काँग्रेसकडून भेदभाव न करता विकास

काँग्रेसकडून भेदभाव न करता विकास

प्रियांका जारकीहोळी : यमकनमर्डी मतदारसंघात प्रचार
बेळगाव : कोणताही भेदभाव न करता समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणाऱ्या काँग्रेस पक्षाला समर्थन द्या, असे आवाहन चिकोडी लोकसभा उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी केले. यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघातील इस्लामपूर, शहाबंदर आदी गावांमध्ये प्रचार करून त्या बोलत होत्या. केंद्राकडून पक्षपाती राजकारण केले जात आहे. अशा वेळी राज्य सरकारकडून राबविलेल्या गॅरंटी योजनांमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. काँग्रेसकडून नेहमीच नि:पक्षपाती धोरण राबविण्यात आले आहे. समाजातील  गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक नागरिकाच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. चिकोडी लोकसभा सदस्यांच्या अपयशाचा पाढा त्यांनी वाचला. यावेळी काँग्रेसला समर्थन देऊन विकासाला प्राधान्य द्या, असे आवाहन त्यांनी केले. काँग्रेस सरकार नेहमीच गोरगरीब आणि शेतकऱ्यांच्या बाजूने राहिले आहे. सत्तेवर येऊन 9 महिन्यांचा कालावधी उलटला आहे. या दरम्यान सरकारने जारी केलेल्या गॅरंटी योजनांची समर्पक अंमलबजावणी करून नागरिकांच्या विकासाला हातभार लावला आहे. सर्वधर्मियांना न्याय देण्यात आला आहे. कोणताच भेदभाव न करता विकासाचे धोरण राबविण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी महिला संघांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पक्षाचे कार्यकर्ते, स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.