हुबळीत आणखी एका युवतीची निर्घृण हत्या
प्रेमाचा प्रस्ताव नाकारल्याने नराधमाकडून झोपेत असताना युवतीवर चाकूहल्ला
प्रतिनिधी/ बेंगळूर
हुबळीतील महाविद्यालयीन विद्यार्थिनी नेहा हिरेमठ हिच्या हत्येची घटना ताजी असतानाच अशीच घटना पुन्हा घडली आहे. झोपेत असलेल्या युवतीची युवकाने चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना हुबळीतील विरापूर गल्ली येथे बुधवारी पहाटे घडली आहे. प्रेमाचा प्रस्ताव धुडावल्याच्या रागातून युवकाने हे कृत्य केले आहे. या घटनेमुळे खळबळ माजली असून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी विविध संघटनांनी केली आहे.
गिरीश सावंत उर्फ विश्व (वय 21) असे हत्या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. त्याचे अंजली अंबिगेर (वय 19) या युवतीवर एकतर्फी प्रेम होते. त्याच्या प्रेमाचा प्रस्ताव अंजलीने धुडकावून लावला होता. त्याने अंजलीला म्हैसूरला फिरण्यासाठी सोबत येण्यास सांगितले. नकार दिल्यास नेहा हिरेमठप्रमाणे तुला ठार करेन, अशी धमकीही दिली. याविषयी अंजलीच्या आजी गंगम्मा हिने पोलिसांना याविषयी माहिती दिली. पण पोलिसांनी त्याकडे कानाडोळा केल्याचे सांगितले जात आहे.
बुधवारी पहाटे 5:30 च्या सुमारास गिरीशने अंजलीच्या घराचा दरवाजा ठोठावला. दरवाजा कोणीही उघडत नसल्याने त्याने पुन्हा जोराने दरवाजा ठोठावला. अंजलीच्या बहिणीने दरवाजा उघडल्यानंतर गिरीशने अंजलीवर चाकूहल्ला केला. तिचा गळा आवळून स्वयंपाक खोलीत नेऊन पोटावर चारवेळा वार केले. यात अंजली जागीच गतप्राण झाली. अंजलीचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर गिरीशने पलायन केले.
आरोपीवर चोरीचेही गुन्हे
या घटनेप्रकरणी भेंडीगेरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी गिरीशवर दुचाकी चोरीसह अनेक प्रकरणांत गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले आहे. गिरीशचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके नेमण्यात आली आहेत. तीन दिवसांच्या रजेवर गेलेल्या हुबळी-धारवाडच्या पोलीस आयुक्त रेणुका सुकुमार तातडीने सेवेत हजर झाल्या.
किम्स हॉस्पिटल, चन्नम्मा सर्कलमध्ये आंदोलन
शवविच्छेदनानंतर अंजलीचा मृतदेह पालकांच्या स्वाधीन करण्यात आला. यावेळी हुबळीच्या किम्स इस्पितळाबाहेर जमलेल्या जमावाने मृतदेह अंत्यसंस्काराला नेण्यापासून नागरिकांनी रोखले. तसेच राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. हत्येच्या घटनेमुळे संतप्त झालेल्या विविध संघटना आणि नागरिकांनी जिल्हाधिकारी अंजलीच्या घराला भेट देईपर्यंत मृतदेह इस्पितळातून नेऊ देणार नाही, अशी भूमिका घेत किम्स हॉस्पिटल आणि चन्नम्मा सर्कलमध्ये आंदोलन केले.
Home महत्वाची बातमी हुबळीत आणखी एका युवतीची निर्घृण हत्या
हुबळीत आणखी एका युवतीची निर्घृण हत्या
प्रेमाचा प्रस्ताव नाकारल्याने नराधमाकडून झोपेत असताना युवतीवर चाकूहल्ला प्रतिनिधी/ बेंगळूर हुबळीतील महाविद्यालयीन विद्यार्थिनी नेहा हिरेमठ हिच्या हत्येची घटना ताजी असतानाच अशीच घटना पुन्हा घडली आहे. झोपेत असलेल्या युवतीची युवकाने चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना हुबळीतील विरापूर गल्ली येथे बुधवारी पहाटे घडली आहे. प्रेमाचा प्रस्ताव धुडावल्याच्या रागातून युवकाने हे कृत्य केले आहे. या घटनेमुळे खळबळ माजली […]