मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध

मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध

खासदार प्रियांका जारकीहोळी : काँग्रेस कार्यालयात जंगी स्वागत
बेळगाव : लोकसभा निवडणुकीत निवडून येऊन खासदार म्हणून शपथ घेतल्यानंतर प्रियांका जारकीहोळी पहिल्यांदाच शहराच्या भेटीवर आल्या. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून संगोळ्ळी रायण्णा चौक येथील काँग्रेस कार्यालयात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांकडून फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. तत्पूर्वी नेहरूनगर येथील नागनूर मठाला भेट देऊन डॉ. अल्लम्मप्रभु स्वामीजींचे आशीर्वाद घेतले. तेथील जुन्या ग्रंथांची व वचन साहित्याची पाहणी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाला भेट देऊन डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केले. चन्नम्मा चौक, बसवेश्वर चौक, छ. शिवाजी उद्यानातील शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हार अर्पण करून अभिवादन केले. अशाप्रकारे शहरातील मंदिरे व दर्ग्यांना भेटी देऊन पूजा केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या,दिल्ली येथील संसद भवनमध्ये झालेल्या अधिवेशनात अनेक थोर नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन सभागृहातील त्यांची भाषणे ऐकण्याची संधी मिळाली, ही आनंदाची बाब आहे. आता आपल्यावर जबाबदारी वाढली असून भविष्यात आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वसामान्य व गोरगरिबांची सेवा करण्यासाठी आपण कार्यतत्पर असल्याचे त्यांनी सांगितले.
चिकोडी लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी आपल्यावर विश्वास ठेऊन निवडून दिले आहे. त्यांच्या मागणीनुसार टप्प्याटप्प्याने समस्यांचे निवारण केले जाईल. आपले वडील सतीश जारकीहोळी यांच्याशी मतदारसंघातील नेत्यांसह कार्यकर्त्यांचे जवळचे संबंध आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामे राबविण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस कार्यालयामध्ये झालेल्या कार्यक्रमादरम्यान जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या कार्यर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी बेळगाव ग्रामीण जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विनय नावलगट्टी, कार्यदर्शी प्रदीप एम. जे., रामण्णा गुळ्ळी, केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, राजेंद्र पाटील, बसवराज शिग्गावी आदी उपस्थित होते.