भारतीय तरुणांची शिक्षणासाठी परदेशी धाव…, गौरव की पराभव?
राजेंद्र जोशी
कोल्हापूर : भारतात शिक्षणाच्या प्रवेश पद्धतीमध्ये सावळा गोंधळ आहे. जागतिक शिक्षणाच्या तुलनेत शिक्षणाच्या दर्जातही आम्ही कमी पडतो आहोत. शिक्षण शुल्काचा लगाम सैल सोडण्यास शासनानेच पूरक धोरणे आखल्यामुळे सामान्य वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर राहावे लागते आहे. या सर्वांचा परिणाम देशातील विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी परदेशामध्ये जाण्याचा कल दिवसेंदिवस वाढतो आहे. त्यातही युरोपातील काही देशांनी मोफत उच्च शिक्षणाचे दरवाजे उघडल्यामुळे भारतातील बुद्धिवान तरुणांनी परदेशाचा रस्ता धरला आहे. असे बुद्धिवान तरुण परदेशात शिक्षण घेतात, रोजगाराच्या निमित्ताने तेथेच स्थायिक होतात आणि कालांतराने तेथील नागरिकत्वही मिळवितात. मग देशातून बाहेर जाणार्या बुद्धिवंतांची गळती (ब्रेनड्रेन) याविषयी व्यवस्थेला बोलण्याचा अधिकार कसा उरतो?, याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. अन्यथा, देशामध्ये उद्योगाचे हब तयार होतील, भारतीय विद्यार्थी परदेशी कंपन्यांमार्फत देशात रोजगारासाठी येतील आणि भारतीय शिक्षण व्यवस्थेची अवस्था चिंचेच्या झाडाशिवाय वेगळी असणार नाही.
प्राचीन भारतामध्ये शिक्षणाचा प्रवास उलटा होता. भारतीय ज्ञानसंपदा जगामध्ये आदर्श मानली जात होती. जगातील बुद्धिवान तरुण नालंदा, तक्षशिलासारख्या विद्यापीठांमध्ये अध्ययनासाठी येत होते. ऋषिमुनींपासून केलेल्या संशोधनातून नालंदा ग्रंथालयात 90 लाख ग्रंथांची सामग्री तयार झाली.
देश स्वतंत्र झाला, तेव्हा परदेशात शिक्षण घेतलेल्या आणि संशोधनात गर्क असलेल्या तरुणांना पंडित नेहरूंनी हाक दिली होती. या हाकेला प्रतिसाद देऊन जे मायदेशी परतले, त्यामध्ये डॉ. होमी भाभा, डॉ. विक्रम साराभाई यांच्यासारखी बलाढ्य माणसे होती. राजीव गांधी पंतप्रधान असतानाही त्यांनी दिलेल्या हाकेला प्रतिसाद देऊन काही बुद्धिवान देशात परतले. पण, त्या काळाची गरज म्हणून त्याकडे जरी पाहिले, तरी आज बुद्धिवानांचा लोंढा परदेशाकडे का निघाला आहे, याची कारणे कोण शोधणार? भारतात आज काळ बदलला आहे. जर्मनी, इटली, जपान, फ्रान्स या युरोपीय देशांनी मोफत शिक्षणासाठी पायघड्या अंथरल्या आहेत. मोफत शिक्षणाबरोबर अर्धवेळ रोजगाराची संधीही उपलब्ध करून दिल्यामुळे स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये राबविण्यात आलेल्या ‘कमवा व शिका’ या योजनेला युरोपात गोंडस फळ आले आहे. मग संकल्पना मांडणार्या भारतातील शिक्षण व्यवस्था काय करते आहे?
फक्त कल्पना करा, वा डोळसपणाने समाजाकडे पाहा. पूर्वी गावातील एखादा विद्यार्थी विदेशी शिक्षणाला निघाला, की त्याची मिरवणूक काढली जात होती. आज गल्लोगल्लीचे तरुण-तरुणी विदेशामध्ये स्थायिक होऊ लागले आहेत. त्यांच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांना विदेशवारी होते आहे. परदेशी असलेल्या मुलांच्या माता-पित्यांची काळजी घेण्यासाठी सेवा संस्था निघाल्या आहेत. हा गौरव की पराभव?, याचे उत्तर शोधायचे असेल, तर भारतीय शिक्षण पद्धतीत घुसलेल्या भ्रष्टाचाराच्या घुशी विनाविलंब मारल्या पाहिजेत; अन्यथा एक गौरवशाली शैक्षणिक परंपरा असलेल्या देशातील शिक्षणाचा डोलारा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळू शकतो.