली.

 

महापालिकेनं 8 जुलैला रात्री संदेश जारी केला की, “भारतीय हवामान खाते (मुंबई) यांच्या वतीने, मुंबई महानगराला अति मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी मुंबई महानगरातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना उद्या मंगळवार दिनांक 9 जुलै 2024 रोजी सुटी जाहीर केली आहे.”

 

सर्व यंत्रणांना सुसज्ज राहण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी दिली आहेत.

 

त्याचबरोबर आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे असे आवाहनसुद्धा करण्यात आले आहे.

 

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा मदत सेवा क्रमांक 1916 यावर संपर्क साधावा.

 

शाळांना सुटी

नवी मुंबई आणि ठाण्यातील शाळांना सुटी

 

हवामान विभागानं वर्तविलेल्या अतीवृष्ट्याच्या अंदाजामुळे नवी मुंबई आणि ठाण्यातील सर्व शाळांना (पहिली ते बारावी) मंगळवार दिनांक 9 जुलै 2024 सुटी जाहीर करण्यात आली आहे.

 

पुणे जिल्ह्यात सुटी जाहीर

 

प्रादेशिक हवामान केंद्राने जिल्ह्यात 9 जुलै रोजी अति मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने जिल्ह्यात पुणे शहर, हवेली, आंबेगाव, खेड, जुन्नर, मावळ, मुळशी आणि भोर तालुक्यातील 12 वी पर्यंतच्या सर्व शाळांना 9 जुलै रोजी सुटी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

 

अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनूचित घटना घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये याकरीता वर नमूद तालुक्यातील 12 वी पर्यंतच्या सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी राहील. मात्र,या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

नागरिकांनी सावधानता बाळगावी, धबधब्याच्या ठिकाणी पर्यटनासाठी जाऊ नये. आवश्यक असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

 

ठाणे जिल्ह्यात शाळांना सुटी जाहीर

हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर 1 ली ते 12 वी पर्यतच्या सर्व माध्यमाच्या/मंडळाच्या ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना 9 जुलै ला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

 

विदर्भात मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज

विदर्भात सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असून मध्यम ते हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे.

 

अकोला, बुलढाणा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. पण पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाअभावी सोयाबीनवर अळी पडण्यास सुरुवात झाली आहे.

 

राज्यातील मुसळधार पावसाचा आढावा

आयएमडीच्या नेटवर्कनं सांताक्रुझमध्ये 8 जुलैला सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार 7-8 जुलैदरम्यानच्या 24 तासात इथे 268 मिलीमीटर पाऊस पडला. महानगरपालिकेची देखील काही ठिकाणी नेटवर्क आहेत ज्याची आकडेवारी हवामान विभागालासुद्धा मिळते. त्यानुसार काही ठिकाणी 8 जुलैला पहाटे 1 ते 7 वाजण्यादरम्यान 300 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली.

 

अर्थात हा मुसळधार पाऊस शहरात सर्वदूर होता. परिणामी मुंबईतील सखल भागात पाणी साचलं.

 

अजूनही मुंबईसाठी यलो अलर्ट आहे. उपग्रहातून मिळालेल्या छायाचित्रानुसार मुंबई आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीजवळ ढग दाटून आल्याचं दिसतं.

 

गुजरातपासून ते केरळपर्यत किनारपट्टीच्या भागात मुसळधार पाऊस झाला आहे. या सर्व भागात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे अरबी समुद्रातून पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांची तीव्रता वाढते. त्यामुळे अतिशय छोट्या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मुंबई आणि कोकण किनारपट्टीत अशा पद्धतीनं पाऊस पडला आहे.

 

हवामान विभागानं आजदेखील (9 जुलै) मुंबई, कोकण, पुणे, नागपूर या भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

 

8 जुलैला राज्यातील बहुतांश भागामध्ये यलो अलर्ट होता. यात मराठवाडा, विदर्भातील काही भाग, उत्तर मध्य महाराष्ट्र मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट होता. सातारा, कोल्हापूरात रेड अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला होता.

 

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सोमवारी (8 जुलै) 200 ते 250 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.

 

 

Go to Source