शोध सुखाचा : आत-बाहेर

शोध सुखाचा : आत-बाहेर

सुजाता पेंडसे

माणसांचे अनेक प्रकार आपण पाहत असतो. परंतु, माणसं नेहमी खर्‍या चेहर्‍यांनी समोर येतात का? या प्रश्नाचं उत्तर निश्चितपणे ‘नाही’ असं आहे. कारण, माणूस बहुतांश वेळ एक मुखवटा घालून फिरत असतो. तो जे दाखवत असतो, त्याहीपेक्षा खूप वेगळा तो आतमध्ये असतो. आत म्हणजे कुठे? तर मनाच्या पातळीवर तो खूप अलग असतो. अर्थात, ‘जे मनात ते ओठात’ असं करणं हे खूप धोक्याचं असतं; कारण सर्वसामान्य माणसांमध्ये सर्व म्हणजे सहाही रिपू वास करत असतात. तो मनाने अत्यंत निर्मळ, सद्विचारी सुसंस्कारी असेल, तरच ‘मनातले तेच बाहेरही!’ हे वागणे योग्य असते.
आजकाल सर्रास ‘मनात एक… ओठात दुसरंच’ हा फॉर्म्युला सहजपणे किंवा बिनदिक्कतपणे वापरला जातोय. किंबहुना, प्रत्येकालाच आपल्या बाबतीतलं चांगलं ते हायलाईट करून दाखवयाचं आहे. सोशल मीडियावरच्या असंख्य पोस्टस्, फोटोज् आणि बरंच काही यात प्रत्येकाला दुसर्‍याला स्वत:चं काहीतरी दाखवयाचं आहे. माणसाला अ‍ॅप्रिसिएशनची गरज असतेच; पण ती किती असावी, याचेही एक भान असायला हवे की नको? इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅपसारख्या प्लॅटफॉर्मवर ‘मी… माझं… मला’ याच कॅटगरीतलं सगळं काही असतं. माझे इतके फॅन, फॉलोईंग आहे!’, ‘मला इतके लाईक्स मिळतात!’, ‘माझे मिलियनमध्ये सबस्क्राईबर्स आहेत!’, ‘माझ्या रील्सला इतके जण फॉलो करतात!’ अशा सगळ्या ‘मी’च्या प्रेमात सगळी माणसं आकंठ बुडून गेलीत की काय, असं वाटतं. ‘मी’वर प्रत्येकाचंच प्रेम असतं; पण त्यांच्या या प्रेमामध्ये मनाच्या आत नेमकं काय चाललंय, याकडे खरंच कोण किती लक्ष देतंय, हा कळीचा मुद्दा आहे.
माणसाच्या मनातले विचार आणि आचरण म्हणजे ‘आत आणि बाहेर’ जर पूर्णत: विरोधी वातावरण असेल, तर त्याचा परिणाम सुखी असण्यावर निश्चितपणे होतो.
मुळात मानवी स्वभावच असा आहे की, ‘जे आपल्याकडे आहे’ त्याची मोजदाद करण्यापेक्षा ‘जे नाही’ त्याचीच उजळणी करण्यात त्याचा बराच वेळ खर्च होतो. त्यामुळे ते नाही ते कसे मिळवायचे, याच विचारात माणूस गुरफटलेला असतो. सध्याच्या जगात सोशल मीडियासारखा ‘ईझी रिच’मुळे आपल्याकडे अमुक अमुक नाही… त्यांच्याकडे बघा किती उत्तम आहे, असे विचार मनाची शांती नष्ट करू लागतात. समजा, दुसर्‍यांच्या आनंदी पोस्टस्, फोटोज् पाहिले की, त्याचा आनंद घेण्याऐवजी दु:ख होऊ लागते, तेव्हा समजा की, तुम्ही ‘आत आणि बाहेर’ यातला फरक ओळखण्याची गरज आहे. कारण, बाहेर तुम्ही ‘अभिनंदन!’ अशी कॉमेंट दिलेली असली, तरी ‘यांनाच कसं बरं सगळं मिळतं?’, ‘यांचं आपलं बरं आहे, नशिबानं संगळं भरभरून दिलंय. खरं तर त्यांची तेवढी योग्यताच नाही!’ असे विचार मनात आले की, तत्क्षणी जागे व्हा. छोट्या, छोट्या गोष्टीतून मनात जमा होणारे राग, मत्सर, हेवा हे सगळं हळूहळू तुमच्या स्वभावातच वाईट परिवर्तन आणणारं आहे, हे ओळखा आणि अशा विचारांना वेळीच थांबवण्याचा प्रयत्न करा.
हे कुणा दुसर्‍यासाठी करायचं नाही. तुमच्या स्वत:च्या मनाच्या चांगल्या तब्येतीसाठी करायचं. प्रकृती म्हणजे तुमचं शरीर; पण मनाच्या प्रकृतीसाठी तुम्ही काय करता, हे जास्त महत्त्वाचं. त्याकडे वेळोवेळी लक्ष नाही दिलं, तर अनर्थ ओढवू शकतो.
