स्टीफन फ्लेमिंग, टॉम मुडी टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत

स्टीफन फ्लेमिंग, टॉम मुडी टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत

व्हीव्हीएस लक्ष्मण, गौतम गंभीरचीही नावे चर्चेत
वृत्तसंस्था/ मुंबई
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपणार आहे. आगामी टी 20 वर्ल्डकप हा अमेरिकेत आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. या टी 20 विश्वचषकानंतर राहुल द्रविड यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपेल. अशा स्थितीत टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू झाला आहे.  बीसीसीआय 27 मे पर्यंत अर्ज मागवत आहे, त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग, ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू टॉम मुडी, भारतीय संघाचे माजी खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मण, गौतम गंभीर यांची नावे टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आहे. बीसीसीआयच्या अटींप्रमाणे नवे मुख्य प्रशिक्षक हे भारताच्या तिन्ही फॉरमॅटमधील संघाला प्रशिक्षण देतील. त्यामुळे वर्षातून 10 महिने संघासोबत राहणे आवश्यक असलेल्या या पदासाठी हे सर्वजण अर्ज करतात का, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.
बीसीसीआयने सोमवारी भारतीय संघाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकाच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरु केली आहे. स्टीफन फ्लेमिंग 2009 पासून चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक आहेत. त्यांच्या प्रशिक्षकपदाखाली सीएसकेने 5 आयपीएल जेतेपदे पटकावली आहेत. फ्लेमिंग टीम इंडियाचे हेड कोच झाले तर येत्या काही वर्षांत भारतीय क्रिकेटची स्थिती बदलण्याची शक्यता आहे. फ्लेमिंग यांच्याकडे उत्तम व्यवस्थापन कौशल्य असल्याने सध्याच्या घडीला त्यांचे मुख्य प्रशिक्षकपदासाठी आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू टॉम मुडीसह जस्टिन लँगर यांचे नावही प्रशिक्षकपदासाठी चर्चेत आहेत. टॉम मुडी यांनी वेळोवेळी प्रशिक्षपदाच्या कालावधीत आपली योग्यता सिद्ध केली आहे. याशिवाय, भारतीय क्रिकेटमध्ये खूप प्रतिभा आहे. भारतीय संघाचा प्रशिक्षक बनणे माझ्यासाठी नक्कीच आकर्षक असेल, असे प्रतिपादन जस्टीन लँगर यांनी केले आहे. काही भारतीय दिग्गज खेळाडूही प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत आहेत. यामध्ये गौतम गंभीर आणि व्ही व्ही एस लक्ष्मण यांची नावे आघाडीवर आहे. लक्ष्मण सध्या एनसीए प्रमुख आहेत तर गौतम गंभीरला क्रिकेटमधील प्रत्येक फॉरमॅट समजतो. त्याचे तांत्रिक कौशल्य नाकारता येणार नाही. केकेआरचा कर्णधार म्हणून दोन आयपीएल विजेतेपदे जिंकण्याव्यतिरिक्त, पहिल्या दोन वर्षांत लखनौ सुपर जायंट्सला प्लेऑफमध्ये नेण्याचे श्रेय त्याच्याकडे आहे.
टीम इंडियाचा जो कोणी नवीन प्रशिक्षक असेल, त्यांचा कार्यकाळ 1 जुलैपासून सुरू होईल आणि 31 डिसेंबर 2027 पर्यंत चालेल. याचा अर्थ नवीन प्रशिक्षक 2027 च्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकापर्यंत भारतीय संघाची जबाबदारी सांभाळतील. यामुळे आगामी काळात टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी कोणाची वर्णी लागते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.