…तेव्हा ७० खासदार निघून गेले; शरद पवारांनी सांगितल्या जुन्या आठवणी

…तेव्हा ७० खासदार निघून गेले; शरद पवारांनी सांगितल्या जुन्या आठवणी

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : काँग्रेस पक्षात असताना लोकसभेत विरोधी पक्षनेता म्हणून महिला आरक्षणाच्या विधेयकावर बोलण्यास उभा राहिलो. माझे बोलणे सुरू होताच काही मिनिटात एक चिठ्ठी आली. त्यात लिहिले होते एकदा मागे पाहा. मी मागे पाहिले तर माझ्याच पक्षातले ७० खासदार सभागृह सोडून निघून गेले होते. अशा अनेक जुन्या आठवणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी सांगितल्या. Sharad Pawar
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने महिला धोरणाची तीन दशके यानिमित्ताने यशस्विनी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी शरद पवार होते. थरमॅक्सच्या संस्थापक माजी खासदार अनु आगा, खा. सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. मीनाक्षी पाटील (मुंबई), रुख्मिणी नागापुरे (बीड), कलावती सवंडकर (हिंगोली), संध्या नरे-पवार, श्रद्धा नमलवार (नाशिक) या विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
आईने संमती दिली नसती तर…
आमच्या घरात उच्च शिक्षणाची परंपरा नव्हती. मात्र माझ्या आईने पाच मुले आणि सात मुलींना जिद्दीने शिकवले. त्यापैकी आम्ही पाच भावंडे पुण्यात शिकायला होतो. काटेवाडी गावातून आम्हाला स्वारगेटवर जेवणाचा डबा रोज आई पाठवत असे. कधी एसटी रद्द झाली की जेवणही मिळत नसे. मी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेने काँग्रेस पक्षाचे काम सुरू केले. माझ्या आईला ते काही रुचले नाही. पुढे मला आमदारकीचे तिकीट मिळाले तेव्हा मी तिला विचारले, आई मी निवडणुकीला उभा राहू का… तेव्हा ती म्हणाली, तुझे आणि माझे मत जुळत नाही तरी मी तुझ्या मार्गात आडकाठी घालणार नाही. आईने परवानगी दिली अन् मी वयाच्या २६ व्या वर्षी आमदार म्हणून निवडून आलो, असे पवार यांनी सांगितले. Sharad Pawar
यावेळी खा. सुळे यांनी सांगितले की, आजही महिला आणि पुरुष असा भेद प्रत्येक कामात केला जातो. इथे माजी खासदार अनु आगा आहेत. त्यांनी थरमॅक्स ही कंपनी उभी केली. त्यांच्याकडे आम्ही महिला म्हणून नव्हे तर व्यक्ती म्हणून पाहिले आहे. शरद पवारही सतत काम करीत आहेत. या दोघांना कधीच रिटायरमेंट नाही.
जावयाने सासूचे पाय धुवावेत
खा. सुळे यांनी याप्रसंगी एक किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या, आमच्याच पक्षातील एका खासदारांनी धोंड्यावर रील केली. सासू त्यांचे पाय धूत असल्याचा सोहळा होता, तोवर मला धोंडा हा प्रकार काय हे माहीत नव्हते. खरे तर जावयाने स्वतःचे पाय धुऊन घेण्याऐवजी सासूसह आपल्या आईचे पाय धोंड्याच्या महिन्यात धुवावेत. या जुन्या प्रथा आता बदलल्या पाहिजेत.