एक उदाहरण घेऊया. एका कंपनीमध्ये खूप वर्ष प्रामाणिकपणाने काम करणारा मनुष्य शिपाई या पदापासून चढत मॅनेजर या पदापर्यंत गेला. त्याने भरपूर कष्ट केले. काही वर्षांनी एक हुशार तरुण कंपनीमध्ये आला. त्याची निर्णयक्षमता, धाडस आणि धडाडी यामुळे तो भराभर यशाच्या पायर्‍या चढत गेला आणि एक दिवस या पहिल्या मॅनेजरच्या वरच्या पदावर जाऊन बसला. ज्याला आपण नोकरीची संधी दिली, तो पुढे जाऊन बॉस बनला, हे मॅनेजरला काही केल्या पटेना. त्याने सतत काही ना काही तक्रारी मालकांजवळ सुरू केल्या. नव्या बॉसच्या कामात काही ना काही अडचणी स्वत:च आणून बॉस किती चुकीचा आहे, हे मालकांना पटवून देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की, मालकाने नव्या बॉसला नोकरी सोडून जायला सांगितले. तो गेला आणि मग या मॅनेजरला समजलं की, आपण ज्याला समोर गोड बोलून, पाठीमागे ज्याच्याबद्दल कागाळ्या केल्या; त्यानेच आपली बढतीसाठी शिफारस केली. हे समजल्यावर तो ढसाढसा रडला; परंतु तोवर वेळ निघून गेली होती.
या घटनेमध्ये मॅनेजरच्या मनात ‘आत-बाहेर’चा संघर्ष खूप होता. मनातल्या परस्परविरोधी गोष्टींमुळे त्याला अजिबात स्वस्थता नव्हती. अन्नही गोड लागत नव्हते. एवढं करून ज्या माणसाला नोकरी सोडायला लागली, त्याचा चांगुलपणा कळल्यावर पश्चात्तापाच्या आगीत होरपळून मन दु:खी झालं ते वेगळंच. म्हणजे मनातल्या चुकीच्या विचारांचा परिणाम हा शेवटी दु:खाकडेच नेणारा होतो. याउलट जो नवा बॉस होता, तो सरळ मार्गी… साधा होता. ‘नोकरीमध्ये हे चालायचंच,’ असं म्हणून तो पुढे चालू लागला. पुढे त्याला दुसर्‍या कंपनीत छान नोकरी मिळाली.
तात्पर्य हेच की, तुमच्या मनात जे विचार येत असतात, त्याकडे नीट लक्ष द्या. दुसर्‍याचे अभिनंदन करताना मनोमन चरफड होत असेल, तर विचारांचा रस्ता चुकतोय हे जाणवून लगेचच स्वत:च्या मनात दुरुस्ती सुरू करा. दुरुस्ती म्हणजे काय तर…
जगात अगणित क्षमता असलेली असंख्य माणसं आहेत. त्याच्याकडे ते आहे; पण तुमच्याकडे नाही. हे स्वाभाविक आहे. तुमच्याकडे त्याच्याहून काहीतरी वेगळं आणि चांगलं नक्कीच असतं. ‘तो श्रीमंत असेल तर असू द्या!’ त्याच्या आयुष्यात काय आहे, याने तुमचं मन दु:खी करणं, हा कोणता न्याय आहे? तुम्ही फक्त तुमची वाट चालताना येणारी आव्हानं, संकटं यांचा विचार करा. तुम्ही काय काय करू शकता, कसे काम केले तर यशस्वी होऊ शकता, हे बघा. तुमचा आनंद स्वत: मिळवलेल्या गोष्टीत असायला हवा. ‘अमक्याला हे मिळालं नाही!’ म्हणून तुम्ही आनंदी होत असाल, तर ती ‘वॉर्निंग बेल’ समजा आणि स्वत:वर काम करायला घ्या.
स्वत:चं योग्य प्रोग्रामिंग करणं, हाच आयुष्यभर चालणारा, दररोज करावा लागणारा टास्क आहे. त्या पद्धतीचे मनाचे व्यवस्थापन शिकणे आणि करणे हीच सुखाकडे जाण्याची योग्य रीत आहे. आता रोज यासाठी नेमकं काय करायचं?
रोज रात्री झोपण्यापूर्वी दिवसभराच्या तुमच्याच दिनक्रमातल्या गोष्टी आणि विचार याबद्दलचा एक आढावा घ्यायचा. स्वत:लाच नेहमी कळतं की, आपण कुठे चुकतोय. आपल्या मनामध्ये चीड, वैताग, राग, दु:ख आणणार्‍या विचारांना वेळीच थांबवायचं कसं, ते बदलायचे कसे, तसंच त्यासाठी मनाच्या शांत, शिथिल अवस्थेत कोणत्या स्वयंसूचना द्यायच्या, हे यापूर्वी सांगितलेलंच आहे.
तुमच्या मनाच्या ‘आत-बाहेर’ यातलं अंतर जितकं कमी करण्याचा प्रयत्न कराल, तितकं हळूहळू मन शांत, स्वस्थ आणि निरोगी होत जाईल, यात शंका नाही. स्वयंसूचना यशस्वी होण्याच्या मार्गातले अडथळे कोणते आणि ते कसे दूर करायचे, हे पाहूया पुढच्या आणि या लेखमालेच्या शवेटच्या भागात.