अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी सज्ज रहा

अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी सज्ज रहा

जि. पं. कार्यकारी अधिकारी राहुल शिंदेंचा खानापूर तालुक्याचा पाहणी दौरा
खानापूर : यावर्षीच्या मान्सूनमध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पावसाळ्यात अतिवृष्टीचा धोका निर्माण झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी खबरदरीच्या उपाययोजना बाबत जिल्हा पंचायतीचे कार्यनिर्वाहक अधिकारी राहूल शिंदे यांनी खानापूर तालुक्याचा पाहणी दौरा केला असून, यासंदर्भात त्यांनी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुराचा सामना करण्यासंदर्भात उपाययोजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात सूचना केल्या. यावेळी तहसीलदार प्रकाश गायकवाड, ता. पं. कार्यकारी अधिकारी भागश्री जहागीरदार, महसूल अधिकारी आणि विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. तालुक्यात मलप्रभा, पांढरी, हलात्री यासह इतर नद्या वाहतात. या नद्याना पावसात पुराचा धोका असतो. यावर्षी मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत असल्याने महापुराचा धोका निर्माण झाल्यास नदी काठावरील गावांचा महापुरापासून बचाव करण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजनासंदर्भात जिल्हा पंचायतीचे अधिकारी राहूल शिंदे यांनी बैठक घेऊन मार्गदर्शन केले. तसेच 2020 साली लोंढा येथील पांढरी नदीच्या पुरामुळे नुकसान झालेल्या भागाचा पाहणी दौरा करून संबंधितांना स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना
2020 साली झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्यांची घरे पडली आहेत. त्यांना सरकारच्या योजनेतून घर निर्मितीसाठी अनुदान मंजूर करून देण्यात यावे, तसेच आवश्यक ठिकाणी निवारा केंद्रे उभारण्यासाठी उपायोजना हाती घेण्यात यावी, अन्नधान्याच्या पुरवठ्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात यावी, जलतरण पट्टूंची यादी तयार करण्यात यावी, औषधोपचारासाठी आवश्यक उपलब्धता करून घेण्यात यावी तसेच आवश्यक ठिकाणी तातडीने स्थलातंरासाठी आवश्यक उपाययोजनांची सज्ज्ता उपलब्ध करण्यात यावी, अशी सूचना यावेळी राहूल शिंदे यांनी केली.