भक्त प्रल्हाद
हिरण्यकश्यपूचा वध श्रीनृसिंहदेवानी केल्यानंतर भगवंत अत्यंत क्रोध प्रकट करीत होते. हिरण्यकश्यपूच्या विनाशानंतरही त्यांचा क्रोध मावळला नाही. त्यावेळी ब्रम्हदेवासहित इतर देवतासुद्धा श्रीनृसिंहदेव यांचा क्रोध शांत करू शकले नाहीत. भगवंतांची नित्य सहचारिणी असणारी लक्ष्मीदेखील व्रुद्ध श्री नृसिंहदेवांच्या समोर जाऊ शकली नाही. त्यावेळी ब्रह्मदेवांनी प्रल्हाद महाराजांना भगवंतांसमोर जाऊन क्रोधशमन करण्यास सांगितले. आपल्या भगवंतांचे आपल्यावर प्रेम आहे, हे निश्चितपणे जाणणारे प्रल्हाद महाराज भगवंतांसमोर जाण्यास मुळीच भयभीत झाले नाहीत. ते गंभीरपणे भगवंतांसमोर गेले आणि त्यांच्या चरणांना सादर प्रणाम केला. प्रल्हाद महाराजांवर अतीव प्रेम करणाऱ्या नृसिंहदेवांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवून आशीर्वाद दिला. भगवंतांच्या या दिव्य स्पर्शांमुळे प्रल्हाद महाराजांना त्वरित आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झाले. त्यामुळे त्यांनी भगवान नृसिंहदेवांची भक्तिमय आनंदाने संपन्न अशी सुंदर प्रार्थना केली. प्रल्हाद महाराजांनी पूर्ण एकाग्रतेने आणि समाधिस्त भावनेने आपले मन आणि नेत्र भगवान नृसिंहदेवावर स्थिर केले. अशा स्थिर मनाने त्यांनी प्रेमपूर्वक तथा सद्गदित वाणीने भगवंतांची स्तुती करण्यास प्रारंभ केला.
प्रल्हाद महाराज नम्रतेने म्हणाले (भा 7.1.8) “उग्र असुरकुळात जन्मलेला मी कशी काय योग्य शब्दात भगवंतांची स्तुती करून त्यांना संतुष्ट करू शकेन? ब्रम्हादिक सर्व देव आणि श्रेष्ठ महषी सत्वगुणामध्ये स्थित असल्यामुळे पूर्णपणे गुणवत्ताप्राप्त आहेत, तरी ते देखील उत्तम श्लोकांनी युक्त आपल्या वाचारूपी प्रवाहांनी भगवंतांना आतापर्यंत संतुष्ट करू शकलेले नाहीत. असे असताना माझ्याबद्दल काय सांगावे? मी तर पूर्णत: गुणवत्ताहीन आणि अपात्र आहे.” या प्रार्थनेमध्ये प्रल्हाद महाराज आपली नम्रता प्रकट करीत आहेत. भगवंतांची सेवा करण्यास पूर्णपणे पात्र असणारा प्रल्हाद महाराजांसारखा वैष्णव भगवंतांची स्तुती करताना स्वत:ला अत्यंत हीन समजतो. मनुष्य जर सहनशील आणि नम्र नसेल तर त्याला हरिभक्तीमध्ये प्रगती करणे अतिशय कठीण जाते. प्रल्हाद महाराज पुढे म्हणाले (भा. 7.9.9) अर्थात “एखादा मनुष्य धनवान, उच्च कुळात जन्मलेला तसेच सौंदर्य, तपस्या, विद्या, इंद्रियसामर्थ्य, तेज, प्रभाव, शारीरिक सामर्थ्य, दक्षता, बुद्धी आणि योगशक्ती या गुणांनी संपन्न असू शकतो, पण माझ्या मते, या सर्व गुणांद्वारे देखील तो भगवंतांना संतुष्ट करू शकत नाही, परंतु मनुष्य केवळ भक्तिमय सेवेने भगवंतांना संतुष्ट करू शकतो. गजेंद्राने अशी भक्तिमय सेवा केल्यामुळेच भगवंत त्यांच्यावर संतुष्ट झाले.” (भा. 7.9.14) अर्थात “हे नृसिंहदेव! आता असुरराज हिरण्यकश्यपूचा मृत्यू झालेला असल्यामुळे कृपया आपला क्रोध त्यागा. ज्याप्रमाणे अगदी साधुपुऊषांनाही विंचू, साप यांच्या वधाने आनंद होतो, त्याप्रमाणे या असुराचा मृत्यूने सर्व ग्रहलोक सुखी आणि आनंदित झालेले आहेत. आता ते स्वत:च्या सुखाविषयी निश्चिन्त झालेले असून भयमुक्तीसाठी तुमच्या मंगलमय अवताराचे स्मरण करतील. (भा. 