मराठी अस्मितेसाठी अन् जनतेसाठी रिंगणात…

मराठी अस्मितेसाठी अन् जनतेसाठी रिंगणात…

म. ए. समितीचे उमेदवार महादेव पाटील यांची प्रतिक्रिया : अन्यायाविरोधात आवाज उठविणार
बेळगाव : सीमाभागामध्ये मराठी भाषिक मोठ्या संख्येने राहतात. मराठी भाषेवर राष्ट्रीय पक्षांनी नेहमीच अन्याय केला आहे. त्या अन्यायामुळे मराठी भाषा अडचणीत येत आहे. यामुळे मराठी भाषेच्या अस्मितेसाठी आणि स्थानिक समस्या सोडविण्यासाठी मी रिंगणात उतरलो असून लोकसभा निवडणूक लढवत असल्याचे मत म. ए. समितीचे उमेदवार महादेव पाटील यांनी ‘भारत लाईव्ह न्यूज मीडिया’शी संवाद साधताना व्यक्त केले.
►सामान्य कार्यकर्ता ते लोकसभा उमेदवार याबद्दल मत काय?
मी म. ए. समितीच्या प्रत्येक लढ्यामध्ये आतापर्यंत सहभागी झालो आहे. यापुढेही सहभागी राहणार आहे. मी सामान्य कार्यकर्ता असून आजपर्यंत समितीसाठी झटलो आहे. त्याची दखल म. ए. समितीने घेतली आणि लोकसभेची उमेदवारी दिली. निश्चितच यामध्ये मी विजयी होईन आणि येथील मराठी जनतेचे प्रश्न निकालात काढण्यासाठी प्रयत्न करेन.
►राष्ट्रीय पक्षाबद्दल तुम्हाला काय वाटते?
सीमाभागामध्ये मोठ्या प्रमाणात मराठी जनता आहे. निवडणुकीच्या वेळेलाच या मराठी जनतेची राष्ट्रीय पक्षांना आठवण येते. इतरवेळी मात्र त्यांच्यावर अन्याय झाल्यानंतर राष्ट्रीय पक्षाचा एकही प्रतिनिधी त्यांच्या पाठीशी थांबत नाही. उलट अन्याय झाला तर त्यांना आनंद वाटतो. त्यामुळे राष्ट्रीय पक्षांवर मराठी भाषिकांचा विश्वासच नाही. मराठी भाषिकांचा केवळ मतांसाठी वापर केला जातो. त्यानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. हे प्रत्येक मराठी भाषिकाला माहिती आहे. त्यामुळे माझ्या पाठीशी मराठी भाषिक मतदार ठामपणे आहेत.
►जनतेचा प्रतिसाद मिळतो का?
मराठी भाषा आणि संस्कृती टिकविण्यासाठी मराठी जनता नेहमीच प्रयत्नशील असते. मी मराठी भाषिक आहे, याचबरोबर म. ए. समितीशी एकनिष्ठ आहे. त्यामुळे निश्चितच मराठी जनतेचा, तसेच समाजातील इतर घटकांचाही मला पाठिंबा मिळत आहे. आतापर्यंत ज्या भागामध्ये आम्ही प्रचार केला, त्या भागात मराठी भाषिक स्वयंस्फूर्तीने प्रचारात सहभागी झाले. यावरून मराठी भाषिक नेहमीच पाठीशी आहेत.
►जनतेच्या समस्या कशा सोडविणार?
येथील मराठी जनतेवर अन्याय होत आहे. त्यामुळे त्या अन्यायाविरोधात लोकसभेमध्ये आवाज उठविण्याची गरज निर्माण झाली आहे. मराठी भाषेचा असो किंवा शेतकऱ्यांचा प्रश्न असो त्याबाबत राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांनी चक्कार शब्दही आतापर्यंत काढला नाही. त्यामुळे आता मराठी भाषिकांनी हा लढा लढण्याचा निर्धार केला आहे. लोकसभेत मराठी भाषिकांचा आवाज उमटणार आहे. शेतकऱ्यांचे व स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी आपले प्रयत्न राहतील.