परिवहनच्या 166 बसेस निवडणूक ड्युटीवर

परिवहनच्या 166 बसेस निवडणूक ड्युटीवर

बसेस यंत्रसामग्री-कर्मचाऱ्यांच्या सेवेत : सार्वजनिक बससेवेवर परिणाम
बेळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी परिवहनच्या 166 बसेस रस्त्यावर धावत आहेत. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. त्याचबरोबर निवडणूक काळातील साधनसामग्री आणि कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी परिवहनच्या बसेस रस्त्यावर उतरल्या आहेत. मात्र इतर सार्वजनिक बससेवेवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. काही मार्गांवरील बसेस तात्पुरत्या रद्द करून निवडणुकीसाठी वापरल्या जाणार आहेत. त्यामुळे काही भागात प्रवाशांची गैरसोय होणार आहे. मंगळवारी राज्यात दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यासाठी परिवहनच्या बसेस बुक करण्यात आल्या आहेत. मतदान केंद्रांपर्यंत यंत्रसामग्री, कर्मचारी आणि पोलिसांची वेळेत ने-आण करण्यासाठी बसेसचा वापर होणार आहे. निवडणूक आयोगाने परिवहनकडे 400 बसेसची मागणी केली होती. मात्र परिवहनच्या ताफ्यात बसेसची कमतरता असल्याने 200 बसेस देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार सोमवारी 166 बसेस निवडणुकीच्या कामासाठी धावल्या. बेळगाव आगारातून गोकाक, बैलहोंगल, कित्तूर, खानापूर, रामदुर्ग, सौंदत्ती आदी मार्गांवर या बसेस धावल्या आहेत. शक्ती योजनेमुळे परिवहनच्या बसवर प्रवाशांचा ताण वाढला आहे. अशा परिस्थितीत निवडणुकीसाठी 166 बस धावत असल्याने सार्वजनिक बससेवेवर परिणाम होणार आहे. लांबपल्ल्याच्या आणि काही स्थानिक बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. या बसेस निवडणुकीची यंत्रसामग्री, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट, कर्मचारी आणि पोलिसांसाठी वापरल्या जाणार आहेत.
प्रवाशांची आज गैरसोय…
निवडणुकीसाठी परिवहनने 166 बस दिल्याने इतर सार्वजनिक बससेवेवर परिणाम होणार आहे. त्यामुळे मंगळवारी विविध भागात बसफेऱ्या कमी राहणार आहेत. परिणामी प्रवाशांची गैरसोय होणार आहे.