शिक्षण : निकालानंतरची अकाली पानगळ

दहावी-बारावीचा निकाल लागल्यापासून राज्यात 18 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यानिमित्ताने शिक्षणाच्या बदलणार्‍या अर्थाचा आणि द़ृष्टिकोनाचा शोध घेण्याची गरज आहे. ज्या कारणांमुळे विद्यार्थ्यांचे जीवन दुःखाच्या खाईत लोटले जात आहे, त्याचे निराकरण करावे लागणार आहे. अभ्यासाचा ताणच विद्यार्थ्यांना येणार नाही, अशी व्यवस्था उभी करावी लागणार आहे. दरवर्षीप्रमाणे दहावी, बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. …

शिक्षण : निकालानंतरची अकाली पानगळ

संदीप वाकचौरे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

दहावी-बारावीचा निकाल लागल्यापासून राज्यात 18 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यानिमित्ताने शिक्षणाच्या बदलणार्‍या अर्थाचा आणि द़ृष्टिकोनाचा शोध घेण्याची गरज आहे. ज्या कारणांमुळे विद्यार्थ्यांचे जीवन दुःखाच्या खाईत लोटले जात आहे, त्याचे निराकरण करावे लागणार आहे. अभ्यासाचा ताणच विद्यार्थ्यांना येणार नाही, अशी व्यवस्था उभी करावी लागणार आहे.
दरवर्षीप्रमाणे दहावी, बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. मोठ्या प्रमाणावर गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ पार पडले. कौतुकाचे सोहळे झाले. अर्थात, असे सत्कार सोहळे हे अधिक गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहेत. शाळा, महाविद्यालयांसाठी उंचावलेले निकाल आणि विद्यार्थ्यांचे गुण अधिक उत्साहवर्धक असतात. यावर्षी दहावीत 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या 81 हजार 991 इतकी आहे. परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सुमारे 70 टक्के विद्यार्थ्यांनी 60 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळालेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळाले आहेत.
या सार्‍या गुणांच्या आलेखात एक बातमीदेखील अस्वस्थ करणारी आहे. दहावी, बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सुमारे 18 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी समोर आली आहे. अर्थात, परीक्षेला प्रविष्ट होणार्‍या लाखो विद्यार्थीसंख्येचा विचार करता, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अत्यंत कमी आहे, असेही म्हणता येईल; पण जे शिक्षण जीवनाला दिशा देण्यासाठी असते, प्रत्येक व्यक्तीचे जीवन उन्नत करण्यासाठी असते, त्या शिक्षण प्रवाहातील विद्यार्थ्यांनी केवळ कमी गुण मिळणे, अनुत्तीर्णता आणि अभ्यासाचा ताण, यामुळे स्वतःला संपवणे हा शिक्षणाच्या उद्दिष्टाचाच पराभव आहे.
वस्तुतः, शिक्षणासंदर्भात समाजाचा बदलत चाललेला द़ृष्टिकोन आणि वाढत्या अपेक्षांचे बळी म्हणून याकडे पाहावे लागेल. एकीकडे विद्यार्थ्यांच्या गुणांचा आलेख सातत्याने वाढतो आहे; पण हे गुणम्हणजे खरंच गुणवत्ता आहे का? की केवळ गुणांची सुज आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या गुणांच्या सुजेने मुलांच्या हाती नेमके काय लागते आहे? याचा शोध घेण्याचीही वेळ आली आहे.
दहावीत उत्तम गुण मिळाले म्हणून भविष्याच्या द़ृष्टीने अभियांत्रिकी, वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आपला पाल्य पात्र व्हावा म्हणून पालक मोठ्या प्रमाणावर अपेक्षा ठेवून असतात. त्यासाठी विद्यार्थी कोटासारख्या ठिकाणी शिकवणी वर्गाला प्रवेश घेत आहेत. हवे तितके पैसे मोजण्याची तयारी पालक दाखवत आहेत. शिकवणी सुरू असली, तरी तेथेही अभ्यासाचा ताण असह्य होत असल्याने गेल्या सहा महिन्यांत सुमारे 40 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ही कोवळी पानगळ भविष्यासाठी अधिक चिंताजनक ठरणार आहे.
