आघाडीत कोणीही मोठा भाऊ नाही : पटोले
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : महायुतीत महाभारत सुरू असून, त्यावर मला बोलायचे नाही. आम्ही मात्र विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रच लढणार आहोत. प्रत्येक नेत्याला कार्यकर्त्यासाठी बोलावे लागते. पवारसाहेब एक पाऊल मागे आले, आम्ही तीन पावले मागे आलो. आम्ही सगळे एकत्र बसलो की जागा वाटप होईल. आघाडीतील मोठा भाऊ वगैरे काही नाही. जागा कमी-जास्त मिळतील; पण सरकार बदलायचे, हा आमचा निर्धार आहे. भाजपविरोधात आहेत, त्यांना सोबत घ्यायची आमची भूमिका आहे, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी पुण्यात व्यक्त केले.
जातींमध्ये तेढ सरकारच्या धोरणांमुळे
काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत पटोले बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील जातीय संघर्ष राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे निर्माण झाला. शाळेतील मुलेही आता ओबीसी-मराठा करतात. ते पाहून या सरकारचा निषेध करावा वाटतो. भाजपने 2014 पासून राज्यात हे सगळे सुरू केले. जातनिहाय जनगणना करा, अशी काँग्रेसची भूमिका आहे. मात्र, केंद्र व राज्य सरकारला काही करायचेच नाही. नाशिकमध्ये शुक्रवारी काही पत्रके वाटण्यात आली. हे सगळे संताप आणणारे आहे. शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आम्ही हे चालू देणार नाही, असे पटोले म्हणाले.
आरक्षणावर आम्ही तोडगा काढला असता
राज्यात 350 ओबीसी जाती आहेत. पण, सरकार काही ठरावीक लोकांनाच भेटत आहे. भाजपचे अध्यक्ष सांगतात, 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही. असे असताना देवेंद्र फडणवीस म्हणतात, आम्ही आरक्षण देऊ. राहुल गांधी पंतप्रधान झाले असते तर आम्ही सर्वप्रथम जातनिहाय जनगणना सुरू केली असती तर त्यातून आतापर्यंत हा प्रश्न सुटायला नक्कीच मदत झाली असती, असा विश्वास पटोले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
पूजा चव्हान प्रकरण दाबलं?
राज्य मंत्रिमंडळातील मंत्री संजय राठोड भाजपमध्ये गेले आणि स्वच्छ झाले, आपण शुद्ध आहे, असे दाखविण्याचा प्रयत्न केला. पूजा चव्हाण प्रकरणातील लॅब रिपोर्ट आलेच नाहीत. सरकार ते लपवत आहे, असा आरोप पटोले यांनी केला. नागरिक आणि बागायतदार यांची पाणीपट्टी वाढवली आहे. हे सरकार मोठ्या उद्योजकांसाठी सगळे माफ करीत आहे. राज्य सरकार अदानीसाठी जागा उपलब्ध करून देत आहे. इकडे सामान्य माणसाला झोपडी बांधायला जागा नाही. 10 टक्के पाणीपट्टीवाढीचा निषेध करीत आहे, ही पाणीपट्टी मागे घ्यावी, अशी मागणी करू, असेही पटोले म्हणाले.
हेही वाचा
नाशिक : सखोल चौकशी होईपर्यंत नाफेडची कांदा खरेदी बंद करा; कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी
पिंपळनेर : इंधन तस्करी अड्डा उदध्वस्त, ५१ लाखांचे डिझेल जप्त
हॅलो, मै दिल्ली सीबीआय से बोल रहा…; नागपुरात अनेकांना गंडा, गुन्हा दाखल