अक्षय्य तृतीयानिमित्त बाजारात गर्दी

अक्षय्य तृतीयानिमित्त बाजारात गर्दी

सोने-चांदीची खरेदी : उलाढाल वाढली
बेळगाव : साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयासाठी बाजारपेठेत शुक्रवारी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. विशेषत: सोने-चांदी, इलेक्ट्रिक वस्तू आणि नवीन वाहनांना पसंती देण्यात आली. अक्षय्य तृतीया हा सोने-चांदी खरेदीसाठी उत्तम दिवस मानला जातो. त्यामुळे सराफी दुकानांमध्ये सोने-चांदी खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ वाढली होती. अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर नवीन वस्तू खरेदीवर भर देण्यात आला होता. त्यामुळे गणपत गल्ली, मारुती गल्ली, पांगूळ गल्ली, खडेबाजार, किर्लोस्कर रोड, समादेवी गल्ली आदी ठिकाणी नागरिकांची गर्दी वाढली होती. विशेषत: ज्वेलरी दुकानांमध्ये चेन, ब्रेसलेट, नेकलेस, चांदी-तांब्याचे ताट या साहित्यांची खरेदी वाढली होती. त्यामुळे उलाढालही साहजीकच वाढली होती. याबरोबर इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची शुभमुहूर्तावर खरेदी झाली. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिक शोरुममध्ये नागरिकांची लगबग पाहावयास मिळाली. लग्नसराई, यात्रा-जत्रामुळे बाजारात गर्दी वाढू लागली आहे. त्यातच शुक्रवारी अक्षय्य तृतीयेचा शुभमुहूर्त असल्याने बाजारात गर्दी वाढली होती. त्याचबरोबर कपड्याची दुकाने, सराफी दुकाने, शोरुममध्ये नागरिकांची वर्दळ पाहावयास मिळाली. एकूणच शुक्रवारी अक्षय्य तृतीयानिमित्त बाजारात उलाढालीचे प्रमाण वाढले होते. काही ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे फळा-फुलांची मागणीही वाढली होती.
आंब्याची विक्री
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शुक्रवारी फळ बाजारात विविध जातींच्या आब्यांची मागणी वाढली होती. हापूस, तोतापुरी, मानखूर, पायरी आदी विविध प्रकारच्या आंब्याची खरेदी झाली. आंब्याची आवक वाढल्याने 300 ते 350 रुपये डझन असा दर आहे. त्याबरोबर स्थानिक आंबेही दाखल झाले आहेत. त्यामुळे अक्षय्य तृतीयानिमित्त आंब्यांनी बाजारपेठ बहरली होती.