वादग्रस्त सातबारा…करणीचा उतारा

वादग्रस्त सातबारा…करणीचा उतारा

सौंदत्ती तालुक्यातील शिरसंगी गावात जमीन वादातून करणीचा प्रकार : महिन्यापूर्वी गावकरी-ट्रस्टच्या सदस्यांमध्ये वादावादी
बेळगाव : देवस्थानच्या जमीन वादातून करणीचा प्रकार घडला आहे. सौंदत्ती तालुक्यातील शिरसंगी येथे घडलेल्या करणीच्या या प्रकाराने गावकऱ्यांना धक्का बसला असून हा प्रकार करणाऱ्यांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्याची तयारी त्यांनी ठेवली आहे. वादग्रस्त जमिनीत खड्डे खणून लिंबू व इतर वस्तू पुरून ठेवण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. शिरसंगी येथील प्रसिद्ध श्री काळम्मा देवस्थानच्या जवळच ही घटना घडली आहे. 12 एकर 13 गुंठे जमिनीसंबंधीचा वाद सुरू आहे. गेल्या तीन वर्षांपासून गावकरी व विश्वकर्मा समाज विकास संस्थेमध्ये हा वाद आहे. सध्या हा वाद न्यायप्रविष्ट आहे. असे असताना शुक्रवारी झालेल्या दर्श अमावास्येच्या रात्री जमिनीच्या चारही बाजूंनी छोटे खड्डे खणून करणीचे साहित्य पुरल्याचे उघडकीस आले आहे.
छोट्या गाडग्यातून गावातील काही प्रमुखांची नावे लिहिलेल्या चिठ्ठ्या, सुई, दोरा, बाहुली आदी साहित्य चारही दिशांना पुरण्यात आले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गावकऱ्यांनी करणीचे साहित्य उकरून काढून त्या संस्थेच्या कार्यालयात ठेवून दिले आहे. शेजारच्या जमिनीमध्ये काम करणाऱ्या एका शेतकऱ्याने हा प्रकार पाहिला. त्याने गावकऱ्यांना ही गोष्ट सांगितल्यानंतर गावकरी वादग्रस्त जमिनीवर जमा झाले. करणीच्या प्रकाराने गावकरी भडकले आहेत. एक-दोन दिवसांत पोलिसात तक्रार देण्यात येणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. करणीचे साहित्य विश्वकर्मा समाज विकास संस्थेच्या कार्यालयात ठेवण्यात आले आहे. एक महिन्यापूर्वी गावकरी व ट्रस्टच्या सदस्यांमध्ये वादावादी झाली होती. वादावादीनंतर अमावास्येच्या रात्री करणीचा प्रकार घडला आहे.