नाशिक महापालिकेकडून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण कायद्याचे उल्लंघन
नाशिक: Bharat Live News Media वृत्तसेवा – ई-कचऱ्याची विल्हेवाट महापालिकेवर बंधनकारक असताना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण कायद्याचे सर्रास उल्लंघन महापालिकेकडून केले जात असल्याचे समोर आले आहे. घनकचरा व पर्यावरण विभागाच्या टोलवाटोलवीत ई-कचऱ्याच्या विल्हेवाटीकडे दुर्लक्ष झाल्याने महापालिकेवरच आता कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबई, पुण्यापाठोपाठ नाशिक शहरातही ई-कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनला आहे. घनकचऱ्यासोबतच नादुरुस्त फ्रीज, टीव्ही, संगणकासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा कचरा शहरात वाढत आहे. घनकचरा उचलण्याची सोय सर्वच शहरांमध्ये आहे, परंतु ई-वेस्टबाबत फारशी जागरूकता नाही. केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने मोठ्या शहरांमध्ये घनकचऱ्याबरोबरच इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचीही विल्हेवाट लावण्याची सूचना केली आहे. शहर विकास आराखड्यामध्ये स्वतंत्र जागा राखीव ठेवण्याच्या सूचना देखील यापूर्वी दिल्या आहेत. सद्यस्थितीत कमी प्रमाणात ई-वेस्ट बाहेर पडत असले भविष्यकालीन नियोजन आतापासूनच करण्याचा भाग म्हणून ई-वेस्ट विल्हेवाट प्रकल्प उभारणीसाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले होते. परंतु, ई-वेस्टचे प्रमाण कमी असल्याने स्वतंत्र प्रकल्प अस्तित्वात येऊ शकला नाही. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडील नोंदणीकृत संस्थांना ई-वेस्ट संकलनाची परवानगी देण्याचा निर्णय घेतला गेला. यासाठी देकार मागविण्याचीही तयारी केली गेली. काही संस्थांनी महापालिकेकडे यासाठी संपर्कही केला. परंतु, या प्रकल्पाची जबाबदारी घेण्यावरून पर्यावरण आणि घनकचरा व्यवस्थापन विभागात टोलवाटोलवी झाली. त्यामुळे हा प्रकल्प अस्तित्वातच येऊ शकलेला नाही.
असा आहे ई-कचरा..
शहरात ई-कचऱ्याचे प्रमाण वाढत आहे. नादुरूस्त संगणक, टीव्ही, फ्रीज, हॉस्पिटल तसेच कारखान्यांमधील इलेक्ट्रॉनिक यंत्रसामग्री, बंद पडलेले मोबाइल, सीडी, डिव्हीडी, फिल्म, बंद पडलेली घड्याळे, रिमोट कन्ट्रोल, नादुरुस्त बल्ब, ट्यूबलाइट या टाकाऊ ईलेक्ट्रॉनिक्स वस्तुंना ई-वेस्ट संबोधले जाते.
..तर होणार महापालिकेवर कारवाई!
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार शहरातील ई-कचऱ्याची विल्हेवाट लावणे महापालिकेवर बंधनकारक आहे. मात्र नाशिक महापालिकेकडून डोळेझाक सुरू असल्याने ई-कचऱ्याचे वाढते प्रदूषण घातक ठरण्याची शक्यता लक्षात घेत महापालिकेवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:
नाशिक : सखोल चौकशी होईपर्यंत नाफेडची कांदा खरेदी बंद करा; कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी
‘माझे कपडे उतरवले, आणि मग…’; सेक्स स्कँडल प्रकरणी सूरज रेवन्नाला अटक