मुलांवर येणारा ताण अन् पालकांची भूमिका

मुलांवर येणारा ताण अन् पालकांची भूमिका

नवं शैक्षणिक वर्ष नुकतंच सुरू झालंय. त्या पार्श्वभूमीवर अभ्यास, परीक्षा, स्पर्धा, निकाल यामुळं निर्माण होत असलेला ताण आपल्या मुला-मुलींसाठी धोकादायक ठरतोय याची जाणीव पालकांनी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच स्वत:च्या मनाला करून दिलेली बरी! पालकांनी हा धोका सुज्ञपणे समजून घेतला तर ते आपल्या पाल्यांशी अधिक समंजसपणे वागू शकतील. अभ्यास, परीक्षा, निकाल, गुण आणि स्पर्धा हे निव्वळ शब्दही हल्ली तणाव आणि चिंता निर्माण करणारे ठरत आहेत. त्यातून काही विद्यार्थ्यांमध्ये नकारात्मकता वाढू शकते, त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. अति काळजी आणि चिंता हानिकारक ठरू शकते. त्यामुळे झोप कमी होणं, वजन कमी होणं अशाही गोष्टी दिसून येतात. निराशेच्या गर्तेत गेल्यामुळं अचानक रागाचा उद्रेक होणं, अस्वस्थ वाटणं, आत्महत्येचे विचार मनात येणं, आत्मविश्वास कमी होणं अशा समस्या उद्भवू शकतात.
आपल्या मुलांच्या अनुभवास येणारा ताण आणि त्याचे धोकादायक परिणाम कमी करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी पालकांनी स्वत: समंजस, शांत आणि सकारात्मक राहणं आवश्यक आहे. त्यांनी मुलांशी मोकळेपणानं संवाद साधायला हवा. स्वतःची इतरांशी तुलना केल्यानं केवळ चिंता आणि स्वतःविषयीची शंका निर्माण होते, हे मुलांना पालकांनी समजावून सांगायला हवं. परीक्षेचा निकाल, त्यातले गुण यावर भविष्यातलं यश व समाधान सर्वार्थानं अवलंबून नसतं, याची जाणीव मुलांना करून द्यायला हवी. पालकांनी भविष्याबद्दल अनावश्यक अनुमान काढण्याचं टाळणं आणि नकारात्मक विचारांना थारा न देणंही महत्त्वाचं!
आजच्या स्पर्धात्मक, व्यक्तिकेंद्री आणि वेगवान जगात मदत घेण्यात अजिबात संकोच बाळगायचा नाही, हे पालकांनी स्वत:ला आणि मुलांना समजावून सांगणं ही आता काळाची गरज ठरते आहे. मदत न मागता केवळ तणावाचं ओझं पेलत राहणं आणि चिंता करत राहणं हे अनेक अर्थांनी हानिकारक ठरू शकतं. म्हणूनच मुलांच्या मानसिक आरोग्यासंदर्भातल्या प्रश्नांची उकल करण्यासाठी गरज पडल्यास वेळीच व्यावसायिक तज्ज्ञांची मदत घेणं हेसुद्धा आवश्यक असतं, हे लक्षात घ्यायला
हवं. अर्थात, आपल्या मुला-मुलींनी सक्रिय राहणं आणि दैनंदिन जीवनचर्या संतुलित व नियमित ठेवणं हे तणाव लक्षणीयरीत्या कमी करण्याचं महत्त्वाचं माध्यम आहे. त्यामुळं परीक्षा कुठलीही असो, अभ्यास कोणत्याही वर्षाचा असो, आपलं मूल संतुलित आहार घेतंय ना, व्यायाम तसेच छंद यासाठी वेळ राखून ठेवतंय ना, अभ्यास व मनोरंजन यात संतुलन राखतंय ना, यावरही अप्रत्यक्षपणे लक्ष ठेवायला आपण विसरता कामा नये.
हेही वाचा

ताणतणावाची ‘ही’ ७ लक्षणे माहीत आहेत का?
ताणतणावामुळेही वाढतो मधुमेहाचा धोका!
मानसिक ताण कमी करायचाय? मग या गोष्टी फॉलो करा