पाण्याच्या टाकीत पडून चार वर्षीय बालकाचा मृत्यू

पाण्याच्या टाकीत पडून चार वर्षीय बालकाचा मृत्यू

महांतेशनगर येथील घटनेने हळहळ
बेळगाव : खेळता खेळता पाण्याच्या टाकीत पडून एका चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी महांतेशनगर येथील लव डेल स्कूलजवळ ही घटना घडली आहे. माळमारुती पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. प्रीतम राजू राठोड (वय 4 वर्षे) मूळचा राहणार अरेबेंची तांडा, ता. रामदुर्ग, सध्या रा. महांतेशनगर असे त्या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनेची माहिती समजताच माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दुर्दैवी प्रीतमचे आई-वडील महांतेशनगर परिसरात सुरू असलेल्या एका नव्या बांधकामावर काम करतात. बांधकामासाठी जमिनीत पाण्याची टाकी बांधली आहे. खेळता खेळता प्रीतम पाण्याच्या टाकीत पडला. आपला मुलगा कोठे गेला? या चिंतेने त्याचे आई-वडील त्याचा सर्वत्र शोध घेत होते. त्याचवेळी पाण्याच्या टाकीत पडून प्रीतमचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून बालकाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयांनी तो अरेबेंची तांड्याला नेला. प्रीतमच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ, बहीण असा परिवार आहे. या घटनेमुळे प्रीतमच्या आई-वडिलांना धक्काच बसला आहे.