यानिमित्ताने शिक्षणाच्या बदलणार्‍या अर्थाचा आणि द़ृष्टिकोनाचा शोध घेण्याची गरज आहे. ज्या कारणांमुळे विद्यार्थ्यांचे जीवन दुःखाच्या खाईत लोटले जात आहे, त्या कारणांचे निराकरण करावे लागणार आहे. त्याद़ृष्टीने शिक्षणाची दिशा बदलावी लागणार आहे. शिक्षणक्रमातील अभ्यासाचा ताणच विद्यार्थ्यांना येणार नाही, अशी व्यवस्था उभी करावी लागणार आहे. शिक्षणाचा मूलभूत द़ृष्टिकोन रुजविण्याचा गरज यानिमित्ताने अधोरेखित झाली आहे. आज अभ्यास, कमी गुण मिळण्याच्या भीतीचा ताण असह्य होत असल्याने कोणीही विद्यार्थी आत्महत्या करणार नाही, अशी व्यवस्था निर्माण करावी लागणार आहे. त्यासाठी अभ्यासक्रम, मूल्यमापन आणि वर्गातील अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत मूलभूत स्वरूपाचे परिवर्तन करावे लागणार आहे. भविष्य अधिक उज्ज्वलतेसाठी आपण पावले उचलणार की नाही? की प्रत्येकवेळी घटना घडल्यावर चिंता व्यक्त करणार आणि ‘चल रे माझ्या मागल्या’ असं घडत राहणार का?
विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण असह्य होतो आहे. परीक्षेत अनुत्तीर्ण होणे असेल किंवा कमी गुण मिळण्याची भीती असेल, त्यातून विद्यार्थी स्वतःला संपवणे पसंत करत आहेत. परीक्षेचा ताणही असह्य होतो आहे. प्रगत समजल्या जाणार्‍या शैक्षणिक महाराष्ट्रात निकालानंतर मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांत सहा विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात प्रत्येकी 3, मराठवाडा, कोकण विभागात प्रत्येकी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. याचा अर्थ महाराष्ट्राच्या सर्वच विभागांत आत्महत्या होताना दिसत आहेत.
मुळात गेल्या काही वर्षांत विविध कारणांनी विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या दिसत आहेत. विद्यार्थ्यांकडून पालकांचे अपेक्षांचे मोठे ओझे आहे. आपल्या आयुष्यात आपल्याला जे होता आले नाही ते स्वप्न पाल्यांनी पूर्ण करावे, अशी अपेक्षा ठेवली जात आहे. पाल्याच्या क्षमता, कल, अभिरूची लक्षात न घेता त्यांच्यावर सक्तीने काही लादले जात आहे. त्यामुळे विद्यार्थी आत्महत्या करता आहेत, तर काही जीवनभर निराशेच्या छायेत जगणार आहेत. शिक्षण घेतल्यानंतरही जीवन आनंदात जगता न येणे हाही शिक्षणाचा पराभवच आहे. पालकांचे स्वप्न पूर्ण झाले म्हणजे विद्यार्थ्यांचे आयुष्य पैशाने श्रीमंत होईल; पण त्याच्या जगण्याची वाट आनंदी, समद्ध होईलच असे नाही. त्यातून येणारी निराशादेखील त्याची भविष्याची वाट अंधारमय करण्याची शक्यता अधिक आहे.
वर्तमानात शिक्षणातून आनंदी माणूस घडविण्याचा विचार न करता, शिक्षण हे उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. त्यामुळे शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्याने स्वतःचे भविष्य बदलावे आणि पालकांच्या आयुष्याची कायमची चिंता मिटवावी, अशी अपेक्षा ठेवली जात आहे. त्यामुळे काहीही करा, मार्ग कोणताही निवडा; पण विद्यार्थी उत्तम गुण मिळवून वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेशित झाला पाहिजे. हे अभ्यासक्रम जणू जीवनाचे चित्र बदलू शकतील, अशी धारणा बनत चालली आहे. पालकही विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा विचार न करता आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सक्ती आणि वाममार्गाचा विचार करू लागले आहेत. त्याचे दुष्परिणाम राज्याच्या शिक्षण क्षेत्रावर होऊ लागले आहेत. अनेक वाईट गोष्टींचा शिक्षणात प्रवेश झाला आहे. हा मार्ग भविष्यात गुन्हेगारीच्या दिशेने जाण्याचा धोका आहे.
