आचारसंहिता असल्यामुळे भंगार वाहने पडून

कॅन्टोन्मेंट परिसराचे विद्रुपीकरण, कारवाई होणार का? : वाहने हटविण्यासाठी दहा दिवसांची होती मुदत बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डच्या खुल्या जागांवर भंगारातील वाहने लावण्यात आली आहेत. ही वाहने काढण्याचे आदेश कॅन्टोन्मेंट बोर्डच्या सीईओंनी दिले होते. 10 ते 15 दिवसात वाहने न हटविल्यास कॅन्टोन्मेंट बोर्डकडून कारवाई करण्याचा इशाराही दिला होता. परंतु, यातील काही वाहने इतरत्र हलविण्यात आली असून, […]

आचारसंहिता असल्यामुळे भंगार वाहने पडून

कॅन्टोन्मेंट परिसराचे विद्रुपीकरण, कारवाई होणार का? : वाहने हटविण्यासाठी दहा दिवसांची होती मुदत
बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डच्या खुल्या जागांवर भंगारातील वाहने लावण्यात आली आहेत. ही वाहने काढण्याचे आदेश कॅन्टोन्मेंट बोर्डच्या सीईओंनी दिले होते. 10 ते 15 दिवसात वाहने न हटविल्यास कॅन्टोन्मेंट बोर्डकडून कारवाई करण्याचा इशाराही दिला होता. परंतु, यातील काही वाहने इतरत्र हलविण्यात आली असून, बरीच वाहने कॅन्टोन्मेंटच्या विविध खुल्या जागांवर तशीच उभी आहेत. त्यामुळे कॅन्टोन्मेंटचे सीईओ यावर कोणती कारवाई करतात, हे पहावे लागणार आहे. फिश मार्केट, बुचर स्ट्रीट, तेलगू कॉलनी रोड यासह इतर भागांमध्ये जुनी वाहने खुल्या जागांवर लावण्यात आली आहेत. काही भंगार विक्रेत्यांनी वाहने खरेदी करून ती खुल्या जागेत लावली आहेत. यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसराचे विद्रुपीकरण होत आहेच. त्यासोबत कॅन्टोन्मेंटचा महसूलही बुडत आहे. ही बाब कॅन्टोन्मेंटचे सीईओ राजीव कुमार यांच्या लक्षात येताच त्यांनी मार्च महिन्यात भंगार वाहने हटविण्यासाठी दहा दिवसांची मुदत दिली होती. काही भंगार विक्रेत्यांनी वाहने हटविलीही. परंतु, याच दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे कारवाई थंडावली. त्यामुळे बोर्डच्या अनेक खुल्या जागांवर भंगारातील वाहने पडून आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर कॅन्टोन्मेंट सीईओ या वाहनांवर कोणती कारवाई करणार? हे पहावे लागणार आहे.
खुल्या जागांवर अतिक्रमण
कॅन्टोन्मेंट हद्दीत वाहने पार्किंग करण्यासाठी दर निश्चित केला आहे. एका दिवसासाठी 100 रुपये तर महिनाभरासाठी 1500 रुपये पार्किंग दर निश्चित केला आहे. त्यामुळे एकीकडे पार्किंगसाठी शुल्क वसुली केली जात असताना दुसरीकडे मात्र खुल्या जागांवर जुनी वाहने लावण्यासाठी अतिक्रमण केले आहे.