पोलीस भरती परीक्षा आयोजक गुजरातची कंपनी काळ्या यादीत

पोलीस भरती परीक्षा आयोजक गुजरातची कंपनी काळ्या यादीत

लखनौ; वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशच्या पोलीस भरती परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणातील गुजरातच्या परीक्षा आयोजक कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. एसटीएफने दोन आरोपी राजीव नयन आणि रवी अत्री यांच्यासह एकूण १८ आरोपींविरुद्ध कोर्टात आरोपपत्र केले आहे. एज्युटेस्टचे व्यवस्थापकीय संचालक विनीत आर्या हे अटकेच्या भीतीने अमेरिकेत पळून गेले आहेत.
पेपरफुटी प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून, पुरवणी आरोपपत्रही लवकरच दाखल केले जाईल, असे एसटीएफ मेरठ शाखेकडून सांगण्यात आले. उत्तर प्रदेश पोलीस भरतीची जबाबदारी अहमदाबादच्या एज्युटेस्ट या कंपनीला देण्यात आली होती. या कंपनीला काळ्या यादीत टाकले आहे. गोदामातून फुटली प्रश्नपत्रिका परीक्षेचे पेपर अहमदाबादच्या टीसीआय एक्स्प्रेस ट्रान्सपोर्ट कंपनीच्या गोदामामधून फुटले होते. पेपरच्या सुरक्षेची जबाबदारी एज्युटेस्ट कंपनीकडेच होती. ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी साटेलोटे करून गोदामात प्रवेश मिळविला, हे नक्की असले तरी एसटीएफला ट्रान्सपोर्ट कंपनीच्या पेपरफुटीतील सहभागाचे पुरावे मिळाले नाहीत. पोलीस भरती पेपरफुटीचा मुख्य आरोपी प्रयागराजचा राजीव नयन मिश्रा याने मात्र बिहारचा सुभाष प्रकाश हा खरा मास्टरमाईंड असल्याचा दावा केला आहे.
मेडिकल क्लीअर करणारा रवी अत्री बनला एक्झामिनेशन माफिया
नीट पेपरफुटीच्या तपासात रवी अत्री हे नावही समोर येत आहे. आधीच घडलेल्या उत्तर प्रदेश पोलीस भरती पेपरफुटीतही तो आरोपी आहे. मेरठ जेलमध्ये सध्या तो आहे. इथूनच त्यानेही नीट पेपरफुटीत सक्रिय भूमिका बजावल्याचे सांगण्यात येते. रवी अत्री हा नीट पेपरफुटीतील सॉल्व्हर गँगचा (पेपर सोडविणारी टोळी) म्होरक्या आहे. तो नोएडातील नीमका गावचा आहे. पेपर फोडणाऱ्यांना सॉल्व्हर टोळीपर्यंत पोहोचविण्यात त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हातभार लावला. २०१२ मध्येही दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला मेडिकल प्रवेश परीक्षेतील पेपरफुटीप्रकरणी अटक केली होती. चालू नीट प्रकरणात बिहार पोलिसांनी तपासाची व्याप्ती अन्य राज्यांत वाढविली. यातून रवीचे नाव समोर आले. त्याने स्वतः ही एमबीबीएस केलेले आहे. रोहतकला पीजीला प्रवेशही घेतला; पण यादरम्यान परीक्षा माफियांच्या संपर्कात तो आला आणि स्वतः ही एक्झाम माफिया बनला.
वडीलही घोटाळ्यात, मुलगाही घोटाळ्यात !
नीट पेपरफुटी प्रकरणातील एक आरोपी अतुल वत्स हा आंतरराज्य सॉल्व्हर टोळीचा म्होरक्या आहे. त्याचे वडील निवृत्त प्रशासकीय अधिकारी आहेत. जहानाबादच्या बंधुगंज गावचे हे कुटुंब. अरुण केसरी हे अतुलचे वडील. राष्ट्रकुल खेळ घोटाळ्यात हे आरोपी होते. बिहार पोलीस आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासातून अतुल वत्सचेही नाव आलेले आहे. अतुल वडिलांसह मुजफ्फरपुरातच राहतो. बंधुगंजला ते गेल्या २० वर्षांत एकदाही गेलेले नाहीत. इथे काका कृष्ण मुरारी राहतात. ते सांगतात, तो हुशार होता, त्याचे वडीलही हुशार आहेत; पण भावनांक नावाचा प्रकार त्यांच्यात नाही. अतुलने नाव उगीचच या प्रकरणात आलेले नसावे, असे मला वाटते. अतुलची पत्नीही एमबीबीएस शिकत असतानाच त्याची हिच्याशी मैत्री झाली होती. परीक्षेत ही यशस्वी ठरली; पण अतुल अपयशी ठरला होता. (पाटण्यात मेडिकलला असलेल्या एका दलित विद्यार्थिनीने अतुलविरोधात लग्नाचे आमिष देऊन लैंगिक शोषण केल्याचा गुन्हाही दाखल केला होता.)