दोन थेंबांसाठी पक्ष्यांची घालमेल

दोन थेंबांसाठी पक्ष्यांची घालमेल

वाढत्या उष्म्याने असह्या : ‘पक्षी वाचवा’ उपक्रमाची गरज : कृत्रिम पाणवठ्यांची आवश्यकता
बेळगाव : सर्वत्र कडक उन्हामुळे मानवाबरोबर पशु-पक्ष्यांनाही उन्हाच्या झळा असह्या होऊ लागल्या आहेत. पाण्यासाठी पक्ष्यांना चोहीकडे वणवण फिरावे लागत आहे. पाण्याविना काही पक्ष्यांना जीवही गमवावा लागत आहे. अशा परिस्थितीत ‘पक्षी वाचवा’ उपक्रमाची गरज व्यक्त होऊ लागली आहे. यासाठी निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी आणि पक्षीप्रेमींनी पुढे येऊन पक्ष्यांना कृत्रिम पाणवठे निर्माण करावेत, अशी मागणी होत आहे. उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मानव यासाठी विविध उपाययोजना करीत आहेत. मात्र, प्रचंड उष्म्याने पक्ष्यांच्या जीवाची दोन थेंबांसाठी घालमेल होऊ लागली आहे. वाढत्या उष्म्याचा परिणाम पक्ष्यांवर होऊ लागला आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने आपल्या अंगणात-परसात कृत्रिम ट्रे किंवा इतर साहित्य ठेवून पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही पक्षीप्रेमींतून होत आहे.
वृक्षतोड, मोबाईल टॉवर आणि इंटरनेटमुळे पक्ष्यांच्या संख्येत झपाट्याने घट होत आहे. आपल्या आजुबाजूला दिसणारे चिमणी आणि कावळे आदी पक्षी दुर्मीळ होऊ लागले आहेत. सद्यस्थितीत वाढत्या उष्म्यामुळे पक्ष्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. यासाठी पक्ष्यांच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढे येणे गरजेचे आहे. आपल्या आजूबाजूला पक्ष्यांना खाण्या-पिण्याची व्यवस्था करणे गरजेचे बनले आहे. हिवाळ्यात पाहुण्या पक्ष्यांचे आगमन होते. शिवाय बेळगावात विविध जातीच्या पक्ष्यांची संख्याही टिकून आहे. विशेषत: चिमणी, कावळे, कबूतर, बदक, बगळे, भारद्वाज, कोकिळा, पोपट, घार, मोर आदींचा समावेश आहे.
मागील वर्षी पावसाच्या प्रमाणात घट झाली होती. त्यामुळे यंदा सर्वत्र पाणी समस्या गंभीर बनू लागली आहे. नदी, नाले, तलाव आणि जलाशयांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. त्यामुळे पाण्याच्या झळा तीव्र बनू लागल्या आहेत. आकाशात विहार करणाऱ्या पक्ष्यांनाही पाणी मिळेनासे झाले आहे. नाले आणि तलाव आटले आहेत. त्यामुळे पक्ष्यांना पाण्यासाठी इकडून तिकडे आणि तिकडून इकडे फिरावे लागत आहे. पाण्यासाठी पक्षी सैरभैर होऊ लागले आहेत. अशा परिस्थितीत पक्ष्यांना छोटे-मोठे पाणवठे तयार करणे गरजेचे बनले आहे. नागरिकांनी घरच्या अंगणात, परसात, गच्चीवर, झाडावर किंवा इतर ठिकाणी पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी पक्षीप्रेमींनी केली आहे. वाढत्या उन्हामुळे पशू-पक्षी मानवी वस्तीत येण्याचे प्रमाण वाढले आहे. डोंगर क्षेत्रात पशू-पक्ष्यांना चारा-पाण्याची कमतरता भासत असल्याने ते मानवी वस्तीकडे वळू लागले आहेत. पक्ष्यांप्रती दया दाखवून पक्षी वाचवा उपक्रमाला हातभार लावणे गरजेचे बनू लागले आहे.
नागरिकांचे सहकार्य आवश्यक
वाढत्या उन्हामुळे पक्ष्यांना चारा-पाणी मिळेनासे होऊ लागले आहे. अति उष्म्यामुळे पक्ष्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ लागला आहे. नागरिकांनी आपल्या आजूबाजूला किंवा झाडांवर पक्ष्यांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था करावी. इंटरनेटच्या जमान्यात पक्ष्यांची संख्या धोक्यात येऊ लागली आहे. यासाठी पक्षी वाचवा उपक्रमाला सहकार्य करणे आवश्यक आहे.
– अमन उसुलकर (पक्षीप्रेमी)
पशू-पक्ष्यांचे संवर्धन गरजेचे
बेळगाव विभागातील वन्यप्रदेशात पशू-पक्ष्यांना चारा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. निसर्ग, पर्यावरण आणि पशू-पक्ष्यांच्या संवर्धनाची जबाबदारी सर्वांची आहे. निसर्ग व पशू-पक्षी हे आपले दागिने आहेत. त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. नागरिकांनी पशू-पक्ष्यांच्या चारा-पाण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे.
– पुरुषोत्तम रावजी (आरएफओ, बेळगाव)