7.9.15) “हे अपराजित भगवंता! मला तुमच्या अक्राळविक्राळ मुखाचे आणि जिव्हेचे, सूर्यसमान प्रखर नेत्रांचे किंवा वटारलेल्या भुवयांचे निश्चितच भय वाटत नाही. मला तुमचे तीक्ष्ण आणि उग्र दात, आतड्यांच्या माळा, रक्ताने माखलेली मानेवरील आयाळ किंवा शंकूप्रमाणे उभे राहिलेले कान याचेही भय वाटत नाही. श्रेष्ठ हत्तींना सर्व दिशांना पळवून लावणारी तुमची प्रचंड गर्जना किंवा शत्रूंचा विनाश करणारी तुमची तीक्ष्ण नखे यांचेदेखील भय मला वाटत नाही.” (भा. 7.9.19) “माता-पिता आपल्या बालकांचे रक्षण करू शकत नाहीत, वैद्य आणि त्यांचे औषध दु:ख भोगणाऱ्या ऊग्णास क्लेशमुक्त करू शकत नाहीत. हे विभो! हे नृसिंहदेव! तुम्ही उपेक्षा केलेले आणि तुम्ही काळजी न घेतलेले बद्ध जीव, देहात्मबुद्धीमुळे आपल्या प्रगतीसाठी वा कल्याणासाठी काहीच करू शकत नाहीत.
स्वकल्याणार्थ ते जे कांही उपाय स्वीकारतात, ते सर्व उपाय जरी तात्पुरत्या काळासाठी लाभदायक असले तरी खचितच क्षणभंगुर असतात.” ( भा. 7.9.44) “हे नृसिंहदेव! समाजामध्ये अनेक संतपुऊष आहेत, पण त्यांना केवळ स्वत:च्या उध्दारातच स्वारस्य असल्याचे मी पाहिलेले आहे. मोठमोठ्या नगरांचा विचार न करताच ते ध्यानधारणेसाठी हिमालयात किंवा एका वनात जातात आणि तेथे मौनव्रत धारण करतात. त्यांना केवळ स्वत:च्याच उन्नत्तीतच रस असतो. तथापि माझ्याशिवाय सांगावयाचे तर, मला इतर सर्व दोन जणांना सोडून एकट्यानेच मुक्त होण्याची मुळीच इच्छा नाही. कृष्णभावनेविना आणि तुमच्या चरणकमळांचा आश्र्रय घेतल्याविना मनुष्य सुखी होऊ शकत नाही, हे मी जाणतो. म्हणून मी सर्व दीन व्यक्तींना पुन्हा तुमच्या चरणकमळांच्या आश्र्रयास आणू शकतो.”
हा शुद्ध वैष्णवांचा भाव आहे. वैष्णव भक्ताला जरी भौतिक जगातच राहावे लागले तरी काहीच समस्या नसते, कारण तो श्रीकृष्णाचा भक्त असतो. भक्तासाठी स्वर्गवास किंवा नरकवास सारखाच असतो, कारण तो वैकुंठामध्ये श्रीकृष्णाबरोबर वास्तव्य करतो. हरिभक्ताला समाजातील अज्ञानी जीव जन्म-मृत्यूच्या दु:खामध्ये होरपळून जात आहेत हे पाहवत नाही म्हणून समाजामध्ये राहून ते गीता-भागवतचा प्रचार आणि प्रसार करतात. त्यांना हिमालयात अथवा निर्जन जागी जाण्यास स्वारस्य नाही. त्यामुळे असा कृष्णभक्त सर्व प्रकारच्या भोंदू आणि फसव्या अध्यात्मवाद्यांच्या, दार्शनिक इत्यादिकांचा संग टाळतो.
अशा प्रकारे भक्त प्रल्हादांनी नम्रतेने प्रार्थना केल्यानंतर श्रीनृसिंहदेव शांत झाले आणि त्याला आशीर्वाद देत म्हणाले मी तुझ्यावर संतुष्ट झालेलो आहे आणि म्हणून तुला हवा असलेला कोणताही वर तू आता माझ्याकडून मागून घे. भगवान श्री नृसिंहदेवनी अनेकानेक वर प्रल्हादाला देऊ केले पण अशा वरदानांना हरिभक्तीमध्ये अडथळे म्हणून नाकारले आणि केवळ शुद्ध भक्तीची याचना केली. प्रल्हाद म्हणाले “भगवंतांची भक्तिमय सेवा करणाऱ्या मनुष्याने जर वैयक्तिक इंद्रियतृप्तीकरता वरयाचना केली, तर त्याला देवाण-घेवाण करणारा एक व्यापारीच म्हणता येईल. “भक्त प्रल्हादने आपल्यासाठी कांही मागितले नाही पण आतापर्यंत आत्यंतिक छळ करणाऱ्या आपल्या पित्यासाठी वर मागितला.
