जनतेचा विश्वास संपादन करणे महत्त्वाचे

जनतेचा विश्वास संपादन करणे महत्त्वाचे

श्री भट्टकलंक स्वामीजी : दि  महावीर को-ऑप. बँकेचा सुवर्णमहोत्सव : बँकेने शताब्दी साजरी करण्याच्या शुभेच्छा 
बेळगाव : एखाद्या संस्थेला सहकार क्षेत्रात पुढे जायचे असेल तर तिला समाजात विश्वासार्हता मिळविणे गरजेचे आहे. तरच सहकारी संस्था वाढू शकते, असे विचार सोंदा मठाचे स्वस्तिश्री भट्टारक भट्टकलंक स्वामीजी यांनी व्यक्त केले. महावीर भवन येथे रविवारी दि महावीर को-ऑप. बँकेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. सहकार क्षेत्र सर्वात मोठे असल्याचे जनतेचा विश्वास संपादन करणे महत्त्वाचे आहे. बेळगावची महावीर बँक आता 50 वा वर्धापन दिन साजरा करत आहे, ही आनंदाची बाब आहे. संस्थेने आत्मविश्वासाने काम केल्यामुळेच आज सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
महावीर बँक 50 वर्षांपूर्वी सुरू झाली, तेव्हा तत्कालीन सामाजिक परिस्थितीचे निरीक्षण करून तत्कालीन संचालकांनी बँक सुरू केली असावी. त्यांचा त्याग, संस्थेच्या प्रती असलेली निष्ठा, प्रामाणिकपणा आणि समाजात आणि लोकांमध्ये कमावलेला विश्वास यामुळेच महावीर बँकेला आज इतक्मया उंचीवर नेण्यास मदत झाली असून आगामी काळात महावीर बँक शताब्दीही साजरी करेल, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य डी. जे. गुंडे म्हणाले की, बँकेची व्यवस्था अति प्राचीन आहे. मात्र लोकांच्या विश्वासाअभावी अनेक बँका बंद पडल्या आहेत. 50 वर्षे यशस्वीपणे बँक चालविणे सोपे नाही. लोकांच्या ठेवींची हमी देणे आणि कर्जवसुलीत ठाम राहणे ही अवघड बाब आहे. अशा परिस्थितीतही महावीर बँकेने यशस्वीपणे प्रगती केली असून तेही बँकेचे व्यवस्थापन मंडळ आणि प्रामाणिक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळेच असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी आमदार संजय पाटील यांनी महावीर बँक गेल्या 50 वर्षांपासून अतिशय यशस्वीपणे प्रगती करत आहे. 1993 मध्ये बेळगावातील ज्येष्ठ उद्योजक बाळासाहेब पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बँकेच्या प्रगतीला वेग आला आणि संस्था अशीच भरभराट करत राहील, असा विश्व़ास त्यांनी व्यक्त केला. सहकार विभागाचे सहसंचालक सुरेश गौडा म्हणाले की, आरबीआय आणि कर्नाटक सरकारने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन करून आणि ग्राहकांचा वाद न होता महावीर बँकेचा कारभार पारदर्शकपणे सुरू आहे. बँकेची अशीच प्रगती करा, असे ते म्हणाले. यावेळी आमदार अभय पाटील यांनीही बँकेला शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी नमोकार मंत्राचे पठण केले. संचालक भूषण मिरजी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. बँकेच्या सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनोदा गुंडे यांनी बँकेच्या प्रगतीची माहिती दिली. यावेळी अजित पाटील, तुषार पाटील, अनिल पाटील, हिराचंद कलमणी, श्रीपाल खेमलापुरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. बँकेचे माजी अध्यक्ष पी. एम. लेंगडे व माजी संचालक व सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष एस. बी. निलजगी, संचालक यू. टी. कोल्हापुरे, बी. बी. पुजार, ए.बी. पाटील, पी. बी. वणकुद्रे, एस. डी. शिरगुप्पे, ए. व्ही. पाटील, ए. एस. पाटील आणि जे. के. बडिगेर आणि व्यवस्थापन मंडळाच्या सदस्य, तुषार पाटील आणि श्रेणिक लेंगडे उपस्थित होते. शील मिर्जी यांनी आभार मानले. सूरज व अश्विनी यांनी सूत्रसंचालन केले.