बफेलो सोल्जर्स चक्क रेड्यावर बसून पोलीस घालतात गस्त

बफेलो सोल्जर्स चक्क रेड्यावर बसून पोलीस घालतात गस्त

पोलिसांकडे कोणती गाडी असते असा प्रश्न भारतात विचारला तर एकदोन गाड्यांची नावे मनात येतील. यात मारुतीची जिप्सी पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र आता भारतात पोलिसांच्या गाड्यांमध्ये बरेच बदल झाले आहेत. आता अनेक राज्य सरकारांनी पोलिसांना अत्याधुनिक गाड्या पुरविल्या आहेसत. पण एका ठिकाणी लष्करी पोलीस रस्त्यावर आणि शेतात घोड्यावरून किंवा वाहनावरून गस्त घालत नाहीत. तर पोलीस चक्क रेड्यावर बसून गस्त घालतात. ब्राझीलमधील उत्तर भागात अमेझॉन नदी जेथे अटलांटिक महासागरात सामावते, तेथे माराजो नावाचे एक बेट आहे, स्वीत्झर्लडच्या आकाराचे हे बेट अत्यंत सुंदर आणि जैववैविध्याने नटलेले आहे, मात्र तिथली एक विचित्र पद्धत लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. पद्धत म्हणजे पोलिसांची गस्त घालण्याची अनोखी पद्धत. याठिकाणी पोलीस चक्क रेड्यावर बसून गस्त घालतात.
येथे लष्करी पोलीस चक्क रेड्यांचा वापर करतात. एशियन वॉटर बफेलोज या प्रजातीचे हे आशियाई रेडे त्यांना यासाठी सोयीचे वाटतात. हीच प्रजाती भारत आणि आग्नेय आशियामधील अनेक देशांमध्ये आढळते. हे आशियाई रेडे या बेटावर कसे पोहोचले हे देखील एक कोडंच आहे. काहींच्या मते बेटाच्या किनाऱ्यावर एक जहाज धडकले होते आणि त्यामधील रेडे या बेटावर आले. तर काहींच्या मते फ्रेंच गयानाच्या तुरुंगातून पळून आलेल्या कैद्यांनी स्वत:समवेत हे हे रेडे आणले होते.
5 लाखाच्या आसपास संख्या
हे आशियाई रेडे आता तेथे चांगलेच रुळले आहेत. आता त्यांची संख्या 5 लाखाच्या आसपास आहे. विशेष म्हणजे बेटावरील लोकसंख्या 4 लाख 40 हजार आहे. याचा अर्थ तिथे माणसांपेक्षा रेडे, म्हशीच अधिक झाल्या आहेत. त्यांना आता बेटावरील लोकांच्या संस्कृतीमध्ये आणि आर्थिक क्षेत्रातही महत्त्वाचे स्थान आहे.
19 व्या शतकात नाव
19 व्या शतकात अमेरिकन सैनिकांनी या पोलिसांना बफेलो सोल्जर्स हे नाव दिले होते. या रेड्यांच्या पाठीवर विशेष खोगीर घालून त्यावर पोलीस बसलेले असतात. ज्यावेळी पुरामुळे बेटावरील रस्त्यांवर चिखल होतो, अशा वेळी वाहने किंवा घोड्यांच्या तुलनेत रेड्यांची सवारी फायद्याची ठरते. चिखलातून वाट काढणे रेड्यांनाही सोपे जाते.