राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यात एका दलित युवकाला ‘आमच्या दुकानातून दारू का विकत घेत नाही?’ असे विचारत बेदम मारहाण करण्यात आली. या युवकाला अत्यंत कठोर शिक्षा दिली गेली. त्याला कोंबडा बनवण्यात आले आणि बेल्ट व काठ्यांनी मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. ही घटना काय आहे आणि युवकाला कधी व कशी मारहाण करण्यात आली याचा हा ग्राउंड रिपोर्ट.
“मी एकटी राहिली. तो माझा लाडका, माझ्या गळ्यातील ताईत, माझं सारं काही होता. मी त्याला लहानाचा मोठा केला होता. माझी इच्छा आहे की एकतर मला फाशी द्या किंवा त्यांना.”
एका झाडाखाली खाटीच्या शेजारी जमिनीवर हात जोडून बसलेल्या, रडत हुंदके देणाऱ्या 65 वर्षांच्या या वृद्ध महिलेचं नाव राधा देवी आहे.
26 वर्षांपूर्वी राधा देवीचे पती हडमान वाल्मिकी यांचे निधन झाले, तेव्हा त्यांचा सर्वांत लहान मुलगा रामेश्वर फक्त सहा दिवसांचा होता. त्यांनी एकट्याने संघर्ष करत रामेश्वरचे संगोपन केले आणि तोच त्यांच्या म्हातारपणाचा आधार बनला.
14 मे रोजी रामेश्वरची त्याच्या घराजवळ कथितरित्या हत्या करण्यात आली. त्याला जवळपास सहा तास लाठ्यांनी निर्दयीपणे मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला.
या उतार वयात, थकलेले शरीर, चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, आणि मागील दहा दिवसांपासून तापाने त्रस्त राधा देवी आपल्या मुलाच्या खुन्यांना फाशी देण्याची मागणी करत आहेत.
राजस्थानमधील बलौदा गावातील हृदय विदारक घटना :
राजस्थानची राजधानी जयपूरपासून सुमारे 250 किलोमीटर अंतरावर, हरियाणाच्या सीमेच्या जवळ झुंझुनू जिल्ह्यात बलौदा गाव आहे.
गावात पक्क्या रस्त्यापासून निघून सरकारी शाळेच्या शेजारील वाळूच्या वाटेवरून एक किलोमीटर पुढे गेल्यावर एका गल्लीत कोपऱ्यावर एक घर आहे.
या घराच्या चार भिंतींमध्ये, एका झाडाखाली राधा देवी बसलेल्या आहेत.