जिल्ह्यातील 11 शाळांच्या हाती भोपळा

जिल्ह्यातील 11 शाळांच्या हाती भोपळा

जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडून कारणे दाखवा नोटीस : शिक्षणाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह
बेळगाव : बेळगाव व चिकोडी शैक्षणिक जिल्ह्याने यावर्षीच्या दहावीच्या निकालात निराशा केली आहे. यावर्षी बेळगाव जिल्ह्यातील तब्बल 11 शाळांचा शून्य टक्के निकाल लागल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे शिक्षणाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. गुरुवारी दहावीचा निकाल जाहीर झाला आणि बेळगावच्या निकालात मोठी घसरण झाली. मागील वर्षी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 85.85 टक्के निकाल लागला होता. तर यावर्षी 64.93 टक्के निकाल लागला आहे. मागील वर्षी राज्यात 26 व्या स्थानावर असणारा बेळगाव शैक्षणिक जिल्हा यावर्षी 29 व्या स्थानावर फेकला गेला. निकालात घसरण होत असल्याने याला जबाबदार कोण? असा प्रश्न पालकांमधून विचारला जात आहे. मागील काही वर्षांपूर्वी चिकोडी शैक्षणिक जिल्हा हा राज्यात पहिल्या दहामध्ये येत होता. परंतु, या शैक्षणिक जिल्ह्याची मागील चार ते पाच वर्षांत मोठी घसरण झाली आहे. त्यातच बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 6 तर चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील 5 शाळांचा शून्य टक्के निकाल लागला आहे. या 11 शाळांना जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली असून या शाळांवर कोणती कारवाई होते? हे पहावे लागणार आहे.
जिल्हा शिक्षणाधिकारी पद रिक्तच
ऑक्टोबर 2023 मध्ये तत्कालीन जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड यांच्यावर लाचखोरी प्रकरणी लोकायुक्तांनी कारवाई केली. मागील सात महिन्यांत कायमस्वरुपी जिल्हा शिक्षणाधिकारी नेमणूक करण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. तात्पुरत्या स्वरुपात बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचा कारभार चिकोडी शैक्षणिक जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी मोहनकुमार हंचाटे यांच्याकडे देण्यात आला. कायमस्वरुपी शिक्षणाधिकारी नसल्यामुळे याचाही परिणाम निकालावर झाल्याची तक्रार पालक व शिक्षकांमधूनही केली जात आहे.
जून महिन्यात होणार पुरवणी परीक्षा
मुख्य परीक्षेत अनुत्तीर्ण ठरलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाने आणखी एक संधी उपलब्ध करून दिली आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दहावीची पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत, त्यांनी पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.