सध्या राज्यात कनिष्ठ महाविद्यालयस्तरावर अनेक विद्यार्थी केवळ स्थानिक महाविद्यालयांत प्रवेश घेत आहेत. प्रत्यक्षात ते विद्यार्थी महाविद्यालयात परीक्षेचा काळ वगळता उपस्थित राहत नाहीत. प्रवेश गावात आणि विद्यार्थी परराज्यात, परजिल्ह्यात शिक्षण घेत आहेत. यासाठी लाखो रुपये पालक मोजत आहेत. आता एवढे करूनही विद्यार्थ्याला अपेक्षित मार्क मिळण्याची शक्यता नसेल, तर पालकांच्या अपेक्षांच्या ओझ्याने विद्यार्थी तणावाखाली आल्याशिवाय राहत नाही. पालकांच्या अपेक्षांचे बोल सतत ऐकवले जातात. त्यामुळे ते बोलही अनेकदा पाल्यांना तणावाच्या खाईत लोटत असतात. या अपेक्षांच्या ओझ्यामुळे विद्यार्थी वाममार्गाची वाट चालण्यासाठी मानसिकद़ृष्ट्या तयार होतात. त्या दिशेने प्रवास करूनही अपेक्षित यश मिळत नसेल, तर आपण जगण्याला पात्र नाही, असे समजून स्वतःला संपवणे पसंत करतात.
जगात प्रत्येक मूल भिन्न आहे. प्रत्येक मुलाची बुद्धिमत्ता भिन्न आहे, हे तत्त्व शिक्षणाच्या प्रक्रियेत स्वीकारले गेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आत्महत्येपासून परावृत्त व्हावे असे वाटत असेल, तर विद्यार्थ्यामध्ये असलेल्या बुद्धिमत्तेचा विचार करून अभ्यासक्रम निवडीची गरज आहे. बुद्धिमत्तेनुसार विद्यार्थ्यांना स्वतःचे भविष्यासाठीचे करिअर क्षेत्र निवडण्याचे स्वातंत्र्य देण्याची आवश्यकता आहे. जेव्हा स्वतःच्या आवडत्या क्षेत्रात शिकण्याची संधी मिळते, तेव्हा तेथे शिकणे होत असताना ताणतणाव निर्माण होत नाहीत. तेथील शिकणे आनंददायी बनते. आवडत्या क्षेत्रातच करिअर करण्याची संधी मिळाली, तर अखंड जीवनभर आनंदाच्या वाटा चालणे शक्य होते. शिकणे म्हणजे स्वतःला समृद्ध करण्याची वाट आहे. शिक्षण प्रक्रियेत शिकणे महत्त्वाचे आहे. शिकताना क्षमतांचा विकास महत्त्वाचा आहे. शिकणे म्हणजे स्वतःत नको असलेले काढून टाकणे आहे. त्यामुळे शिकण्याचा मूलभूत हेतू साध्य करण्याच्या द़ृष्टीने प्रयत्न होण्याची अधिक गरज आहे. परीक्षा, मूल्यमापन म्हणजे विद्यार्थी काय शिकला आहे आणि शिकण्यातील उणिवा कोणत्या आहेत, याचा शोध आहे. परीक्षेत मिळालेले गुण म्हणजे विद्यार्थ्यांचे भविष्य नाही हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांचा विचार करताना त्याला अधिकाधिक उत्तमतेने माणूस म्हणून विकसित करण्यासाठी जबाबदारी पार पाडण्याची गरज आहे.
आपले शैक्षणिक धोरण, राष्ट्रीय व राज्य अभ्यासक्रम आराखड्यातही विद्यार्थ्यांचा शिकण्याचा ताण कमी करण्यासाठी अनेक वर्षे सातत्याने शिफारशी होत आहेत. घोकंपट्टीतून शिकणे मुक्त व्हावे म्हणून सतत सांगितले जात आहे. माहितीने संपन्न असलेले शिक्षण हे संकल्पनाधारित करण्याचा विचार केला जात आहे. माहितीचे ओझे कमी करण्यावर भर देण्याची शिफारशी होत आहेत. जीवनाभिमुख शिक्षणाचा विचार धोरणात केला जात आहे. परीक्षा पद्धतीतदेखील सुधारणा अपेक्षित केल्या आहेत. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचा विचार रुजवण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, आपल्या समाज व्यवस्थेला तो विचार पचनी पडताना दिसत नाही. शिक्षणातून अपेक्षित विकासाचे फलितच मुळात गुणांमध्ये मोजण्याची इच्छा आहे. त्यामुळे ते गुण भेद निर्माण करण्यास मदत करतात. विद्यार्थ्यांच्या मनात न्यूनगंडाची भावना वृद्धिंगत करतात. त्यातून विद्यार्थ्यांच्या विकासावर विपरीत परिणाम होत असल्याचेही लक्षात घ्यायला हवे. शेवटी एका विद्यार्थ्याची आत्महत्या म्हणजे एका कुटुंबाच्या स्वप्नाला सुरुंंग लागणे आहे.