प्रल्हाद महाराज म्हणाले (भा. 7.10. 15,16,17)-हे भगवान! तुम्ही पतितपावन असल्यामुळे मला एकच वर द्यावा. मी हे जाणतो की, माझ्या पित्याच्या मृत्यूसमयी तुम्ही त्यांच्यावर दृष्टीक्षेप टाकलेला असल्यामुळे तो शुद्ध झालेला आहेच, पण तुमच्या अनुपम सामर्थ्य आणि परम सत्ता याविषयी तो अज्ञानी असल्यामुळे त्याने अनावश्यकच तुमच्यावर क्रोध प्रकट केला आणि तुम्हीच हिरण्याक्ष याला मारले आहे, असा चुकीचा विचार केला. त्यामुळे त्याने अखिल जीवांचे आध्यात्मिक गुऊ असणाऱ्या तुमची घोर निंदा केली आणि तुमचा भक्त असणाऱ्या मला मारण्यासाठी उग्र पापकर्मे केली. कृपया त्याला अशा सर्व पापांपासून तुम्ही मुक्त करावे, अशी माझी तुम्हास विनंती आहे.” याप्रमाणे पित्याने जरी प्रल्हादाचा अनन्वित छळ केला होता, तरी ते एक वैष्णव पुत्र असल्यामुळे त्यांना आपल्या पित्याच्या स्नेहाचे विस्मरण झाले नाही. इथे भक्त प्रल्हादाने वैष्णव क्षमाशील कसा असतो याचे उदाहरण सर्व जगासमोर ठेवले.
भगवान नृसिंहदेव म्हणाले (भा. 7.10.18) -“हे परम पवित्र प्रल्हादा! हे निष्पापा! हे साधुपुऊषा! तुझा पिता आपल्या एकवीस पूर्वजांसह पवित्र झालेला आहे. तुझा जन्मच या कुळामध्ये झालेला असल्याने हे संपूर्ण कुळ पवित्र झालेले आहे”. (भा. 7.10.11) “जेथे जेथे शांत, समदृष्टी, सदाचारी आणि सद्गुणसंपन्न भक्त निवास करतात, ते ते स्थळ आणि तेथील कुळे जरी निंद्य असली तरी पावन होतात”. (भा. 7.10.20) “हे दैत्यराज प्रल्हाद! माझा भक्त माझ्या भक्तिमय सेवेवर आसक्त असतो. आणि म्हणून तो श्रेष्ठ आणि कनिष्ठ जीव असा जीवांमध्ये भेदभाव करीत नाही. तो कोणाचाही कोणत्याही प्रकारे मत्सर करीत नाही.” (भा. 7.10.21) “या लोकी जे पुऊष तुझे उदाहरण अनुसरतील, ते स्वाभाविकपणे माझे शुद्ध भक्त होतील. तू माझ्या भक्तांमध्ये श्रेष्ठ आहेस आणि इतर सर्वानी तुझ्या पावलांवर पाऊल ठेवून चालले पाहिजे”.
प्रल्हाद यांची गणना महाजन म्हणजे प्रमुख भक्तांमध्ये होते. त्यामुळे ज्यांना प्रामाणिकपणे हरिभक्ती करावयाची आहे त्यांनी हा आदर्श आपल्यासमोर ठेवावा.
-वृंदावनदास
Home महत्वाची बातमी भक्त प्रल्हाद
भक्त प्रल्हाद
हिरण्यकश्यपूचा वध श्रीनृसिंहदेवानी केल्यानंतर भगवंत अत्यंत क्रोध प्रकट करीत होते. हिरण्यकश्यपूच्या विनाशानंतरही त्यांचा क्रोध मावळला नाही. त्यावेळी ब्रम्हदेवासहित इतर देवतासुद्धा श्रीनृसिंहदेव यांचा क्रोध शांत करू शकले नाहीत. भगवंतांची नित्य सहचारिणी असणारी लक्ष्मीदेखील व्रुद्ध श्री नृसिंहदेवांच्या समोर जाऊ शकली नाही. त्यावेळी ब्रह्मदेवांनी प्रल्हाद महाराजांना भगवंतांसमोर जाऊन क्रोधशमन करण्यास सांगितले. आपल्या भगवंतांचे आपल्यावर प्रेम आहे, हे निश्चितपणे […]